Wednesday 6 November 2019

पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजनेचे फळपिकांना मिळणार ‘कवच’


  • मोसंबी, केळी व द्राक्ष फळपिकाकरिता 7 नोव्हेंबर, तर संत्रा फळासाठी 30 नोव्हेंबर अंतिम मुदत
  • आंबा फळपिकासाठी 31 डिसेंबर व डाळींब फळासाठी 14 जानेवारी 2020 अंतिम मुदत
  • गारपीट नुकसानीला मिळणार स्वतंत्र संरक्षित विमा रक्कम
बुलडाणा, दि. 6 -  सन 2019-20 साठी आंबिया बहारासाठी पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे.  जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा,  मोसंबी, केळी, द्राक्ष, आंबा व डाळींब या फळपिकांकरिता राबविण्यात येणार आहे. योजनेतंर्गत फळपिकनिहाय विमा संरक्षण रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे. ही योजना जिल्ह्यात 13 तालुक्यांमध्ये 90 महसूल मंडळात राबविण्यात येणार आहे.  त्यामुळे निश्चितच फळपिकांना विम्याचे कवच प्रदान होणार आहे.
    ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीची असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छीक आहे. अवेळी पाऊस, कमी तापमान, वेगाचा वारा, जास्त तापमान  व गारपीट या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. तसेच आर्थिक सहाय्य देणे व फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधीत राखणे ही मुख्य उद्देश या योजनेचा आहे. अधिसुचित क्षेत्रात अधिसुचित फळ पिके घेणारे (कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. फळपिक निहाय निर्धारित केलेले हवामान धोके (ट्रिगरलागू झाल्यावर नुकसान भरपाई देय होते. विमा क्षेत्र घटक हा महसुल मंडळ असणार आहे.   
        आंबिया बहारातील मोसंबी, केळी व द्राक्ष या तीन फळपिकांसाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव बँकांकडे 7 नोव्हेंबर 2019 पर्यंत सादर करावयाचे आहे. तसेच संत्रा फळपिकाकरीता 30 नोव्हेंबर, आंबा फळिपिकासाठी 31 डिसेंबर, डाळींब फळपिकासाठी 14 जानेवारीपर्यंत प्रस्ताव बँकांना सादर करावयाचे आहेत. तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांची घोषणापत्रे संबंधित बँक शाखेने संबंधित विमा कंपनीस द्राक्ष, मोसंबी व केळी फळपिकासाठी 15 नोव्हेंबर आहे. संत्रा फळपिकासाठी 7 डिसेंबर, आंबासाठी 7 जानेवारी 2020 व डाळींब फळपिकाकरीता 21 जानेवारी 2020 असणार आहे. ज्या कर्जदार शेतकऱ्यांची अधिसुचीत पिकाकरीता सदर हंगामासाठी अंतिम तारखेपर्यंत कर्जमर्यादा मंजूर असेल त्या सर्व शेतकऱ्यांच्या क्षेत्राचा विमा विहीत मुदतीत करूण घेणे बँकांना अनिवार्य  आहे.
 कर्जदार शेतकरी, कर्ज घेतलेले व बँकेकडून अधिसुचीत फळपिकांसाठी पिक कर्ज मर्यादा मंजुर असलेले शेतकरी यांच्या फळपिकांचा विमा प्रस्ताव बँकांना सादर करण्याची अंतिम मुदत द्राक्ष, मोसंबी व केळी फळपिकांसाठी 7 नोव्हेंबर 2019 आहे. संत्र्यासाठी 30 नोव्हेंबर, आंबासाठी 31 डिसेंबर 2019, डाळींब 14 जानेवारी 2020 आहे. तसेच बँकांनी कर्जदार शेतकऱ्यांची घोषणापत्रे संबंधित विमा कंपनीस सादर करण्याची अंतिम मुदत द्राक्ष, मोसंबी व केळी फळपिकांकरीता 21 नोव्हेंबर, संत्र्यासाठी 16 डिसेंबर, आंबा फळपिकाकरीता 15 जानेवारी 2020 व डाळींबकरीता 29 जानेवारी 2020 आहे.
     द्राक्ष फळपिकासाठी एकूण विमा संरक्षित रक्कम 3 लक्ष 8 हजार आहे व शेतकऱ्याने भरावयाचा एकूण विमा हप्ता 15 हजार 400 प्रति हेक्टर आहे. तर गारपीटसाठी एकूण विमा हप्ता संरक्षीत रक्कम 5133 रूपये आहे. तसेच मोसंबीकरीता 77000 प्रती हेक्टर विमा संरक्षित रक्कम, 3850 प्रती हेक्टर विमा दर व गारपीट झाल्यास 1283 रूपये प्रति हेक्टरी विमा संरक्षीत रक्कम मिळणार आहे.  डाळींबसाठी प्रती हेक्टर 1 लक्ष 21 हजार प्रती हेक्टरी विमा संरक्षित रक्कम, 6050 प्रती हेक्टर विमा दर व गारपीटच्या नुकसानीपोटी 2017 रूपये विमा संरक्षीत रक्कम मिळेल.  केळी फळपिकाकरीता प्रती हेक्टर  1 लक्ष 32 हजार विमा संरक्षित रक्कम व 6600 विमा हप्ता प्रति हेक्टर दर आहे. तसेच गारपीट नुकसानीसाठी 2200 रूपये विमा संरक्षीत रक्कम असणार आहे. त्याचप्रमाणे संत्र्याकरीता प्रती हेक्टर 77000 विमा संरक्षीत रक्कम,  3850 विमा हप्ताप्रति हेक्टर दर असणार आहे. तर गारपीट नुकसानीकरीता 1283 रूपये प्रति हेक्टर विमा संरक्षीत रक्कम असणार आहे. आंबा फळपिकरीता प्रती हेक्टरी विमा संरक्षीत रक्कम प्रती हेक्टर 1 लक्ष 32 हजार व प्रती हेक्टर विमा हप्ता दर 6600 आहे. गारपीटने नुकसान झाल्यास आंबा फळपिकासाठी 2200 रूपये विमा संरक्षीत रक्कम प्रति हेक्टर असणार आहे. 
  योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम दिनांकास शासकीय सुट्टी आल्यास सहभागाचा दिनांक पुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवसापर्यंत लागू राहणार आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या योजनेत सहभागी व्हावे. याबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, नजीकच्या बँक शाखेशी व संबंधीत विमा कंपनीशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता जास्तीत जास्त प्रमाणात या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले  आहे.
                                                            फळपिक निहाय समाविष्ट महसूल मंडळ
द्राक्ष : बुलडाणा, बोराखेडी ता. मोताळा, जळगांव, सोनाळा व बावनबीर ता. संग्रामपूर, दे.राजा. मोसंबी : सिं.राजा, सोनोशी, किनगांव राजा, दुसरबीड, मलकापूर पांगरा, शेंदुर्जन व साखरखेर्डा ता. सिं.राजा. डाळींब : पेठ, चिखली, चांधई, धोडप, कोलारा, एकलारा, अमडापूर, उंद्री, शेळगांव आटोळ, हातणी, मेरा खु ता. चिखली, बुलडाणा, धाड ता. बुलडाणा, शेलापूर, बोराखेडी, मोताळा व धा. बढे ता. मोताळा, हिवरखेड, पिंपळगांव राजा व काळेगांव ता. खामगांव, सि.राजा, दुसरबीड, शेंदुर्जन, साखरखेर्डा ता. सिं.राजा, दे.राजा, दे.मही, तुळजापूर, मेहुणा राजा, अंढेरा ता. दे.राजा, जामोद व पिंपळगांव काळे ता. जळगांव जा, जांबुळधाबा व नरवेल ता. मलकापूर, लोणार ता. लोणार, डोणगांव, हिवरा आश्रम, शेलगांव देशमुख, नायगांव दत्तापूर ता. मेहकर, केळी : बुलडाणा ता. बुलडाणा, मेरा खुर्द ता. चिखली, डोणगांव, हिवरा आश्रम, वरवंड, जानेफळ, नायगांव दत्तापूर ता. मेहकर,  बोराखेडी, मोताळा, धा. बढे, पिंप्री गवळी, पिं. देवी, रोहीनखेड ता. मोताळा, जळगांव व जामोद ता. जळगांव जामोद, संग्रामपूर, बावनबीर, सोनाळा, पातुर्डा ता. संग्रामपूर,  हिवरखेड, काळेगांव, वझर, लाखनवाडा, पि.राजा ता. खामगांव. संत्रा : डोणगांव, हिवरा आश्रम, मेहकर, शेलगांव दे, जानेफळ, नायगांव दत्तापूर ता. मेहकर, बिबी, अंजनी खुर्द, सुलतानपूर, लोणार, हिरडव ता. लोणार, हिवरखेड, काळेगांव, वझर, लाखनवाडा, आडगांव ता. खामगांव, दे. मही व  अंढेरा ता. दे.राजा, बावनबीर, सोनाळा, संग्रामपूर ता. संग्रामपूर, साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा ता. सिं.राजा, जामोद ता. जळगांव जामोद, आंबा : सि.राजा ता. सिं.राजा.

No comments:

Post a Comment