Wednesday 6 November 2019

शिष्यवृत्तीसाठी अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करण्यास मुदतवाढ

 झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ
·          30 नोव्हेंबर 2019 अंतिम मुदत
बुलडाणा, दि. 6 :  डॉ झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2019-20 अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यास यापूर्वी 31 ऑगस्ट 2019 मुदत होती. सदर मुदत वाढविण्यात आली असून 11.10.2013 च्या शासन निर्णयातील विहीत नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून प्रस्ताव 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत मागविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील सदर योजनेतंर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या निवासी मदरसांनी दिनांक 11.10.2013 च्या शासन निर्णयामधील निकषांनुसार विहीत नमुन्यातील परिपूर्ण भरलेले प्रस्ताव कागदपत्रांच्या पुर्ततेसह अल्पसंख्यांक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत सादर करावे व या योजनेचा लाभ घ्यावा. विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.  
                                                                        ******
              पाळणाघर चालविणाऱ्या इच्छूक संस्थांनी 20 नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावे
बुलडाणा, दि. 6: जिल्हा परिषद अंतर्गत असलेले एकात्मिक बाल विकास सेवा योजना कक्षातर्फे  जिल्ह्यातील ज्या स्वयंसेवी संस्थांना खाजगीरित्या पाळणाघर चालवायची आहेत. अशा सर्व पाळणाघर चालविणाऱ्या संस्था चालकांनी शासन निर्णय 7 जानेवारी 2019 च्या अटी व शर्ती नुसार 20 नोव्हेंबर 2019 पर्यत एकात्मिक बाल विकास सेवा योजना कक्ष, जिल्हा परिषद, बुलडाणा येथे प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
                                                                        *****
शिष्यवृत्तीसाठी अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करण्यास मुदतवाढ 
  • 15 नोव्हेंबर 2019 अंतिम मुदत
बुलडाणा, दि. 6: जिल्ह्यातील सर्व  कनिष्ठ, वरिष्ठ, व्यवसायिक, बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टल शैक्षणिक सत्र 2019-20 शैक्षणिक वर्षाकरीता 31 ऑक्टोंबर 2019 पर्यंत कार्यान्वीत करण्यात आले होते. अनुसूचित जाती, इमाव, विमाप्र व विजाभज प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये म्हणून महाडीबीटी पोर्टलवरील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 15 नोव्हेंबर 2019 पर्यत शासनातर्फे वाढवून देण्यात आली आहे. तेव्हा महाविद्यालय प्राचार्यांनी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परिक्षा शुल्क अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकाची सुचना विद्यार्थ्यांना लेखी कळवून सुचना महाविद्यालयाच्या सुचना फलकावर लावावी.
    महाडीबीटी संगणकीय प्रणालीवरील डॅशबोर्डचा दि. 4 नोव्हेंबर 2019 रोजी आढावा घेतला असता महाविद्यालय स्तरावर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण, परिक्षा शुल्क व इतर योजनेचे अनु. जाती, इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गाचे एकूण 27 हजार 592 विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर प्रलंबित आहेत.  महाविद्यालय प्राचार्य यांनी महाडीबीटी संगणकीय प्रणालीवरील विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्ज प्रचलित नियमानुसार तपासणी करुन पात्र अर्ज  तात्काळ सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, बुलडाणा  यांचेकडे मंजुरीसाठी ऑनलाईन सादर करावेत.
    तसेच भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण, परिक्षा शुल्क योजनेचा कोणताही अनुसूचित जाती, इमाव, विमाप्र, विजाभज प्रवर्गातील पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहील्यास त्यास सर्वस्वी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदार राहतील, असे सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
000000
मैत्रेय ग्रृप ऑफ कंपनीज विरोधात राज्यात 31 ठिकाणी गुन्हे
  • 4 अधिसुचनेअन्वये 353 मालमत्ता जप्त
  •  ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा येथे अर्ज करावे
बुलडाणा, दि. 6 : मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीविरुध्द महाराष्ट्रात 31 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच शासन स्तरावर 4 अधिसुचनांच्या माध्यमातून 353 मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत. इतर नवीन मालमत्तांचा शोध लागला असून शासन स्तरावर अधिुसचना काढून त्या मालमत्ता लिलावाद्वारे विक्री झाल्यानंतर ठेवीदारांना ठेवी परत करण्यात येणार आहे.
  गुन्ह्याचे तपासात सुसुत्रता रहावी. तसेच ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करता याव्यात या उद्देशाने संनियंत्रण समिती अपर पोलीस महासंचालक, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई यांचे अध्यक्षेतखाली गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी तरुणकुमार खत्री यांची नियुक्ती केली आहे. बुलडाणा जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात ए.एम बोडखे, पोलीस निरीक्षक,  आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा यासंदर्भातील गुन्ह्यांचा तपास करीत आहेत.  ठेवी परत मिळण्यासाठी ठेवीदारांचे अर्ज आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा येथे स्विकारणे सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व ठेवीदारांनी ठेवी परत मिळण्यासाठी अर्ज आर्थिक गुन्हे शाखे कडे मुदतीत दाखल करावे, असे डी. बी तडवी, पोलीस उप-अधिक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
                                                                                    *******
 लोणार येथे 8 व 9 नोव्हेंबर रोजी चित्रप्रदर्शनी व  सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
  • महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवाचे निमित्त
बुलडाणा, दि. 6 : केंद्र शासनाच्या माहिती व  प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, औरंगाबाद यांच्यावतीने गांधी : जीवन कार्य व स्वच्छता या विषयावर चित्रप्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन श्री मंगल कार्यालय, लोणार येथे 8 व 9 नोव्हेंबर 2019 रोजी करण्यात आले आहे. महात्मा गांधींच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महरोत्सवाच्या निमित्ताने सदर आयोजन करण्यात येणार आहे. ही चित्रप्रदर्शनी 8 व 9 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10 ते रात्री 8 या कालावधीत सर्वांसाठी विनामूल्य सुरू राहणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन 8 नोव्हेंबर रोजी दु. 12.30 वाजता होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहून संपूर्ण कार्यक्रमाला लाभ घेण्याचे आवाहन केंद्र शासनाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, औरंगाबाद यांच्यावतीने प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आले आहे.

--

No comments:

Post a Comment