Thursday 17 May 2018

केंद्रीय पथकाने घेतला बोंडअळी नुकसानीचा आढावा


  • शेतकऱ्यांशी चर्चा करुन घेतली माहिती
बुलडाणा, दि 17:- मागील खरीप हंगामात  बोंडअळीमुळे राज्यातील शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी राज्य शासनाने बोंडअळीसाठी मदत जाहीर करून निधी उपलब्ध करून दिला. यामध्ये एन डी आर एफ कडून सुध्दा मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या मागणीनुसार आज 17 मे 2018 रोजी केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील शेतक-यांशी चर्चा करून बोंडअळीचा आढावा घेतला. पथकाने सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगांव माळ व दे. राजा तालुक्यातील भिवगांव येथे भेट देवून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार डॉ शशिकांत खेडेकर उपस्थित होते.
   बोंडअळीग्रस्त  शेतक-यांना  शासनाने नुकतीच जिल्ह्यासाठी पहील्या टप्प्यात 35 कोटी 82 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासाठी केंद्र शासनाच्या वतीने एन डी आर एफ मधून मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे मागणी केली होती. ती मागणी मान्य करत केंद्र शासनाने नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठवले आहे. पथक तेथील शेतक-यांशी चर्चा करून नुकसानीची माहिती घेतील. 
   दरम्यान आज डोंगराळ भागात वसलेल्या  सावरगांव माळ ता. सिं.राजा येथे पथकातील सदस्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.   यावेळी शेतकऱ्यांनी पथकाला शेततळ्यासाठी 100 टक्के अनुदान देण्याची मागणी केली. शेततळे हा शाश्वत सिंचनाचा सर्वात विश्वसनीय पर्याय आहे. त्यामुळे शेततळ्याला संपूर्ण अनुदान देण्यात यावे. वन्यप्राणी या भागामध्ये पिकांचे नुकसान करतात. त्यामध्ये रोही प्राणी महत्वाचा आहे. या प्राण्याच्या हैदोसमुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सोसावे लागते. त्यामुळे या प्राण्याचा बंदोबस्त करण्यात यावा. सौर उर्जेवर आधारीत कृषि पंप योजनेद्वारे पुन्हा पंप वितरण सुरू करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली.   पथकातील सदस्यांनी विविध कृषिच्या योजना शेतकऱ्यांना सांगितल्या.
   या पथकात पथकप्रमुख अश्निकुमार नवी दिल्ली, निती आयोगाच्या डॉ. बी गणेशराम,केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या डॉ. नंदीनी गोकटे नारखेडकर, दिनानाथ, फरीदाबाद येथील आर. डी देशकर, नागपूरचे डॉ. आर. पी सिंग, सीसीआयचे उपमहाव्यवस्थापक एच.डी टेंभुर्णे, कृषि आयुक्त सचिंद्रप्रताप सिंग,   उपविभागीय अधिकारी डॉ. विवेक काळे, तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, तहलिसदार संतोष कणसे, तालुका कृषि अधिकारी बिपीन राठोड, गटविकास अधिकारी श्री. भटकर, सरपंच श्रीमती सविता साळवे आदींसह कृषि विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते. 
                                                                                    *********
बालगृह तपासणी समितीवर अशासकीय सदस्यांसाठी अर्ज आमंत्रित
बुलडाणा, दि 17:- महिला व बालविकास विभागामार्फत संस्थांच्या तपासणीसाठी राज्य व जिल्हास्तरावर तपासणी समिती गठीत करणेबाबत निर्देश आहेत. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 च्या अनुषंगाने विधी संघर्षगग्रस्त बालके, त्यांची काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके यांच्यासाठी बालकांना निवासी सेवा पुरविणाऱ्या शासकीय तसेच स्वयंसेवी संस्थांची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. याकरीता जिल्हास्तरीय समिती गठीत करावयाची असून ही समिती जिल्हादंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आहे. समितीमध्ये सदस्य सचिव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आहेत. या समितीमध्ये एकूण 7 जण असून एकअशासकीय सदस्याची निवड समितीवर करावयाची आहे. तरी सदस्य निवडीसाठी बाल हक्क, संरक्षण, संगोपन व कल्याण या क्षेत्रातील किमान 10 वर्षांचा अनुभव असलेल्या, वय 35 वर्षपेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त नसलेले व्यक्ती अर्ज करू शकते. अशासकीय सदस्यांचा कालावधी नेमणूकीपासून 3 वर्षांचा असणार आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी आपला प्रस्ताव 25 मे 2018 पर्यंत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, बस स्टँण्डच्या पाठीमागे, डॉ. जोशी हॉस्पीटल शेजारी, बुलडाणा येथे सादर करावे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रमोद येंडोले यांनी कळविले आहे.
सामाजिक न्याय विभागातंर्गत मुलींच्या निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू
बुलडाणा, दि‍.17: राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य  विभागातंर्गत आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलींच्या घाटपूरी, ता. खामगांव येथील शाळेत प्रवेश प्रक्रिया प्रारंभ करण्यात आली आहे. या शैक्षणिक सत्र 2018-19 करीता सेमी इंग्रजी माध्यमाकरिता इयत्ता 6 वी साठी संपूर्ण नवीन प्रवेश  व इयत्ता 7 वी ते 9 वी मधील रिक्त  जागांसाठी प्रवेश केवळ मुलींसाठी देण्यात येणार आहे. अनुसूचित जमाती, अनु. जाती, विजाभज, विमाप्र व अपंग या प्रवर्गातील विद्यार्थीनींच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, असे घाटपुरी ता. खामागांव येथील शाळेचे मुख्याध्यापक यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment