Friday 4 May 2018

पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना जाहीर



·        मृग बहारातील संत्रा, मोसंबी, डाळींब, पेरू चिकू फळपिकांचा समावेश
·        शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
·        पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सहभाग बंधनकारक

     बुलडाणा, दि.3 : प्रधानमंत्री कृषि पीक विमा योजनेतंर्गत पुर्नरचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन 2018-19 करीता जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतील विम्याचा लाभ मृग बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळींब, पेरू व चिकु या पाच फळपिकांसाठी मिळणार आहे. योजनेद्वारे कमी/जास्त पाऊस, पावसाचा खंड व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारीत केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्यात येते.  फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखल्या जाते.
  अधिसुचीत क्षेत्रात अधिसुचीत फळपीक घेणारे (कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. जे शेतकरी विविध वित्तीय संस्थेकडून पीक कर्ज घेतात अशा कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक राहणार आहे. फळपीक निहाय निर्धारीत केलेले हवामान धोके  लागू झाल्यावर नुकसान भरपाई देय राहणार आहे. विमा क्षेत्राचा घटक हा महसूल मंडळ राहणार आहे.
   बँकेकडून अधिसूचित फळ पिकांसाठी पीक कर्ज मर्यादा मंजूर असलेले शेतकरी यांना तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव बँकांना सादर करण्याची मुदत संत्रा, मोसंबी, पेरू या फळ पिकांकरीता 14 जून, तर डाळींब पिकाकरीता 14 जुलै राहणार आहे. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी बँकेशी किंवा क्षेत्रीय अधिकारी असलेल्या तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.

समाविष्ट फळपिकनिहाय महसूल मंडळ, संरक्षित विमा रक्कम व शेतकरी विमा हप्ता

संत्रा : मेहकर, डोणगांव, हिवरा आश्रम, जानेफळ, शेलगांव देशमुख ता. मेहकर, मेहूण राजा, दे.मही व अंढेरा ता. दे.राजा, अंजनी खु व सुलतानपूर ता. लोणार, बोरी अडगाव ता. खामगांव, सोनाळा व बावनबीर ता. संग्रामपूर, जामोद ता. जळगाव जामोद महसूल मंडळ समाविष्ट करण्यात आले आहे. या फळपिकाला हेक्टरी 77000 रूपये संरक्षित रक्क्म असून विमा हप्ता 3850 प्रती हेक्टरी आहे. मोसंबी : मसला बु ता. बुलडाणा महसूल मंडळ समाविष्ट आहे.  या फळपिकाला हेक्टरी 77000 रूपये संरक्षित रक्क्म असून विमा हप्ता 3850 प्रती हेक्टरी आहे.  पेरू : सिं.राजा, सोनुशी, किनगाव राजा, दुसरबीड, मलकापूर पांग्रा, शेंदुर्जन व साखरखेर्डा ता. सिं.राजा,  साखळी बु ता. बुलडाणा, चिखली, हातणी व चांधई ता. चिखली, चांदुर बिस्वा ता. नांदुरा, पिंपळगांव काळे ता. जळगाव जामोद महसूल मंडळ समाविष्ट करण्यात आले आहे. या फळपिकाला हेक्टरी 55000 रूपये संरक्षित रक्क्म असून विमा हप्ता 2750 प्रती हेक्टरी आहे. डाळींब : पेठ, चिखली, चांधई, कोलारा, अमडापूर, शेळगांव आटोळ, हातणी ता. चिखली,  बुलडाणा व धाड ता. बुलडाणा, शेलापूर, पिंप्री गवळी, पिं.देवी, बोराखेडी, मोताळा व धा. बढे ता. मोताळा, हिवरखेड व काळेगांव ता. खामगांव, नरवेल व जांबुळधाबा ता. मलकापूर, जामोद ता. जळगांव जामोद महसूल मंडळ समाविष्ट करण्यात आले आहे. या फळपिकाला हेक्टरी 121000 रूपये संरक्षित रक्क्म असून विमा हप्ता 6050  प्रती हेक्टरी आहे.
                                                                        ****** 
कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जासाठी 20 मेपर्यंत मुदतवाढ
  • अर्ज सादर न करू शकलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा संधी
  • एकरकमी कर्ज योजनेसाठी अर्ज सादर करण्यास 30 जुनपर्यंत मुदत
  बुलडाणा,दि.3: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – 2017 अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असून या योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे. या योजनेसाठी अर्ज दाखल करावयाच्या कालावधीत शेतकऱ्यांना काही वैयक्तिक अथवा तांत्रिक कारणांमुळे विहीत दिनाकांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता आले नाहीत, अशा शेतकऱ्यांना शासनाने पुन्हा एक संधी दिली असून अर्ज सादर करण्यास 20 मे 2018 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.  तसेच दीड लाखावरील कर्जासाठी एकरकमी योजनेत अर्ज सादर करण्यास 30 जुन 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
   त्यानुसार सदर अर्ज भरण्याची सेवा महाईसेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र व ई संग्राम केंद्रावरून नि:शुल्क पुरविण्याबाबत त्यांना निर्देशित करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना स्वत:सुद्धा http://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून युजर आयडी व पासवर्डच्या आधारे अर्ज सादर करता येईल. उपरोक्त कालावधीत आपले सरकार सेवा केंद्र, सर्व महा ई सेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र व ई संग्राम यांनी शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज नि:शुल्क भरून द्यावे, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने निर्देशीत केले आहे.

No comments:

Post a Comment