Tuesday 1 May 2018

राज्याचा 58 वा स्थापना दिवस थाटात





जिल्ह्याच्या समृद्धीसाठी विकास प्रक्रियेतील सहभाग महत्वाचा
- पालकमंत्री
  • जलयुक्त शिवारच्या माध्यमातून 2 हजार 461 कामे पूर्ण
  • पाणी टंचाई निवारणार्थ 939 गावांमध्ये 1472 उपाययोजना
  • उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानातंर्गत कृषि यांत्रिकीकरणासाठी मोहिम
  • आजपासून डिजीटल स्वाक्षरी 7/12 चे वितरण
  • 3 हजार 748 शेततळी पूर्ण, रस्त्यांचा विकास गतीने सुरू
बुलडाणा, दि‍.1 - राज्य शासन विविध विभाग व अनेक योजनांच्या माध्यमातून जनतेचे कल्याण साधण्याचे काम करीत असते. यामध्ये जनतेच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत घटकांचादेखील सहभाग असतो. शासन राबवित असलेल्या योजनांमध्ये लोकसहभागही तितकाच महत्वाचा असतो. जिल्ह्याला या योजनांच्या माध्यमातून समृद्ध करण्यासाठी सर्वांचा  विक्रास प्रक्रियेतील सहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज केले.
    महाराष्ट्र राज्याचा 58 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा  पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधित करताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार विजयराज शिंदे, माजी अमदार धृपदराव सावळे, बुलडाणा कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती जालींधर बुधवत, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षष्मुखराजन, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे आदींची उपस्थिती होती.  
  जिल्ह्यात उद्भवत असलेल्या पाणीटंचाईवर यशस्वीरित्या मात करण्यात येत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले,  सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता सर्वदूर जाणवत आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने नागरिकांना मुबलक व पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. जिल्ह्यात 939 गावांमध्ये 1472 पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषि सन्मान योजनेने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.  त्यामध्ये आता 1 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2009 दरम्यान कृषी कर्ज थकीत खातेदार शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रूपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच दीड लाख रूपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या थकबाकीदार खातेदार शेतकऱ्यांना एकरकमी योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
      ते पुढे म्हणाले, या खरीप हंगापासून राज्यभर ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ अभियान राबविण्यात येत आहे. त्यातंर्गत कृषि यांत्रिकीकरणाची विशेष मोहिम राबविण्यात आली आहे. जिल्ह्यात  एकूण  17 हजार 280  शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र, पॉवर ट्रीलर आदी स्वयंचलित अवजारे देण्यात आली आहे. या साहित्याचे अनुदानाची रक्कम D.B.T. द्वारे आतापर्यंत एकूण 11 कोटी 7 लक्ष रूपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घेत शेतीमध्ये यांत्रिकीकरण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
   पालकमंत्री पुढे म्हणाले, येत्या खरीप हंगामात 7.32 लक्ष हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन असून त्यामध्ये सोयाबीन व कापूस पिकांचे क्षेत्र जास्त आहे. जिल्ह्यासाठी सोयाबीनच्या 1.15 लक्ष क्विंटल व कापसाच्या 8.5 लक्ष बियाणे पाकिटांचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. या खरीप हंगामामध्ये शासनाने आतापासून काळजी घेतली आहे. बियाणे पाकिटांसोबत फेरोमन सापळे देण्यात येणार आहे. तसेच जनजागृतीसाठी गावपातळीवर कार्यक्रमांचे आयोजनही केल्या जाणार आहे. जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजनेत 3 हजार 748 शेततळी पूर्ण करण्यात आली आहे.  खरीप हंगामात प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज मिळण्यासाठी गतवर्षीपेक्षा जिल्ह्याचे कृषि कर्जाचे उद्दिष्ट 419 कोटी रूपयांनी वाढवून 1877 कोटी रूपये निश्चित करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनी संबंधित बँक शाखेत जावून नवीन कर्जासाठी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
      भूजल पातळी जलयुक्त शिवार अभियान यशस्वी ठरत असल्याचे सांगत पालकमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले,  भूजल पातळी वाढवून मोठ्या प्रमाणावर संरक्षित सिंचनासाठी जिल्ह्यात महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. गतवर्षी निवडलेल्या 195 गावांमध्ये 2 हजार 461 कामे पूर्ण करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध उपचारांमुळे 18 हजार 729 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. तसेच 16 हजार 535  हेक्टरवर एक वेळच्या  संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. शेतकऱ्यांचे महत्वाचे कागदपत्र असलेला 7/12 आजपासून डिजीटल स्वाक्षरीने मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ताटकळत न थांबता एका क्लिकवर 7/12 मिळणार आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. जवळपास 405 किलोमीटरच्या राज्य महामार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. रस्ते विकासामुळे निश्चितच जिल्ह्याच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीत भर पडणार आहे.
          ते पुढे म्हणाले, कृषि पंपासाठी सन 2017-18 मध्ये  जिल्ह्यात 3 हजार 349 शेतकऱ्यांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.  जिल्ह्यात 8 नवीन उपकेंद्र निर्माण करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत प्रत्येक बेघराला हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे.  मुलींचे घटते प्रमाण अत्यंत चिंताजनक असून स्त्री भ्रृण हत्या रोखण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. केवळ सरकारी उपाययोजनांच्या माध्यमातून हे काम होणार नसून सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्थांनी सामाजिक भावनेने याबाबत काम करणे गरजेचे आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानातून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जाणीव-जागृती करण्यात येत आहे.
        कार्यक्रमाचे संचलन नरेंद्र लांजेवार यांनी केले. कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, समाज भूषण पुरस्कार प्राप्त,विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी व नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री श्री. फुंडकर यांनी परेड निरीक्षण केले. कमांडर आर.आर वैजने यांनी पालकमंत्री यांना सलामी दिली. तसेच महिला पोलीस दल, होमगार्ड पुरूष व महिला दल, बँण्डपथक, श्वानपथक, रूग्णवाहिका व नगर पालिका अग्नीशमन वाहन यांनी परेडमध्ये सहभाग घेतला.
                                                            विविध पुरस्कारांचे वितरण
कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याहस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी राज्य परिवहन महामंडळाने जिल्ह्यातील 13 शहीद जवानांच्या पत्नींना आजिवन मोफत बस प्रवास सवलत पासचे वितरण करण्यात आले. यामध्ये श्रीमती कमलाबाई सदाशिव घुबे, श्रीमती द्रौपदाबाई त्र्यंबक पवार, श्रीमती उज्ज्वला नारायण कुलकर्णी, श्रीमती शांताबाई गवई, श्रीमती गोराबाई हनवते व श्रीमती विजया मनोज वानखेडे यांचा समावेश आहे. उपवनसरंक्षक बुलडाणा वन विभाग यांचे कार्यालयामार्फत संत वनग्राम पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. प्रथम पुरस्कार वनव्यवस्थापन समिती  पिंपळगांव चिलमखाँ दे.राजा यांना, द्वितीय पुरस्कार माटरगांव गेरू ता. खामगांव यांना, तर  तृतीय पुरस्कार राजुरा ता. जळगांव जामोद यांना प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट कार्याकरीता वनरक्षक आय. बी गवारगुरू, श्रीमती एस.एस खरात व पी.पी जाधव यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी (प्राथ)  अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या बोराखेडी येथील मुख्याध्यापक अनिल कानिराम चव्हाण,  नारखेड ता. नांदुरा येथील सहायक अध्यापक प्रेमचंद देविसिंग राठोड यांना सन्मानित करण्यात आले.
     विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती अंतर्गत विभागीय निवड समिती  सन 2017-18 चा आदर्श तलाठी पुरस्कार मिळालेले मादणीच्या तलाठी श्रीमती व्ही. आर नाईक यांचा गौरव करण्यात आला. पोलीस महासंचालक यांनी उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा यावेळी गौरव करण्यात आला. राज्य गुप्तावार्ता विभागाचे सहायक आयुक्त श्री. कौठाळे, सायबर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज केदारे, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, वरिष्ठ गुप्तावार्ता अधिकारी ए.एल भगत, चालक पोलीस हवालदार वासुदेव पांडुरंग कोसे यांचा गौरव यावेळी झाला. तसेच सीसीटीएनएस प्रणालीवर उत्कृष्ट कामगिरी बद्दल छाया गोमलाडू, सपना पालवे, निलेश चौधरी, पंढरी मिसाळ यांचा सन्मानही याप्रसंगी करण्यात आला.  

तालुका स्मार्ट ग्रामपंचायतीच्या सरपंव व ग्रामसेवक यांचा सन्मान
कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याहस्ते तालुका स्तरावर निवडलेल्या स्मार्ट ग्रामपंचायतीमधील सरपंच व ग्रामसेवक यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. जळगाव जामोद तालुक्यातून बोराळा खु येथील सरपंच सौ. सुरेखा तिजारे व ग्रामसेवक प्रमोद खोद्रे यांचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे खामगांव तालुक्यातील कंचनपूर येथील सरपंच सौ नलीनी आरज व ग्रामसेवक शिवशंकर पायघन, शेगांव तालुक्यातील मोरगांव डी येथील सरपंच श्रीमती बेबीताई वडोदे व ग्रामसेवक मनिष रोडे, रूधाना ता. संग्रामपूर येथील सरपंच सौ सरिता सातव व ग्रामसेवक राजकुमार काळे,  वसाडी बु ता. नांदुरा येथील सरपंच सौ वनिताताई गिरे व ग्रामसेवक प्रकाश राऊत, निंबारी ता. मलकापूर सरपंच सचिन वराडे व ग्रामसेवक दिपक  ठाकूर, शेलगांव बाजार ता. मोताळा येथील सरपंच सरला खर्चे व ग्रामसेवक अजय मोरे, बुलडाणा तालुक्यातील सावळीचे सरंपच श्रीमती ताराबाई वाघ व ग्रामसेवक विनायक पंडीत, मलगी ता. चिखली येथील सरपंच सौ सुमनताई जाधव व ग्रामसेवक विनायक वायाळ, सिनगांव जहा ता. दे.राजा येथील सरपंच सौ लता गिते व ग्रामसेवक श्रीराम नागरे, भंडारी ता. सिं.राजा येथील सरपंच सौ सुमनताई घुगे व ग्रामसेवक अविनाश नागरे, लोणार तालुक्यातील वझर आघवचे सरपंच रामेश्वर आघाव ग्रामसेवक कारभारी शिंगणे आणि दादुलगव्हाण ता. मेहकर येथील सरपंच सौ उज्वला दळवी व ग्रामसेवक कु. दिपाली कांबळे यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.
                                                            *******




No comments:

Post a Comment