Friday 20 April 2018

चिखली तालुक्यातील धानोरी गावातील पारधी समाजातील भिक्षेकरी मुलांचे केले पुनर्वसन


महिला व बाल संरक्षण विभागाच्यावतीने भिक्षेकरी मुलांचे पुनर्वसन
·        रस्त्यावर भिक मागणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी मोहिम
·        चिखली तालुक्यातील धानोरी गावातील पारधी समाजातील भिक्षेकरी मुलांचे केले पुनर्वसन
  बुलडाणा, दि. 20 : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने जिल्ह्यामध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत भिक्षेकरी मुलांच्या पुनर्वसनासाठी मोहिम सुरू केली आहे. रस्त्यावरील भिक मागणाऱ्या मुलांना पकडून त्यांच्या पुढील उज्जवल भविष्यासाठी प्रथमत: त्यांच्या कुंटूबात, कुटूंब नसल्यास बाल गृह व निरीक्षण गृहात पुनर्वसन केल्या जाते. चिखली तालुक्यातील धानोरी गावातील पारधी समाजातील कुटूंबात वय वर्ष 3-6 वयोगटातील मुले सिल्वासा (दादर नगर हवेली ) सिल्वासा येथे  एससीपीएस, आयसीपीएस व डिसीपीयु अंतर्गत कार्यरत असलेले अधिकारी / कर्मचारी यांना भिक मागताना आढळले.  त्यानंतर त्यांनी या मुलांना बुलडाणा येथे आणून जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बुलडाणा यांच्या स्वाधीन करण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बुलडाणा यांच्या माध्यमातून भिक मागतांना आढळून आलेल्या कुटूंबातील सदर बालकांची शासकीय रूग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या बालकांना बाल कल्याण समितीसमोर सादर करून त्यांची सविस्तर विचारपूस करण्यात आली. त्यांच्या कुटूंबियांकडून लेखी स्वरूपात ह्यानंतर बुलडाणा जिल्हा सोडून जाणार नसून कोणत्याच प्रकारे बालकाकडून भिक्षा मागवणार नाही, असे लिहून घेण्यात आले.
    त्याचप्रमाणे धानोरी गावचे पोलीस पाटील प्रेमचंद हिवरकर यांच्याकडूनही जबाब लिहून घेण्यात आला. तसेच भिक्षेकरी मुलांना त्यांच्या कुटूंबापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रमोद येंडोले, बाल संरक्षण कक्षातील अविनाश चव्हाण, बाल संरक्षण अधिकारी गजानन कुसुंबे, सामाजिक कार्यकर्ता प्रदीप सपकाळ, ॲड गणेश देशमुख, कु. शारदा पवार, सचिन देशमुख, रामेश्वर जाधव, जिल्हा बाल संरक्षण कक्ष सिल्वासाचे पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी मधु चौधरी, संरक्षण अधिकारी सिल्वासा  विश्वनाथ देवरे,सामाजिक कार्यकर्ता उषा पटेल, पोलीस हवालदार तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सर्व अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते. ü
*********
अंमलबजावणी यंत्रणांनी समन्वयाने जलसंधारणाची कामे पूर्ण करावी
-         एकनाथ डवले
·                    जलसंधारण कामांची आढावा बैठक
·                    मागेल त्याला शेततळे, मृदसंधारणाची कामे विहीत कालावधीत पूर्ण करा
·                    झालेल्या कामांचे जिओ टँगिंग करावे
  बुलडाणा, दि. 20 :  राज्यामध्ये जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे सुरू आहेत. तसेच मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानतंर्गतही कामे होत आहेत. सध्या या कामांसाठी अत्यंत महत्वाचे दिवस आहेत. त्यामुळे सहभागी अंमलबजावणी यंत्रणांनी समन्वयाने जलसंधारणाची सुरू असलेली व सुरू होणारी कामे त्वरित पूर्ण करावी, अशा सूचना जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी आज दिल्या आहेत.
   जलसंधारण विभागाच्या विविध येाजनांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, प्र. मुकाअ राहूल चाकोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे आदी उपस्थित होते.
    जलयुक्त शिवारमधील पाणी ताळेबंद पुर्ण असलेल्या गावांचा आढावा घेताना सचिव एकनाथ डवले म्हणाले, मागील वर्षातील  कामे त्वरित पूर्ण करा. निधी आवश्यक असल्यास निधीची मागणी करावी.  तसेच यंत्रणांनी प्रशासकीय मान्यता तात्काळ देवून कामांची पूर्तता कालावधीमध्ये पूर्ण करावी. मागेल त्याला शेततळे योजनेमध्ये जिल्ह्याला मिळालेल्या उद्दिष्टानुसार काम करावे. सर्व यंत्रणा व तालुक्यांनी  या योजनेतील उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच लाभार्थ्यांचे अनुदानाची रक्कम त्वरित त्यांच्या खात्यात जमा करावी. सन 2018-19 या वर्षासाठी उद्दिष्टानुसार जिल्ह्यात 255 गावांची निवड करावी. गावे प्रत्यक्ष परिस्थिती बघून निवडण्यात यावीत.
    ते पुढे म्हणाले, सर्व यंत्रणांनी शेततळे, सिमेंट नाला बांध, खोलीकरण आदी कामांचे जिओ टँगिंग करावे. जिओ टॅगिंग झाल्याशिवाय सदर काम पूर्ण झाले असल्याचे समजण्यात येणार नाही. त्यामुळे काम पूर्ण झाल्यानंतर त्वरित जिओ टॅगिंगसाठी फोटो अपलोड करावे. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानातील कामे पूर्ण करून शेतकऱ्यांना गाळ उपलब्ध करून द्यावा. तसेच भारतीय जैन संघटनेच्यावतीने जिल्ह्‌यात सुरू असलेल्या सुजलाम सुफलाम मोहिमेतंर्गत गाळ काढण्याचे काम युद्ध्‍ पातळीवर सुरू आहे. प्रशासनाच्यावतीने या कामामध्ये डिझेलचा पुरवठा करण्यात येत आहे. या कामात प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य देणार आहे.
  याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. फुलंब्रीकर, उपवनसंरक्षक बी.टी भगत आदींसह उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी आदींसह संबंधित यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                                            ********
जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन
·        23 एप्रिल ते 7 मे पर्यंत चालणार अभियान
  बुलडाणा, दि. 20 :  जिल्ह्यामध्ये अप्पर परिवहन आयुक्त यांच्या निर्देशानुसार 23 एप्रिल ते 7 मे 2018 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हाभर मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक व कर्मचारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे.
  जिल्ह्यात 23 एप्रिल रोजी बुलडाणा येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात खासदार प्रतापराव जाधव यांच्याहस्ते रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याप्रसंगी वाहनधारकांना वाहतूक नियम व प्रवाशांची सुरक्षितता आदींची माहिती देण्यात येणार आहे. मलकापूर येथे चौकात सभा घेवून रस्ता सुरक्षा विषयक बॅनर्स लावण्यात येणार आहे. तसेच 24 एप्रिल रोजी विभाग नियंत्रक एस.टी कार्यशाळा येथे वाहन चालकांकरीता रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शनपर सभा आयोजित केल्या जाणार आहे. तसेच वाहन चालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 25 एप्रिल रोजी दे. राजा येथे चौक सभा घेवून रस्ता सुरक्षा विषयक हॅन्डबिलचे वाटप करण्यात येणार आहे. दे. राजा शहरातील ऑटोरीक्षा चालक व टॅक्सीचालकांना मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात येणार आहे. पुढे 26 एप्रिल रोजी बुलडाणा येथे प्रजापिता ब्रह्याकुमारी यांचेकडून वाहन चालकांना सुरक्षेबाबत व  मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
   त्यानंतर 27, 28 व 29 एप्रिल रोजी खामगांव येथील शिबिर कार्यालयात रस्ता सुरक्षा विषयक बॅनर्स प्रदर्शित करणे, जनतेस रस्ता सुरक्षा विषयी माहिती देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रॉली या वाहनांवर रिफ्लेक्टर लावण्यात येणार आहे. महामार्गावरील वाहन चालकांना हेलमेट, सिटबेल्ट, ओव्हरलोड तपासणी आदींविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 30  एप्रिल रोजी  नांदुरा येथे बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रॉली या वाहनांवर रिफ्लेक्टर लावणे, ऑटोरीक्षा चालक व टॅक्सीचालकांना मार्गदर्शन करणे व वाहन चालकांना रस्ता सुरक्षा विषयक माहितीपत्रके वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर 1 मे 2018 रेाजी मेहकर येथे महामार्गावरील वाहन चालकांना हेलमेट, सिटबेल्ट, ओव्हरलोड तपासणी आदींविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
     तसेच 2 मे 2018 रेाजी बुलडाणा येथे शिकाऊ अनुज्ञप्ती करीता येणाऱ्या अर्जदारांना रस्ता सुरक्षिततेबाबत माहिती देणे व तपासणीकरीता कार्यालयात येणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात येणार आहे. पुढे 3 मे 2018 रेाजी बुलडाणा येथे सकाळी 7.30 वाजता रस्ता सुरक्षेविषयी वॉकेथॉन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित करण्यात येणार आहे. दि 4 व 5  मे रोजी जळगांव जामोद येथे शिबिर कार्यालयात रस्ता सुरक्षा विषयक बॅनर्स लावण्यात येणार आहे. तसेच अवैध प्रवाशी वाहतुकीबाबत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. सिटबेल्टशिवाय वाहन चालविणे, विहीत मर्यादेपेक्षा जास्त गतीने वाहन चालविणे व योग्यता प्रमाणपत्र तपासणीसाठी मोहिम राबविण्यात येणार आहे.  शेगांव येथे 6 मे रोजी अशाचप्रकारे मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच 7 मे रेाजी मेहकर येथे बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रॉली या वाहनांवर रिफ्लेक्टर लावणे, महामार्गावरील वाहन चालकांना हेलमेट, सिटबेल्ट, ओव्हरलोड तपासणी आदींविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
                                                                        *****
नागरी सेवा दिनाचे आज आयोजन
बुलडाणा, दि. 20  : दरवर्षी जिल्हा मुख्यालयात नागरी सेवा दिनाचे आयोजन करण्यात येते.त्या अनुषंगाने यावर्षी सुध्दा नागरी सेवा दिन कार्यक्रमाचे आयोजन उद्या 21 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. या दिनाचे औचि‍त्य साधून मा.पंतप्रधान,विज्ञानभवन, नवी दिल्ली येथे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण  जिल्हा पातळीवर नियोजन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात येणार आहे. नागरी सेवा दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय,बुलडाणा येथे 21 एप्रिल 2018 रोजी 3 ते 4.30 या वेळेत  नियोजन सभागृह येथे करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमासाठी  नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्व अधिकारी वर्गांनी उपस्थि‍त रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
                                                            *********
विधान परिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे यांचा दौरा
बुलडाणा, दि. 20  : महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे दि. 22 एप्रिल 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दि. 22 .4. 2018 रोजी सकाळी 10 वाजता यवतमाळ येथून मेहकरकडे प्रयाण, दु. 2 वाजता मेहकर येथे आगमन व शाम उमाळकर यांच्या निवास्थानी राखीव, दु. 3 वाजता मेहकर येथून चिखली-धाड-भोकरदन मार्गे सिल्लोड जि. औरंगाबादकडे प्रयाण करतील.
                                                            *******

No comments:

Post a Comment