Monday 6 November 2017

jalyukt shivar succes story

          यशकथा :

जलयुक्त पावले… ‘साखरखेर्ड्या’चे शिवार फुलले
  • भूजल पातळीत वाढ
  • तलांवामधील गाळ काढून जलसाठ्याचे निर्माण
    बुलडाणा, दि. 6 : जिल्ह्यातील अर्वषण ग्रस्त तालुका असलेला सिंदखेड राजा. कायम पाणीटंचाईने ग्रासलेला.. त्यातही साखरखेर्डा परीसर कायम पाणीटंचाईग्रस्त. अशा टंचाईग्रस्त भागाला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी या भागात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. 26 हजार लोकसंख्येचे मोठे गाव असलेल्या साखरखेर्डा गावाचा समावेश जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आला. गावच्या शिवारात मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. या कामांमुळे परिसरात पडून वाहत जाणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरत आहे. परिणामी विहीरींची पाणी पातळी वाढून रब्बी हंगाम शेतकरी घेत आहे.
   एवढ्या मोठी लोकसंख्या असलेल्या गावच्या पाणी पुरवठ्याची समस्या जलयुक्त शिवार अभियानामुळे भूजल पातळीत वाढ झाल्यामुळे निकाली निघण्यास यश मिळाले आहे. गावाला ऐतिहासिक व पौराणिकदृष्ट्या महत्वसुद्धा लाभलेले आहे. गावाच्या अवती भवती महालक्ष्मी, गायखेडी व काळ्या पाण्याचे असे तीन तलाव आहे. गावाला कोराडी प्रकल्पातून पाणी पुरविल्या जाते. गाव शिवारात 90 कामे मंजूर करण्यात आली, तर 79 कामे करण्यात आली आहे. या संपूर्ण कामांची माहिती सिमनीक संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे.
   साखरखेर्डा गावच्या शिवारात या अभियानातंर्गत सिमेंट नाला बांधातील गाळ काढणे व खोलीकरण यासह ढाळीच्या बांधाच्या कामांना शेतकऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. अभियानाच्या पहिल्या वर्षी साखरखेर्डा गावाची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे परिसरात 17 बंधाऱ्यांचे खोलीकरण व रूंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे परिसरातील विहीरींना जलसंजीवनी मिळाली आहे. त्याचप्रमाणे गावाच्या आसपास असलेल्या महालक्ष्मी, गायखेडी व काळ्या पाणी असलेल्या तलावातील लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आला.
   सिंदखेड राजा तालुक्यात साखरखेर्डा येथे 13 ठिकाणी नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले. सिमेंट नाला बांध, महालक्ष्मी व गायखेडी तलावांमधील अंदाजे 2 लाख 30 हजार ट्रॉली गाळ काढण्यात  आला आहे. त्यामुळे मागील 10 ते 15 वर्षात न दिसणाऱ्या विहीरींना पाणी आले आहे. तसेच कमी पाणी असणाऱ्या विहीरींची पाणी पातळी वाढली आहे. गावाची जलयुक्त शिवार अभियानातंर्गत निवड झाल्यानंतर गावात दिंडी, भजन अशा पारंपारिक माध्यमांतून जलजागृती करण्यात आली. तसेच शिवार फेरी काढून गाव शिवारातील जलसंधारण कामांचे ठिकाण निश्चित करण्यात आले. त्यानुसार जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. जलयुक्त शिवारच्या कामांमुळे अवर्षण पट्ट्यातील शेतकरी फळबागेकडे वळला आहे. डाळींब फळपिक शेतकरी घेत आहे. तसेच फुलशेतीकडे शेतकरी वळत पारंपारिक शेतीतून आधुनिक शेतीकडे वळला आहे. हा बदल सर्व भूजल पातळी वाढल्यामुळे झाला असून साखरखेर्डा गावचे शिवार पाणीदार झाले आहे. भूजल पातळी जलयुक्त शिवार अभियानामध्ये जलसंधारण व मृद संधारणाची  कामे प्रभावीरित्या झाल्यामुळे निश्चितच वाढली आहे.
                                                                        **********   
    




लोकशाही दिन कार्यवाहीतून न्याय मिळवून द्यावा
-         जिल्हाधिकारी
·        लोकशाही दिन कार्यवाहीत 5 तक्रारी प्राप्त
·        दोन तक्रारी निकाली

     बुलडाणा, दि.4 : सामान्य नागरिकांच्या तक्रारी निवारणासाठी लोकशाही दिन एक सशक्त माध्यम आहे. त्यामुळे लोकशाही दिन कार्यवाहीला नागरिक विविध विभागांच्या संबंधीत तक्रारी दाखल करीत असतात.  या तक्रारींवर विहीत कालावधीत कार्यवाही होवून तक्रारदाराला उत्तर मिळायला पाहिजे. तरी विभागांनी तक्रारींचे निसरन करून तक्रारदाराला समाधान द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज दिल्या. 
   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकशाही दिनाच्या कार्यवाहीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराज, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप डोईफोडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनेाज मेरत, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे, भूमि अभिलेख अधिक्षक श्री. जधवर, तहसीलदार शैलेश काळे आदींसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
     या लोकशाही दिनामध्ये एकूण 5 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच दोन तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. निकाली काढण्यात आलेल्या तक्रारी जिल्हा पोलीस अधिक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प बुलडाणा यांच्या संबंधित तक्रारींचा समावेश आहे. लोकशाही दिन कार्यवाहीला संबंधित यंत्रणांचे अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
******
जलयुक्त शिवार अभियानातील पुरस्कारांचे 8 नोव्हेंबर रोजी वितरण
  • अकोला येथे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्याहस्ते वितरण
    बुलडाणा, दि. 6 : जलयुक्त शिवार अभियानात 2015-16 मध्ये उल्लेखनिय कामे केलेली गावे, तालुक यांना मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्याहस्ते पुरस्कार वितरण 8 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी 3.30 वाजता अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात देण्यात येणार आहे. पुरस्कारांमध्ये जिल्ह्यात येऊलखेड ता. शेगांव या गावाने प्रथम क्रमांक पटकाविला असून साखरखेर्डा ता. सिं.राजा गावाने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तसेच आंबेटाकळी , अटाळी व फत्तेपूर ता. खामगांव गावांना अनुक्रमे तृतीय, चतुर्थ व पाचव्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
    तसेच तालुक्यांमध्ये खामगांव तालुक्याला प्रथम आणि दे.राजा तालुक्याला द्वितीय पुरस्कार मिळाला आहे.  सदर पुरस्कार स्वीकारण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक व जलयुक्त शिवार अभियानात सक्रीय सहभाग असलेली एक महिला प्रतिनिधी यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. तसेच तालुका स्तरावरील पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपविभागीय अधिकारी (महसूल), तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांना निमंत्रीत करण्यात आले आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                              ***********

No comments:

Post a Comment