Tuesday 13 June 2017

news 13.6.2017 dio buldana

इयत्ता दहावीचा 88.49 टक्के निकाल जाहीर
·        सिंदखेड राजा तालुक्याचा सर्वात जास्त 95.64 टक्के निकाल
·        मुलांच्या निकालाची टक्केवारी 86.41, तर मुलींची 91.88 टक्के
·        परीक्षेला बसलेल्या 40 हजार 652 विद्यार्थ्यांपैकी 35 हजार 972 विद्यार्थी उत्तीर्ण
·        अमरावती विभागात बुलडाणा जिल्हा अव्वल   
  बुलडाणा, दि.30 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी घेतलेल्या इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल ऑनलाईन निकाल आज 13 जून 2017 रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत बुलडाणा जिल्ह्याने अमरावती विभागात भरारी घेतली असून जिल्ह्याचा एकूण निकाल 88.49 टक्के नोंदविण्यात आला आहे. विभागात सर्वात जास्त निकाल बुलडाणा जिल्ह्याचा लागला आहे.
  जिल्ह्यात इयत्ता 10 वी परीक्षेसाठी 22 हजार 943 विद्यार्थी, तर 17 हजार 853 विद्यार्थीनी अशाप्रकारे एकूण 40 हजार 796 परीक्षार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 22 हजार 854 विद्यार्थी व 17 हजार 798 विद्यार्थीनी अशाप्रकारे एकूण 40 हजार 652 परीक्षार्थींनी परीक्षा दिली. त्यापैकी 19 हजार 747 विद्यार्थी, तर 16 हजार 225 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्णतेमध्ये एकूण 35 हजार 972 परीक्षार्थी आहेत.
  बुलडाणा जिल्ह्यात सर्वात जास्त 95.64 टक्के निकाल सिं.राजा तालुक्याचा लागला असून त्यापाठोपाठ देऊळगाव राजा तालुक्याचा 93.78 टक्के निकाल आहे. त्याचप्रमाणे चिखली तालुका 92.85, बुलडाणा 99.31, लोणार 91.27, मलकापूर 90.97, मेहकर 88.79, मोताळा 87.83, संग्रामपूर 86.65, खामगांव 84.86, जळगांव जामोद 82.14, नांदुरा 81.84आणि सर्वात कमी 80.25 टक्के निकाल शेगांव तालुक्याचा आहे.  मुलांच्या निकालाची टक्केवारी जिल्ह्यात 86.41 मुलांच्या निकालाची टक्केवारी असून मुलींच्या निकालाची 91.88 टक्के आहे. अशाप्रकारे जिल्ह्याचा एकूण निकाल 88.49 टक्के लागला आहे.
                                                                        *****
वर्तमान काळातील ग्राहक हिताच्या तक्रारींचा समावेश असावा
-         जिल्हाधिकारी
  • ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक
बुलडाणा, दि‍.13 - ग्राहक संरक्षण परीषदेच्या माध्यमातून येणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारी व अडचणी तातडीने सोडविल्या जातात. मात्र अनेक वर्षापूर्वीच्या तक्रारींचा समावेश नसावा. ज्यामुळे अशा तक्रारींचे रेकॉर्ड उपलब्ध करण्यातच खूप वेळ जातो आणि तक्रार प्रलंबित राहते. याव्यतिरिक्त परिषदेच्या अशासकीय सदस्यांनी वर्तमान काळात ग्राहकांना भेडसावत असलेल्या समस्या, तक्रारी यांचा समावेश या परिषदेच्या बैठकीत करावा, असे  जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज सांगितले.
     ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन आज 13 जून 2017 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु काळे, अशासकीय सदस्य संजय जोशी, अमरचंद संचेती, महावितरचे कार्यकारी अभियंता, श्री. सोनकुसरे, मलकापूरचे कार्यकारी अभियंता श्री. पवार,  बीएसएनएलचे श्री. राजोरीया आदी उपस्थित होते. महावितरणकडून कंत्राट दिलेली कंपनी ग्राहकांना उशीरा वीज देयके देत असल्याबाबत  जिल्हाधिकारी म्हणाले, अशा कंपनीकडून महातिवरणने कंत्राट काढून घ्यावा. ग्राहकांना वेळेत वीज देयके द्यावीत. उशीरा वीज देयके दिल्यामुळे ग्राहकांना नाहक विलंब शुल्काचा भुर्दंड सहन करावा लागतो. अशाप्रकारच्या विलंब शुल्काची आकारणी या कंपनीकडूनच करण्यात यावी.  
    यावेळी अशासकीय सदस्यांनी विविध तक्रारी मांडल्या. त्यांचे निरसन केल्या गेले. बैठकीचे आभार जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी मानले. याप्रसंगी  पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी, संबंधित यंत्रणांचे अधिकारी, अशासकीय सदस्य आदी उपस्थित होते.
                                                                   *****
खामगाव येथे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन मेळाव्याचे आज आयोजन
बुलडाणा, दि‍.13 – शासकीय तंत्रनिकेतन, खामगांव येथे व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन उद्या 14 जून 2017 रोजी सकाळी 11.30 वाजता करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत पदविका/पदवी/ पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे महत्वाचे टप्पे, सुविधा केंद्र व प्रवेश निश्चिती केंद्र यांची माहिती देण्यात येणार आहे. वर्ष 2017-18 साठी शासकीय तंत्रनिकेतन, खामगांव या संस्थेची प्रवेश निश्चिती केंद्रासाठी निवड केली आहे.तरी इच्छुक विद्यार्थ्यानी उपस्थित रहावे, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन यांनी केले आहे.
****
बालकामगार विरोधी दिन साजरा
बुलडाणा, दि‍.13- सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्यावतीने 12 जून 2017 रोजी बाल कामगार विरोधी दिन साजरा करण्यात आला. बाल कामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात  विविध कामगार संघटनेचे पदाधिकारी तथा प्रतिनिधी, बांधकाम कामगार, बालकामगार संरक्षण अधिकारी आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
    याप्रसंगी प्रास्ताविक सरकारी कामगार अधिकारी टि.एस काकडे यांनी केले. ते म्हणाले, भारताच्या उज्जवल भविष्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे. त्यामुळे लहान बालकांना शिक्षणाचा अधिकार मिळावा, त्यांचे बालपण काम करण्यात हिरावल्या जावू नये, यासाठी समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना आणण्याची गरज आहे. या सर्व परिस्थितीत बाल कामगार अधिनियम महत्वाची भूमिका बजावतो.
    महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार मजूर संघटनेचे अध्यक्ष अतिष बिडकर यांनी कामगारांच्या योजनांविषयी माहिती दिली. बालकामगार संरक्षण अधिकारी शहनवाज खान यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. दुकाने निरीक्षक ग.ग नंद्रेकर यांनी बालकामगार व त्यांच्या समस्या याबाबत मार्गदर्शन केले. संचलन यो. वि गोटे यांनी केले. कार्यक्रमाला कार्यालयीन कर्मचारी म. अ. पुसदकर, प. श्री. काकडे यांच्यासह कामगार उपस्थित होते.
                                                                        ****
बेटी बचाओ-बेटी पढाओ मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे
-         जिल्हाधिकारी
  • बेटी बचाओ-बेटी पढाओ अंतर्गत सरपंच कार्यशाळा
बुलडाणा, दि‍.13 – मुलींचा घसरता जन्मदर हा कुठल्याही समाजाला भूषणावह नाही. प्रत्येक समाजाने मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जनजागृती करावी. स्त्री लिंग गुणोत्तर प्रमाण संतुलीत ठेवण्यासाठी शासकीय स्तरावर विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्य होत असते. केंद्र शासनाने हेच हेरून बेटी बचाओ- बेटी पढाओ मोहिम देशभर सुरू केली आहे. या मोहिमेत सर्वांनी सहभाग नोंदवून मुलींच्या जन्माचे स्वागत करावे, असे आवाहल जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. स्थानिक सहकार विद्या मंदीर येथील सांस्कृतिक सभागृहात आयोजित सरपंच, ग्रामसेवक कार्यशाळेत बोलत होते.
   यावेळी व्यासपीठावर जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार डॉ. शशीकांत खेडेकर, जि.प सभापती श्रीमती श्वेताताई महाले, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना, जिप सदस्या श्रीमती सिनगारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, श्रीमती जयश्रीताई शेळके, श्रीमती निता खेडेकर, श्रीमती सविताताई बाहेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार आदी उपस्थित होते.
   यावेळी श्रीमती उमाताई तायडे यांनी बेटीच्या सन्मानासाठी कुटूंबाने शौचालय बांधण्याचे आवाहन केले. तसेच आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी बेटीचे कुटूंबातील महत्व विषद करीत आपले गाव 100 टक्के हगणदारीमुक्त करण्यावर भर दिला. आमदार डॉ शशीकांत खेडेकर यांनीही समाजाने मानसिकता बदलवून स्त्री जन्माचे स्वागत करण्याचे मत मांडले. सभापती श्रीमती श्वेताताई महाले यांनी मुलींकरीता गर्भलिंग निदान न करणे, मुला-मुलीत भेदभाव न करणे याबाबत उपस्थितांना शपथ दिली.
   पोलीस अधिक्षक श्री. मीना यांनी पोलीस विभागाच्यावतीने मुलींच्या संरक्षणाकरीता हाती घेतलेल्या उपक्रमाची माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन यांनी सर्व ग्रामपंचायतींना गुड्डा-गुड्डी बोर्ड व नवीन जन्मलेल्या मुलींचे फोटो संग्रहित करून ग्रा.प कार्यालयात लावण्याचे आवाहन केले.

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांनी केले. कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) श्री. मेसरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. यादव, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र गोफणे, साथरोग अधिकारी डॉ. विजय पाटील, सरपंच व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment