Thursday 15 September 2016

news 15.9.16 dio buldana

                                                यशोगाथा
जलयुक्त पावले.. शिवार फुलले  !
40 हजार 167 टीसीएम पाणीसाठा उपलब्ध
17 हजार 620 हेक्टर क्षेत्रावर दोन वेळेच्या संरक्षित सिंचन
दुष्काळ.. अनावृष्टी.. शाश्वत सिंचनाची वानवा असे पाचवीला पुजलेले शब्द सारखे आपल्या कानावर पडत असतात. दुष्काळाची दाहकता आपल्या भागातील शेतकऱ्यांनी सातत्याने अनुभवली आहे. अनावृष्टीमुळे करपणारी पिके आपण अनुभवली आहे. त्यामुळे शाश्वत सिंचनाने ही पिके वाचली पाहिजेत. शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध नसल्यामुळे पीके हातची जाताना पाहताना खेदही होतो. आता मात्र असा खेद करण्याची पाळी शेतकऱ्यांवर येणार नाही. राज्य शासनाचे महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानामुळे सर्वत्र शिवार फुलले आहेत.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या गावांमधील पाण्याचा ताळेबंद  तयार करुन गावात पाण्याची उपलब्धता व आवश्यकता किती आहे व त्याकरिता कोणकोणते तंत्रज्ञान अंवलंबविण्याची आवश्यकता आहे, हे शिवार फेरी करुन ठरविण्यात येवून त्यानुसार गावाचा आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यास ग्रामसभेची, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांची मान्यता घेण्यात आल्यानंतर गावातील कामांना  सुरुवात होते. गावशिवारातील वाहून जाणारे पाणी विविध पद्धतीने शिवारातच अडविले जाऊन गावामध्ये विकेंद्रीत स्वरुपाचे पाणीसाठे निर्माण करणे, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे, गाळ काढणं, खोलीकरणे आणि रुंदीकरण करणे, ओढे, नदी पुन:र्जिवन प्रकल्प राबविणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
     जलयुक्त शिवार अभियानुसार जलसंधारण व मृदसंधारणाचे खूप मोठे काम जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यातील 330 गावांची पहिल्या टप्प्यासाठी निवड करण्यात आली. तसेच दुसऱ्या टप्प्यात 245 गावे निवडण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील  330 गावांमध्ये विविध प्रकारची कामे सुरू असून  6 हजार 454 कामे पूर्ण झाली, तर 425 कामे प्रगतीपथावर आहे. या कामांवर आतापर्यंत 117 कोटी रूपये खर्च झालेले आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यात 66 कामे सुरू आहेत. जलयुक्त शिवार अभियानातंर्गत जिल्ह्यातील प्रमुख नद्यांवर मोठ्या प्रमाणावर साखळी सिमेंट नाला बांधण्यात आले. अशाप्रकारे जिल्ह्यात 365 साखळी  सिमेंट नाला बांधांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे 1825 टी.सी.एम पाणीसाठा निर्माण झाला आहे. यावर्षीच्या समाधानकारक पावसामुळे सर्व बंधारे भरून वाहत आहे.  तसेच मागील वर्षात जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता जिल्ह्यात  मोठ्या प्रमाणावर गाळ काढणे, खोलीकरण व रूंदीकरणाची कामे करण्यात आली. ती सर्व नदी- नाले, बंधारे आता ओसंडून वाहत आहे.
   एकंदरीतच या अभियानामुळे जिल्ह्यात 40 हजार 167 टी.सी.एम पाणीसाठा निर्माण झाला असून 33 हजार 28 हेक्टर क्षेत्रावर एक वेळच्या संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. तर 17 हजार 620 हेक्टर क्षेत्रावर दोन वेळेच्या संरक्षित सिंचन होऊ शकणार आहे. जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे भूजल पातळीत कमालीची वाढ झाली आहे. हे अभियान  शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे.  या अभियानातंर्गत जिल्ह्यात प्रामुख्याने नाला, ओढा, नदी यामधील गाळ काढणे, खोलीकरण, रुंदीकरण करणे अशी कामे लोकसहभागातून झालेली आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन 2015-16 मध्ये अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण 1396 गावांची निवड करण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये  एकूण 33 हजार 255 कामे पूर्ण झालेली आहेत.  
जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत सन 2016-17 मध्ये बुलडाणा जिल्ह्यात 245 गावांची निवड करण्यात आली असून या गावामध्ये कामे सुरू आहेत. जनमानसांचा, शेतकऱ्यांचा विकास साधावा, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका येथील अन्नदात्याला सोसावा लागू नये यासाठी ‘जलयुक्त शिवार’ अल्पखर्चाची, शेतकऱ्यांना तारणारी संकल्पना अख्ख्या महाराष्ट्रात राबविली जात आहे. परंतू कोणतीही संकल्पना तडीस नेण्यासाठी, जनहिताचा निर्णय घेतांना, त्या परिकल्पनेचा परीघ वाढावा म्हणून आवश्यक बाब म्हणजे लोकसहभाग. कोणत्याही शासकीय योजनेची यशस्विता ही लोकसहभागावर अवलंबून असते. म्हणून ‘जलयुक्त शिवार’ या महत्वाकांक्षी योजनेची पूर्तता करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे.
***
सहकार पुरस्कारासाठी अर्ज करावे
बुलडाणा दि. 15- सन 2015-16 मध्ये सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देऊन त्यांचा उचित गौरव करण्यासाठी शासनाने गतवर्षी प्रमाणे सहकार पुरस्कार देण्याचे ठरविले आहे. तरी इच्छुक संस्थांनी, त्यनुसार सविस्तर प्रस्ताव तयार करुन ज्या तालुक्यात त्यांचे मुख्यालय आहे त्या तालुक्याचे संबंधीत सहाय्यक निबंधक यांच्या कायार्घ्लयात  15 सप्टेंबर 2016 ते 07 ऑक्टोबर 2016 पर्यंत सादर करावेत.
या संदर्भातील माहितीसाठी संस्थांनी संबंधीत सहाय्यक निबंधक/जिल्हा उपनिबंधक/विभ्ज्ञागीय सहनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहकार विभागातर्फे करण्यात येत आहे.
**
मानसेवी होमगार्ड सदस्य नोंदणी
बुलडाणा दि. 15- जिल्हयातील 07  तालुका पथकानुसार रिक्त अनुशेषाप्रमाणे (पुरुष 140 व महिला 74) पुरुष व महिला उमेदवारांची सदस्य नोंदणी 15ऑगस्ट पर्यंत घेण्यात आलेली होती. सदर नोंदणी प्रक्रियेकरिता एकुण 1298 पुरुष व 104 महिला उमेदवार यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी शारीरिक चाचणीमध्ये एकूण 558 पुरूष व 92 महिला उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले. त्यापैकी केवळ एकच महिला उमेदवार मैदानी चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झल्याने त्या पात्र ठरल्या आहेत.  गुणानुक्रमे एकुण 136 पुरुष उमेदवार व 1 महिला उमेदवार यांची गुणवत्तेनुसार व नियमाप्रमाणे निवड झालेली आहे.
निवड झालेल्या उमेदवारांची निवड यादी 11 स्प्टेंबर रोजी सर्व सातही तालुका समोदशक अधिकारी होमगार्ड पथकाच्या ठिकाणी व संबंधित तालुका पोलीस स्टेशनाला लावण्यात आलेल्या आहेत. निवड झालेल्या उमेदवारांनी तालुका होमगार्ड कार्यालय येथे संपर्क साधुन इतर माहिती जाणुन घ्यावी. उमेदवारांनी नोंदणी प्रक्रियेच्या वेळी दाखल केलेली कागदपत्रे 19 सप्टेंबर  ते 23 सप्टेंबर 2016 दरम्यान जिल्हा होमगार्ड कार्यालय, बुलडाणा येथुन कार्यालयीन वळेत घेऊन जावीत. निवड झालेल्या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील होमगार्ड पथकाचे कार्यालयात त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती श्वेता खेडेकर जिल्हा समादेशक होमगार्ड यांनी केले आहे.
**
18 वर्षाखालील वाहन चालविणाऱ्या मुलांवर होणार कारवाई
बुलडाणा दि. 15-मोटार वाहन कायदा 1988 व केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मध्ये नमूद केलयाप्रमाणे 18 वर्षाखालील वाहन चालविणाऱ्या मुलासंदर्भात वाहन मालकास शिक्षा करण्याची तरतूद आहे. मोआर वाहन कायदा 1988 च्या कलम 4 अन्वये सार्वजनिक ठिकाणी 50 सीसी पेक्षा जास्त क्षमतेचे वाहन चालविणऱ्या व्यक्तीस व कलम 18 मध्ये सार्वजनिक ठिकाणी 20 वर्षाखालील व्यक्तीने वाहन चालविल्यास वाहन मालकास तुरूंगवासाची शिक्षा आहे. तसेच 1 हजार रूपये दंड अथवा दोन्ही शिक्षा आहे. असे निर्दशनास आल्यास कारवाई करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे.
**
अजिसपूर येथे शासकीय योजनांचा जागर
संवादपर्व कार्यक्रमातंर्गत कलापथकाच्या माध्यमातून प्रसार
बुलडाणा दि. 15- तालुक्यातील अजिसपूर येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संवादपर्व 2016 कार्यक्रमातंर्गत जिल्हा माहिती कार्यालय, बुलडाणाच्यावतीने अजिसपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात शासनाच्या विविध योजनांचा जागर करण्यात आला. नांद्राकोळी येथील जनसेवा सांस्कृतिक कलापथक मंडळाने विविध शासकीय योजनांवर आधारीत कला सादर केली.
  जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे कसे शेतकऱ्याच्या लाभाचे आहे, याबाबत पारंपारिक वेशभूषेत कलापथक सादर करण्यात आले. अटल सौर कृषि पंप योजना, पशुधन विमा योजना, सावकारग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी याकृषि संबंधीत योजनांवर नाटीकेच्या माध्यमातून कला सादर करण्यात आली. महात्मा फुले जनआरोग्य अभियान, बेटी बचाओ-बेटी पढाओ, स्वच्छ भारत अभियान यासाठी खास वेशभुषा कलाकारांनी धारण केली.
  ग्रामस्थांनी यावेळी विविध योजनांविषयी माहितीही विचारली. अशाप्रकारे दुतर्फा संवाद साधण्यात आला. ग्रामस्थांनी विविध शासकीय योजनांविषयीच्या शंका विचारल्या. शासन राबवित असलेल्या योजनांमधून सामान्य माणसाचा कसा विकास होवू शकतो, याबाबतचे प्रात्याक्षिकच त्यांनी सादर केले.
  सर्वप्रथम गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरूपात झाली. यावेळी अजिसपूरचे सरपंच बाळ जगताप, तसेच परमेश्वर बापुराव, विलास मुळे, किशोर जाधव, भास्कर जाधव, संदेश चवरामोळ आदींसह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment