Saturday 2 July 2016

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, बुलडाणा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
बस स्थानकासमोर,  प्रशासकीय इमारत, तळमजला, बुलडाणा- 443001
दूरध्वनी- 242341,      फॅक्स- 242741           E-Mail : diobuldana@gmail.com
वृतक्रमांक- 497                                                                           दि. 2  जुलै 2016

बोगस बियाण्यांपासून शेतकऱ्यांनी सावध रहावे
  • जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांचे आवाहन
बुलडाणा, दि. 2 -  खरीप हंगाम सुरू असून या हंगामात बोगस बियाणे बाजारात येण्याची शक्यता आहे. या नकली बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होवू शकते. शेतकऱ्यांना कमी किमतीचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना असे बियाणे खरेदी करण्यास प्रवृत्त केल्या जाते. बोगस बियाणेपासून  शेतकऱ्यांना कमी उत्पादन, प्रसंगी शून्य उत्पादन येते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. अशावेळी शेतकऱ्यांनी जे अधिकृत विक्रेते आहे, त्यांच्याकडूनच खते, बियाणे व आवश्यक साहित्यांची खरेदी करावी. बियाणे, खते खरेदी करताना पावती घ्यावी व आपले होणारे नुकसान टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी केले आहे.   
     जिल्ह्यातील सर्व पूर्णवेळ व अर्धवेळ गुण नियंत्रक अधिकारी यांनी धडक तपासणी मोहिम हाती घेऊन सर्व निविष्टा केंद्राची तपासणी करावी. यामध्ये जर काही आक्षेपार्ह साहित्य आढळल्यास संबंधित विक्रेत्यांचे परवाने निलंबित करावे व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.  याबाबत शेतकऱ्यांना काही अडचण असल्यास कृषि विभागाच्या 18002334000 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
                                                                        *******
लाळ खुरकत लसीकरण मोहिम 11 जुलैपासून सुरू
बुलडाणा, दि. 2 -  जिल्ह्यात लाळ्या खुरकत रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आणि प्रतिबंध मिळविण्यासाठी 11 जुलै 2016 पासून लाळ खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम 10 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. हा रोग विषाणुजन्य असून संसर्गजन्य असल्याने परिसरात याची मोठ्या प्रमाणावर लागण होते. या रोगामुळे पशुपालन व दुग्धव्यवसायाला मोठ्या प्रमाणावर हानी पोहचते.
   तरी सर्व गोपालक व पशुपालकांनी आपल्या जनावरांना लसीकरण करून घ्यावे. राज्य शासनाने या उपक्रमाला स्वस्थ्य पशु खुशहाल किसान, उत्पादक पशु संपन्न किसान हे बोधवाक्य दिले आहे. या मोहिमेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जायभाये यांनी केले आहे.
*********
अनुसूचित जाती व नव बौद्ध घटकातील युवक-युवतींना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण
* 5 जुलै 2016 रोजी होणार चाचणी
बुलडाणा, दि. 2 -  अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवक-युवतींना सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजनेतंर्गत प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. अशा उमेदवारांसाठी 5 जुलै 2016 रोजी सकाळी 11 वाजता सहायक आयुक्त समाज कल्याण, सामाजिक न्याय भवन, त्रिशरण चौक, चिखली रोड, बुलडाणा येथे आवश्यक त्या मुळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे.
  या निवड चाचणीसाठी उमेदवार हा राज्याचा रहिवासी व अनुसूचित जाती, नव बौद्ध प्रवर्गातील असावा, 18 ते 25 वर्ष वयोगटातील असावा, उमेदवारांची उंची पुरूष 165 से.मी, महिलांकरिता उंची 155 से.मी, छाती पुरूष 79 से.मी व फुगवून 84 से.मी असावी, उमेदवार हा इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा, उमेदवाराने जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, सेवायोजन कार्यालयातंर्गत नाव नोंदणी दाखला व ओळखपत्राची सत्यप्रत द्यावी, उमेदवार हा शारिरीकदृष्ट्या निरोगी व सक्षम असावा. या अटींची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांनी निवड चाचणीला उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.
**********

6 जुलै रोजी होणारे अपंग बोर्ड रद्द
बुलडाणा, दि. 2 -  जिल्हा सामान्य रूग्णालय व सामान्य रूग्णालय, खामगांव येथे नियमितपणे अपंग बोर्ड सुरू असते. मात्र दि 6 जुलै 2016 रोजी रमजान ईद असल्यामुळे शासकीय सुट्टी आहे. त्यामुळे पहिल्या बुधवरी 6 जुलै रोजी चे नेत्र व मतिमंद संबंधित जिल्हा रूग्णालय बुलडाणा येथील व सामान्य रूग्णालय, खामगांव येथील अस्थिव्यंग संबंधित अपंग बोर्ड रद्द करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी बुलडाणा व खामगांव येथे अपंग तपासणीस येवू नये. आल्यास गैरसोय झाल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.
*********
महावितरण कार्यालय परिसरात 2650 झाडांची लागवड
बुलडाणा, दि. 2 -  महावितरण कार्यालय परिसरात महावितरणच्यावतीने 2280 उद्दिष्टापेक्षा जास्त 2650 झाडांची लागवड करण्यात आली आहे. या रोपांचे पालकत्वही कार्यालयाने स्वीकारले आहे.  वन महोत्सवाच्या निमित्ताने महातिवरण कार्यालयाने हिरीरीने सहभाग घेवून वृक्षारोपण केले. सर्वप्रथम अधिक्षक अभियंता जी. एम कडाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्ष संगोपनाची शपथ घेण्यात आली. तसेच त्यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
   त्याचप्रमाणे विद्युत भवन ते 33 के.व्ही उपकेंद्र चिखली रोड पर्यंत वृक्ष दिंडी काढण्यात आली. या वृक्षदिंडीमध्ये महावितरणचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*****
             


No comments:

Post a Comment