Monday 15 February 2021

DIO BULDANA NEWS 15.2.2021

 जिल्ह्यात महारेशीम अभियानाची सुरूवात

  • रेशीम रथास जिल्हाधिकारी यांनी दिली हिरवी झेंडी

  बुलडाणा,(जिमाका) दि. 15 : जिल्हा रेशीम कार्यालयमार्फत सन 2021-22 मध्ये रेशीम शेतीसाठी लाभार्थी निवड करण्यासाठी महा-रेशीम अभियान 2021 ची सुरूवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांचे हस्ते महा रेशीम अभियानाचे रेशीम रथास हिरवा झेंडा दाखवून उद्‌घाटन करण्यात आले. अभियानाच्या उदघाटनप्रसंगी उप जिल्हाधिकारी (रोहयो) अनिल माचेवाड, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, प्रकल्प अधिकारी सुनील दत्त फडके, तसेच भैरूलाल कुमावत, मुकुंद घाटे,  रामदास आटोळे, श्रीपाद कलंत्रे, सचिन श्रीवास्तव, शिवप्रसाद मुंगळे, पवन शिंदे, दत्तात्रय शिंदे, जगदीश गुळवे, श्री. पारवे आदी उपस्थित होते.

     याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती म्हणाले, बागायत क्षेत्र असलेल्या निवडक गावांच्या समुहामध्ये रेशीम शेतीस मोठया प्रमाणावर वाव असल्याने शेतकऱ्यांनी अभियान कालावधीमध्ये रेशीम शेती करण्यासाठी नोंदणी करून मोठया संख्येने सहभागी करून घ्यावे. वातावरण बदलामुळे पारंपारीक शेतीमधुन शेतकऱ्यांना निश्चित व शाश्वत उत्पन्न मिळणे दिवसेंदिवस जिकिरीचे होत चालले आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांनी हमखास शाश्वत उत्पन्नाची हमी असलेल्या रेशीम शेतीकडे वळावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

  तुती पिकास शासनाने कृषि पिक म्हणुन घोषित केल्यामुळे इतर पिकाप्रमाणेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दूप्पट करणेसाठी रेशीम शेती उपयुक्त ठरणार आहे. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत रेशीम शेतीस अनुदान दिले जाते. यामध्ये तुती रोपवाटिका तयार करणे, सुधारित वाणाची तुती लागवड करणे, रेशीम कीटक संगोपन गृह बांधणे, संगोपन साहित्य खरेदी करणे या घटकांचा समावेश आहे, असे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले.     

   रेशीम अंडीपुजांसाठी 75 टक्के व कोष उत्पादनावर प्रती किलो कोषास 50 रूपये जिल्हा वार्षिक योजनेमधुन अनुदान देण्यात येत असल्याचे प्रकल्प अधिकारी सुनील फडके यांनी सांगितले. अभियान कालावधीमध्ये रेशीम शेतीस वाव असलेल्या निवडक गावामध्ये रेशीम शेती करण्यसाठी रेशीम कर्मचारी,शास्त्रज्ञ, रेशीम उद्योजक व कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेशीम रथाच्या माध्यमातुन जिल्हाभर विस्तार कार्यक्रम घेऊन जनजागृती द्वारे शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. जिल्हयास सन 2021-22 करिता देण्यात आलेल्या 200 एकर तुती लागवडीचा लक्षांक पुर्ततेसाठी अभियान कालावधीमध्ये जिल्हयातील निवडक गावामध्ये रेशीम शेतीचा प्रचार व प्रसिदधी करण्यासाठी विविध कार्यक्रम घेऊन नविन तुती लागवडीकरिता लाभार्थी निवड निश्चित करण्यात येणार आहे.

   रेशीम कोषास प्रति किलोस 350 ते 450 रूपयांपर्यंत बाजारभाव मिळत असल्यामुळे रेशीम शेतीस चांगले दिवस आले आहेत. अती वृष्टीमुळे जिल्हयात एकाही शेतकऱ्याचे तुती पिकाचे नुकसान झालेले नाही, याउलट कोरोना कालावधीमध्येही शेतकऱ्यांना रेशीम शेतीपासून शाश्वत उत्पादन मिळाले ही अत्यंत आनंदाची बाब आहे. चालू वर्षी जिल्हयात पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे शेतकऱ्याकडे सिंचनाची मुबलक सुविधा निर्माण झालेली आहे. त्यामुळे रेशीम शेतीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन रेशीम प्रकल्प अधिकारी यांनी केले.

अशी आहे रेशीम कोष उत्पादन योजना

   जिल्हयात मनरेगा अंतर्गत तुती लागवडीद्वारे रेशोम कोष उत्पादन योजना राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत प्रति एकर (1 एकर मर्यादित ) रक्कम रू. 2,13,010 अकुशल (मजूरी स्वरूपात) व कुशल रक्कम रू 1,10,780 अशी एकूण  3,23,790 रूपये कामाचा मोबदला तीन वर्षात विभागून देण्यात येतो. या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी शेतकरी हा अल्पभुधारक असावा. रेशीम शेतीसाठी लाभार्थ्याकडे स्वमालकीची जमीन व कुटूंबाचे मनरेगा जॉब कार्ड असावे. या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी गावामध्ये किमान 10 ते 25 शेतकऱ्यांचा गट असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्याकडे बारामाही सिंचनाची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी तुती लागवड करण्यासाठी अभियान कालावधीमध्यें नोंदणी करावी.  रेशीम शेती हा शाश्वत उत्पन्न देणारी, कुटुंबातील सर्व व्यक्ती करू शकणारा शेतीवर आधारीत जोडधंदा असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भाग घ्यावा असे आवाहन केले.  रेशीम शेतीमध्ये सहभाग घेण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय, धाड रोड, मुट्ठे ले आउट, भोंडे हॉस्पिटल जवळ, बुलडाणा येथे संपर्क करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

***********

शासकीय हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू

  • जिल्ह्यात 10 खरेदी केंद्रांना मान्यता ; 5100 प्रति क्विंटल हमी भाव

बुलडाणा,(जिमाका) दि. 15 : जिल्ह्यात चालू हंगाम 2020-21 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने हरभरा खरेदी हमीदर 5100 रुपये प्रती क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी 15 फेब्रुवारी 2021 पासून शासकीय हरभरा खरेदी सुरू करण्यात आली आहे.

  हरभरा खरेदीसाठी जिल्ह्यात 10 खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली  आहे. जिल्ह्यातंर्गत बुलडाणा तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, देऊळगांवराजा तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, लोणार तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, मेहकर तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, शेगांव तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, संग्रामपुर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, संत गजानन कृषी विकास शेतकी उत्पादन कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोडयुसर कंपनी सुलतानपुर केंद्र साखरखेर्डा ता. सिं.राजा, मॉ जिजाऊ फार्मर प्रोडयुसर कंपनी सिंदखेडराजा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था चिखली केंद्र उंद्री ता. चिखली, अशी 10 खरेदी केंद्रांना हरभरा खरेदी करीता मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यात  15 फेब्रुवारी 2021 रोजी पासून नोंदणी सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

     हरभरा खरेदी नोंदणी करण्याकरीता शेतकऱ्यांनी आधारकार्ड, 7/12 ऑनलाईन पिक पेरासह, बँक पासबुकाची आधार लिंक केलेली झेरॉक्स, मोबाईल क्रमांक आदी कागदपत्रांसह संबंधित खरेदी केंद्रावर जाऊन खरेदी करीता नोंदणी करावी, असे आवाहन  जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

00000000

सुंदर गाव व तालुका सुंदर गाव स्पर्धेचे आज प्रमाणपत्र वितरण

बुलडाणा,(जिमाका) दि. 15 : शासन निर्णयानुसार कै. आर. आर. आबा (पाटील) यांच्या पुण्यतिथी निमित्ति दि. 16 फेब्रुवारी 2021 रोजी सन 2020-21 मध्ये जिल्हास्तरीय ‘सुंदर गांव’ व ‘तालुका सुंदर गांव’करीता क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींना प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे. सदर प्रमाणपत्र वितरण समारंभ दुपारी 1 वाजता श्री. छत्रपती शिवाजी सभागृह, बुलडाणा येथे जि. प अध्यक्ष, उपाध्यक्ष,  सर्व समिती सभापती तसेच जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला  आहे, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जि.प यांनी कळविले आहे.

00000000

रिदास इंडिया प्रॉपर्टीज कंपनीच्या नावाने आर्थिक फसवणूक

  • या कंपनीच्या नावाने फसवणूक झाली असल्यास कागदपत्रे सादर करावी
  • आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि. 15 : शहर पोलिस स्टेशन येथे दि. 27 ऑक्टोबर 2020 रोजी फिर्यादी मो. साजीद अबुल हसन देशमुख वय 34 वर्षे रा. इकबाल नगर, टिपू सुलतान चौक, बुलडाणा यांनी फिर्याद दिली नोंदवली आहे. फिर्यादीमध्ये  रिदाज इंडीया प्रॉपर्टीज कंपनी बेंगलोर, शाखा औरंगाबाद या कंपनीने औरंगाबाद टाईम्स व एशिया एक्सप्रेस वर्तमानपत्रात जाहीरात दिली की 50 हजार रुपये सदर कंपनीमध्ये गुंतवणुक केल्यास प्रत्येक महीन्याला 2650 ते 3125 रुपये नफ्यापोटी परतावा मिळणार. तसेच मुळ रक्कम परत पाहीजे असल्यास 40 दिवसात रक्कम परत मिळेल व औरंगाबाद जिल्ह्यामध्ये रोड टच प्लॉट पाहीजे असल्यास स्वस्त दरात मिळेल, अशी जाहीरात दिली.  फिर्यादी व इतर नातेवाईक यांनी जाहीरातीवरून एकुण 11,50,000 रुपये सदर कंपनीमध्ये गुंतवणुक केली आहे.

   सदर कंपनीने काही महीने परताव्या पोटी फिर्यादी व इतर गुंतवणुकदार यांच्या बँक खात्यात काही रक्कम जमा केली. परंतु नंतर जाहीराती प्रमाणे रक्कम जमा न करता रिदास इंडिया प्रॉपर्टीज कंपनीने डायरेक्टर आरोपी अयुब हुसेन व अनिस आयमन रा. बेंगलोर यांनी फिर्यादी व इतर गुंतवणुकदार यांचा विश्‍वासघात करुन फसवणूक केली आहे. या रिपोर्टवरून बुलडाणा शहर पोलिस स्टेशन मध्ये अपराध क्रमांक 778/2020 कलम 409,406,420,34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांचे आदेश व मार्गदर्शनरप्रमाणे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचे नेतृत्वात पो. उप. नि. कैलास राहणे, पो. हे. कॉ. राजेंदसिह मोरे, अविनाश जाधव, रामेश्वर मुंडे करीत आहे.

    तसेच या बाबत रिदास इंडिया प्रॉपर्टीस औरंगाबाद या नावाने गुंतवणूकदारांना जास्त नफ्याचे आमिष दाखवून कोणाची फसवणुक झालेली असल्यास अशा व्यक्तींनी त्यांचेकडे उपलब्ध असलेली रिदास इंडिया प्रॉपर्टीस कंपनी शाखा औरंगाबादच्या आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधिक्षक कार्यालय, बुलडाणा येथे कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील,  पोलीस उप-निरीक्षक कैलास रहाणे,  यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

**********

कोरोना अलर्ट : प्राप्त 305 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 129 पॉझिटिव्ह

• 30 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि. 15 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 434 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 305 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 129 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 114 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 15 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 199 तर रॅपिड टेस्टमधील 106 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 305 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 24, बुलडाणा तालुका : अजिसपूर 1,  दे. राजा तालुका : आळंद 2, मेहुणा राजा 1, पिंपळनेर 2,  दे. राजा शहर : 5, खामगांव शहर : 12, शेगांव शहर : 12, शेगांव तालुका : गायगांव बु 3, जानोरी 2,  चिखली शहर : 23,  चिखली तालुका : सोमठाणा 1, भरोसा 1, सवणा 4, दे. घुबे 1, कवठळ 1, शिरपूर 1,  जांभोरा 1, शेलगांव 1, गोरेगांव 1, जळगांव जामोद तालुका : वाडी खु 3, लोणार शहर : 6, मोताळा तालुका : टाकळी 1, सिं. राजा तालुका : बारलिंगा 1, मलकापूर तालुका : माकनेर 2,  मलकापूर शहर : 9, नांदुरा तालुका : डिघी 1, संग्रामपूर तालुका : सावळी 3, मूळ पत्ता तेल्हारा जि. अकोला 1, जाळीचा देव ता. भोकरदन जि. जालना 1, महागांव जि. यवतमाळ 1, डोंगरगांव ता. बाळापूर जि अकोला 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 129 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 30 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  खामगांव : 5, चिखली : 6, दे. राजा : 7, बुलडाणा : अपंग विद्यालय 7,  मोताळा : 1, शेगांव : 4. 

  तसेच आजपर्यंत 115603 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14145 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 14145 आहे. 

  तसेच 780 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 115603 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 14944 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 14145  कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 622 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 177 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

 

*******

नागरिकांनी कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करावे

  • जिल्हा प्रशासनाचे आवाहन

  बुलडाणा,(जिमाका) दि. 15 :  कोरोना पॉझीटीव्ह केसेस वाढायला लागल्या आहेत. अगदी चांगल्या नियंत्रणात आलेल्या म्हणजेच दररोज 25 ते 35 च्या दरम्यान असलेल्या केसेस आता दररोज 100 च्या मागेपुढे येत आहेत.  त्यामुळे नागरिकांनी पुन्हा एकदा सतर्क होणे गरजेचे असुन मास्क वापरणे, सोशल डिस्टसिंग ठेवणे व स्वच्छ हात धुणे ह्याचा कटाक्षाने अवलंब करणे आवश्यक आहे.  जनतेने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.  तसेच गर्दी होईल, असा कोणताही कार्यक्रम आयोजित न करणे याची दक्षता आयोजकांनी घेणे  आवश्यक आहे.

    त्यामुळे जिल्ह्यातील जनतेने पुर्वी जशी शिस्त पाळली होती, अगदी तशीच शिस्त यापुढेही पाळणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

                                                                                                *****************

जिल्हाधिकारी कार्यालयात

संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

 बुलडाणा,(जिमाका) दि. 15 :  समाजात सुधारणा व परिवर्तन घडवून आणण्यासाठी अविरत कार्य करणारे संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त आज सकाळी  जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

******


No comments:

Post a Comment