Friday 16 March 2018

जलदूत बनून प्रत्येकाने जलजागृती करावी - जिल्हाधिकारी

लदूत बनून प्रत्येकाने जलजागृती करावी
- जिल्हाधिकारी
  • जलजागृती सप्ताहाचे थाटात उद्घाटन
  • जिल्हाधिकारी यांच्याहस्ते कलश पूजन
  • नळगंगा, पैनगंगा, विश्वगंगा, खडकपूर्णा, मन, वान, पूर्णा नद्यांमधील पाण्याचे पूजन
  • पाण्याची बचत म्हणजे पाण्याची निर्मिती
बुलडाणा दि‍.16: मानवी इतिहासात जलजागृती करावी लागणे ही दुख:द बाब आहे. मानवी उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर पाण्याचे महत्व अनन्य साधारण आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याचे वाढत जाणारे दुर्भिक्ष्य बघता पाण्याचे महत्व सर्वोदीत आहे. अशा परिस्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. पाण्याचा थेंबन थेब वाचविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने जलदूत बनून जलजागृती करावी,  अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज व्यक्त केली.  राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्यावतीने 16 मार्च ते 22 मार्च 2018 दरम्यान जिल्हाभर जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. त्यानुसार जलजागृती सप्ताहाचा उद्घाटन सोहळा आज 16 मार्च 2018 रोजी  जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याहस्ते कलश पूजन व जलप्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले.
      याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता नितीन सुपेकर, सिंचन मित्र मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील, पाणी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर आदी उपस्थित होते.
   जिल्हाधिकारी पुढे  म्हणाले, पावसाचे प्रमाण कमी व लहरी झाले आहे. त्यामुळे शेतीसाठी व एकत्रितच सर्व क्षेत्रासाठी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. परिणामी सिंचन काही केल्या तरी 40 टक्कयापर्यंत जाणार आहे. आज 18 टक्के शेती सिंचनाखाली आहे. विंधन विहीरी मोठ्या प्रमाणावर घेण्यात आल्या.  या अमर्याद होत असलेल्या भूजल उपशामुळे भूजल पातळी कमालीची खलावत आहे. ही धोक्याची घंटा आहे. निसर्गाने निर्माण केलेले जलचक्र अबाधित ठेवून पुढील पिढ्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी पाण्याची बचत करायला पाहिजे. प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात जलसंवर्धनाची प्रभावी कार्यपद्धती अवलंबून काम करावे. तसेच चराई बंदी, वृक्षतोड बंदी व वृक्ष लागवडीसारखे उपाय करावेत.  सप्ताहात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यशाळांना शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या कार्यक्रमांमधून पाण्याचे महत्व व भविष्यातील पाण्याची स्थिती याविषयी प्रबोधीत व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन यांनी विचार व्यक्त करीत जलसंवर्धनावर भर दिला. प्रास्ताविक अधिक्षक अभियंता नितीन सुपेकर यांनी जलजागृती सप्ताहाच्या आयोजना मागील उद्देश स्पष्ट केला. त्यांनी या सप्ताहात वाटर रन स्पर्धा 20 मार्च रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
    कलशामध्ये जिल्ह्यात प्रमुख नळगंगा, पैनगंगा, विश्वगंगा, पूर्णा, खडकपूर्णा, मन व वान नद्यांमधील पाण्याचा समावेश आहे. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन चंद्रकांत साळुंखे यांनी केले. यावेळी त्यांनी जलप्रतिज्ञा दिली.                                                                                                                                    कार्यक्रमाला जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता,  अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
..................................


                     सोसायट्यांनी शेतकऱ्यांना सभासद करून सहकार वाढवावा
- जिल्हाधिकारी
  • अटल महापणन अभियानाचे थाटात उद्घाटन
  • सेंद्रीय शेतमाल उत्पादनांवर आधारीत प्रक्रिया उद्योग उभारावे
  • सहकार विभागाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा
बुलडाणा, दि‍.16: विविध कार्यकारी सोसायट्या ह्या सहकार चळवळीचा कणा आहेत. या सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. बाजार संलग्नता वाढवून पक्रिया उद्योगांचे जाळे गावागावात निर्माण करावे. त्यामुळे सहकार जीवंत राहून शेतकऱ्यांनासुद्धा लाभ होईल. सोसायट्यांनी आपले भक्कम जाळे निर्माण करून शेतकऱ्यांना सभासद करून घ्यावे व सहकार वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज केले.
    सहकार व पणन विभागाच्या अटल महापणन विकास अभियानाचा उद्घाटनीय कार्यक्रम आज 16 मार्च 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडला. त्यावेळी जिल्हाधिकारी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, कृषि समृद्धी प्रकल्पाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक आनंद तिवारी, जिल्हा मार्केटींग अधिकारी पंढरीनाथ शिंगणे, रॉयल ॲग्रो फुड प्रोसेसिंग नाशिकचे रोहीत जाधव, बीव्हीजी पुणे येथील प्रफुल्ल सोनुने आदी उपस्थित होते.
   जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, सध्या बाजारात विषमुक्त अन्न म्हणून पाहिल्या जाणाऱ्या सेंद्रीय शेतमालाला चांगली मागणी आहे. या शेतमालावर आधारीत प्रक्रिया उद्योग  संस्थांनी उभारल्यास त्यांच्या मालाला मोठी बाजारपेठ मिळू शकते. समाजात मागणी असणाऱ्या घटकांवर आधारीत उद्योग असल्यास समाज त्याला डोक्यावर उचलतो. परिणामी याचा लाभ शेतकऱ्यांना होतो. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 17 उद्योगांची संख्या 170 वर नेण्यात यावी. गावागावात छोटे-छोटे उद्योग उभारून या सोसायट्यांनी उद्योगस्नेही वातावरण निर्माण करावे. सहकार व पणन विभागाच्या माध्यमातून विविध योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येतात. त्यांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
    प्रास्ताविक जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले. ते म्हणाले, अटल महापणन विकास अभियान सहकार क्षेत्राला उभारी देण्यासाठी संजीवनी ठरत आहे. या अभियानाच्या माध्यमातून सहकारी संस्थांनी आपली प्रगती करावी. याप्रसंगी केम प्रकल्पाचे श्री. तिवारी यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली. तसेच रोहीत जाधव आणि प्रफुल्ल सोनुने यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन दिप प्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान संस्थांच्या यशकथांचे सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, सोनाळा ता. संग्रामपूर, गणेश विविध कार्यकारी सेवा सह. संस्था लोणार, बुलडाणा अर्बन महिला बचत गट यांचा समावेश होता. संचलन श्री. सय्यद यांनी, तर आभार जिल्हा मार्केटींग अधिकारी पी.एस शिंगणे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा पणन अधिकारी, सहकार विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विविध कार्यकारी सोसायट्यांचे गटसचिव, पदाधिकारी, तालुका खरेदी विक्री संघाचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                                        ******
                              सामाजिक न्याय विभागातंर्गत मुलींच्या निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया
बुलडाणा, दि‍.16: राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य  विभागातंर्गत आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलींच्या घाटपूरी, ता. खामगांव येथील शाळेत प्रवेश प्रक्रिया प्रारंभ करण्यात आली आहे. या शैक्षणिक सत्र 2018-19 करीता सेमी इंग्रजी माध्यमाकरिता इयत्ता 6 वी साठी संपूर्ण नवीन प्रवेश  व इयत्ता 7 वी ते 9 वी मधील रिक्त  जागांसाठी प्रवेश केवळ मुलींसाठी देण्यात येणार आहे. अनुसूचित जमाती, अनु. जाती, विजाभज, विमाप्र व अपंग या प्रवर्गातील विद्यार्थीनींच्या प्रवेशासाठी 10 एप्रिल 2018 पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे, असे घाटपुरी ता. खामागांव येथील शाळेचे मुख्याध्यापक यांनी कळविले आहे.
                                                            ******



पाणी टंचाई निवारणार्थ नळ योजनेची विशेष दुरूस्ती मंजूर
  • खामगांव तालुक्यातील चार गावांचा समावेश
बुलडाणा, दि‍. 16 - पाणीटंचाई निवारणार्थ खामगांव तालुक्यातील खौलखेड, वाडी, घाटपुरी व कोक्ता या गावांसाठी नळ योजनेची विशेष दुरूस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहे. या  कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
   या गावांमधील संबधित ग्रामपंचायतीने वीज देयक न भरल्यामुळे नळ योजना बंद असेल, तर अशा ग्रामपंचायतीने प्रथम थकीत वीज देयकाची रक्कम संबंधिताकडे भरून नळ योजनेचा विद्युत पुरवठा सुरू करावा. कामे सुरू होण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा परिषद यांनी करावा.  सदर मंजूर कामे इतर निधीतून झालेले नाही अथवा प्रस्तावित नाही, याची खात्री केल्यानंतरच मंजूर कामास सुरूवात करावी, अन्यथा संबंधितास जबाबदार धरण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे
                                                               ******
तालुका स्तरीय लोकशाही दिनाचे 19 मार्च रोजी आयोजन
  बुलडाणा, दि.16 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी तालुका स्तरीय लोकशाही दिन संबंधित तहसिल  कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या महिन्याचा तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, 19 मार्च 2018 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयात होणार आहे.  या दिवशी तहसीलदार व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत.
    जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे.
   अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत. तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही.
   तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात,  प्राधिकाऱ्यां-कडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल,  असे तहसलीदार यांनी कळविले आहे 
                                                                                    **********
जिल्ह्यात 748 गावांची खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी 50 पैशांच्या कमी
·        748 गावांतील नागरिकांना विविध सवलती जाहीर
·        शालेय, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
·        जमिन महसूलात सुट, कृषि पंपाच्या चालू विज बिलात 33.5 टक्के इतकी सूट
बुलडाणा,दि. 16 - जिल्ह्यात 2017-18 च्या खरीप हंगामात झालेल्या लहरी व कमी पावसामुळे दुष्काळी  परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे  जिल्ह्यात सात तालुक्यांमधील महसूली 748 गावांमध्ये खरीप हंगामातील पिकांची अंतिम पिक पैसेवारी 50 पैसे व त्यापेक्षा कमी आली आहे. या गावांमध्ये शासनाने  दुष्काळी परिस्थितीत देण्यात येणाऱ्या सवलती या गावांतील नागरिकांना सवलती लागू केल्या आहेत.  
महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियमान्वये जिल्ह्यातील 50 पैसे अथवा त्यापेक्षा कमी पैसेवारी  जाहीर झालेल्या 748 गावांमध्ये जमिन महसूलामध्ये सूट देण्यात आलेली आहे. या गावांमध्ये कृषि पंपांच्या चालू विज देयकात 33.5 टक्के इतकी सूट जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. आवश्यक तेथे पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी टँकर्सचा वापर करण्यात येणार आहे. परिस्थिती जाहीर झालेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषि पंपाची वीज जोडणी खंडीत न करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच रोजगार हमी योजनेतंर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता आणण्यात आली आहे. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती देण्यात आली असून सहकारी कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. टंचाई जाहीर केलेल्या गावात  सवलतीपोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागाने करावयाचा आहे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
तालुकानिहाय 50 पैसे अंतिम  पैसेवारी आलेल्या गावांची संख्या
मलकापूर तालुक्यात 73 गावांमध्ये खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी 50 पैसे अथवा त्यापेक्षा कमी आलेली आहे. त्याचप्रमाणे मोताळा तालुक्यात 120, नांदुरा तालुक्यात 112, खामगांव तालुक्यात 145, शेगांवमध्ये 74, संग्रामपूर तालुक्यात 105 आणि जळगांव जामोद तालुक्यात 119 गावांमध्ये 50 पैसे अथवा त्यापेक्षा कमी अंतिम पैसेवारी आली आहे.
            

No comments:

Post a Comment