Thursday 18 January 2018

उडीद खरेदीसाठी 20 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

उडीद खरेदीसाठी 20 जानेवारी पर्यंत मुदतवाढ
बुलडाणा,दि.18 - केंद्र शासनाचे आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत 2017-18 मधील उडीद शेतमालाची  ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी 13 डिसेंबर 2017 अखेर 12 तालुका खरेदी – विक्री संघ तथा चिखली जिनिंग प्रेसिंग चिखली येथे उडीदाची ऑनलाईन नोंदणी केलेली आहे.  अशा शेतकऱ्यांची खरेदी जवळपास पूर्णत्वास गेलेली आहे. मात्र काही शेतकऱ्यांना तांत्रिक कारणास्तव शेतकऱ्यांना एसएमएस किंवा मोबाईलद्वारे संदेश मिळाला नसेल, अशा शेतकऱ्यांनी आपला उडीद शेतमाल नाफेडच्या खरेदी केंद्रावर 20 जानेवारी 2018 पूर्वी आणायचा आहे. त्यानंतर आलेल्या उडीदाची खरेदी करण्यात येणार नाही, याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी ,असे आवाहन जिल्हा मार्केंटींग अधिकारी यांनी केले आहे.
00000
बुलडाणा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन   
  बुलडाणा, दि. 18 : जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच जिजामाता महाविद्यालय, चिखली रोड बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सुशि‍क्षीत बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी 20 जानेवारी  2018  रोजी जिजामाता महाविद्यालय, बुलडाणा येथे सकाळी 11.00 वाजता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
            या मेळाव्या अंतर्गत किरण लाईट प्रा. लि, धाड येथील कंपनी कंपनीकरीता इलेक्ट्रीशीयन टेक्नीशीयनची  25 पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी शैक्षणिक पात्रता मुलाखत निवड पध्दतीव्दारे निवड करण्यात येणार आहे. वयोमर्यादा 18 ते 32 वर्ष, वेतन 6000 रूपये असणार आहे. करियर फोरम औरंगाबाद कंपनीकरीता इलेक्ट्रीशीयन, वायरमन, फिटर, मशिनीस्ट, शिटमेटल वर्कर 50 पदे, आयटीआय उत्तीर्ण असावे, मुलाखतीव्दारे निवड करण्यात येणार असुन 7500 ते 8000 रूपये वेतन, 17 ते 24 वर्ष वयोमर्यादा असावी. एसआयएस इंडिया पुणे  सुरक्षा रक्षक व पर्यवेक्षक या पदांच्या अनुक्रमे 100 आणि 50 पदांसाठी शारिरीक चाचणी व लेखी परीक्षेदवारे निवड करण्यात येणार आहे. नवभारत फल्टीलायझर, नागपूर कंपनीसाठी सेल्स रिप्रेझेन्टेटीव्ह 40 पदाकरीता  शैक्षणिक पात्रता  12 वी आवश्यक असून मुलाखतीव्दारे निवड करण्यात येणार आहे. सतिशजी इन्फ्राटेक अँण्ड मिडीया प्रा. लि चिखली कंपनीच्या वेल्डर, फिटर, हेल्पर, सुरक्षा रक्षक कंपनीच्या 35 पदांसाठी इयत्ता 10 वी व  आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदासाठी 18 ते 36 वर्ष वयोगटात 6 ते 10 हजार रूपये वेतनावर मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.
    अधिक माहिती साठी सहाय्यक संचालक ,जिल्हा रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र 07262-242342 व 9421468632 या क्रमांकावर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी सेवायोजन कार्ड, निवडणूक ओळखपत्र/आधारकार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या प्रती, 5 पासपोर्ट फोटो व बायोडाटा सोबत आणावा, असे आवाहन सहाय्यक संचालक ,जिल्हा रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
00000
  25 टक्के प्रवेश ऑनलाईन पद्धतीने...!
·        आरक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
·        24 जानेवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन प्रवेश अर्ज करावा
बुलडाणा दि.21- बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकारी अधिनियम सन 2009 नुसार 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. आरटीई अंतर्गत सन 2018-19 या शैक्षणिक वर्षाचे 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकही जाहीर  करण्यात आले आहे. कायद्यानुसार दुर्बल वंचित घटकातील बालकांना विना अनुदानीत व कायम विना अनुदानीत शाळांमध्ये 25 टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे. हे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असून ही प्रक्रिया सुरू झाली आहे.
       शिक्षण विभागाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार 20 जानेवारी 2018 पर्यंत शाळांना प्रवेश प्रक्रियेत सहभागासाठी नोंदणी करावी लागणार आहे. शाळेत 25 टक्के ऑनलाईन प्रवेश पात्र असणाऱ्या शाळांनी प्रक्रियेत सहभागी होणे अनिवार्य आहे. शाळेनेच प्रवेश स्तर ठरवायचा आहे. ज्या शाळा नोंदणी करणार नाही, त्यांच्यावर नियमानुसार कार्यवही करण्यात येणार आहे.  शाळांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर 24 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2018 या कालावधीत पालकांनी rte25admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करावयाचा आहे. आलेल्या अर्जानुसार 14 व 15 फेब्रुवारी 2018 रोजी प्रवेशाची पहिली लॉटरी काढण्यात येणार आहे.
        त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रवेशाची लॉटरी काढली जाणार आहे. या प्रक्रियेत एकूण 6 वेळा लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित केले जाणार आहे. लॉटरीमध्ये प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश 16 फेब्रुवारी ते 9 मार्च 2018 दरम्यान शाळेत जाऊन निश्चित करावा. दुसरी लॉटरी 7 व 8 मार्च, या लॉटरीमध्ये प्रवेश मिळालेल्या पालकांना पाल्यांचे निश्चित प्रवेश 9 ते 21 मार्च 2018 दरम्यान करावे लागणार आहे. तिसरी लॉटरी 26 व 27 मार्च, शाळेत प्रवेश निश्चित करणे 28 मार्च ते 7 एप्रिल 2018, रिक्त जागा जाहीर करणे 9 व 10 एप्रिल दरम्यान कराव्या लागतील. तिसऱ्या लॉटरीनंतर प्रवेशाची मुदत संपल्यावर कार्यशाळा घेऊन प्रवेशाची पात्र शाळांमधील रिक्त पदांची संख्या 9 व 10 एप्रिल 2018 रोजी ऑनलाईन जाहीर करावी लागणार आहे.   त्यानंतर आवश्यकता असल्यास पुढील लॉटरीचे आयोजन तिसऱ्या लॉटरी पद्धतीने करावे लागणार आहे.
   ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने सॉफ्टवेअर विकसित केले असून   rte25admission. maharashtra. gov.in असा त्याचा पत्ता आहे. सर्व ऑनलाईन प्रक्रियेची माहिती यावर उपलब्ध आहे. ही माहिती ऑनलाईन पद्धतीने मुख्याध्यापक यांनी शाळा स्तरावर भरावयाची आहे. ही माहिती केंद्रप्रमुख व तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांनी पडताळणी करणे अनिवार्य आहे, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी कळविले आहे.
*********
नोंदणीकृत मच्छीमारांची माहिती द्यावी
बुलडाणा दि 18- जिल्ह्यातील नोंदणीकृत सर्व मच्छिमार सहकारी संस्थांनी नोंदणीकृत सभासदांना, अपघात गट विमा योजनेतंर्गत मच्छिमारांना विमा संरक्षण व नैसर्गिक आपत्ती आल्यास त्यांच्या वारसांना विमा रक्कम देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी फिशकोपफेड, नवी दिल्ली यांनी नोंदणीकृत मच्छिमारांची माहिती मागितली आहे. सदर माहिती सादर न केल्यास शासनाच्या येाजनेचा लाभ मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना मिळू शकणार नाही.तरी नोंदणीकृत मच्छिमार सहकारी संस्थेमधील मच्छिमारांनी 31 जानेवारी 2018 पर्यंत सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), प्रशासकीय इमारत, पहिला माळा, बस स्टँण्ड समोर, बुलडाणा या कार्यालयात स्वहस्ते सादर करावी.
  या माहितीमध्ये मच्छिमार सभासदाचे नाव व पत्ता, आधार कार्ड क्रमांक, जन्म दिनांक, बँकेचे खाते क्रमांक, आयएफएससी कोड क्रमांक, बँकेचे नाव व पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, वारसाचे नाव व स्त्री/पुरूष असल्याबाबतची माहितीचा समावेश आहे. ही माहिती इंग्रजी/ मराठी प्रपत्रात भरून उपरोक्त कार्यालयाकडे सादर करावी, असे आवाहन सहायक आयुक्त स इ नायकवडी यांनी केले आहे.
                                                                        *****
ध्वज दिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन
बुलडाणा दि 18- सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व सन 2016 चे उत्कृष्ट ध्वजदिन निधी संकलनाप्रित्यर्थ प्रशस्तीपत्र आणि प्रोत्साहनपर बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन सैनिकी मंगल कार्यालय, बुलडाणा येथे 23 जानेवारी 2018 रोजी 12 वाजता करण्यात आले आहे. या मेळाव्यास माजी सैनिक, युद्ध विधवा, वीर पिता व अवलंबित यांची प्रामुख्याने उपस्थिती असणार असून अध्यक्षस्थानी जिल्हाधिकार डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तर प्रमुख उपस्थितीत संचालक कर्नल सुहास जतकर असणार आहे. या मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व युद्ध विधवा, माजी सैनिक, वीर माता, वीर पिता व अवलंबित यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

एस टी महामंडळाच्या विना अपघात सुरक्षितता मोहिमेचा शुभारंभ
·        17 फेब्रुवारी 2018 पर्यंत चालणार मोहिम
बुलडाणा दि 18- रस्ते वाहतुकीमध्ये सुरक्षित प्रवास हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे प्रवाशांची सुरक्षित सेवा करणारे महामंडळ आहे. महामंडळाचा हा दावा प्रबळ करण्यासाठी विना अपघात सुरक्षितता मोहिमेचा शुभारंभ महामंडळाच्यावतीने करण्यात आला आहे. ही मोहिम 17 फेब्रुवारी 2018 पर्यंत राबविण्यात येणार आहे.
  या मोहिमेदरम्यान प्रवाशांमध्ये सुरक्षित प्रवासाबद्दल विश्वास वृद्धींगत करणे, रा.प कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये सुरक्षित प्रवासी वाहतुकीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, सुरक्षित वाहतुकीसाठी घालून दिलेल्या कार्यपद्धती पाळण्यावर भर देणे व रा.प वाहनांना अपघात होणार नाहीत, यासाठी सदैव योग्य ती काळजी घेण्यात येणार आहे. ही मोहिम आगार पातळीवर राबवियात येत आहे. चालकांसाठी मान्यवरांची उद्बोधनपर भाषणे, सभा घेणे, बॅनर, फलक, पोस्टर्स व स्टीकर्स दर्शनी भागात लावणे आदी उपक्रम राबविण्यात येत आहे. तर प्रवाशांनी या मोहिमेस सहकार्य करून अपघातांवर नियंत्रण मिळवावे, असे आवाहन एस टी महामंडळाने केले आहे.
****

प्रगतीमधील कामे पूर्ण करण्यासाठी निधीची उपलब्धता

* ७.२६ कोटी रुपयांचा निधी सा. बां खामगाव यांच्याकडे वर्ग

बुलडाणा, दि. 18 :  सन २०१५-१६ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव यांना रस्ते विकास व मजबुतीकरणाची १६.४४ कोटीची ६६ कामे मंजूर झाली. या कामांवर मार्च २०१७ अखेर ९.६० कोटी रुपयांचा निधी खर्च झाला. सद्यस्थितीत हि सर्व कामे प्रगतीपथावर असून ७.२६ कोटी एवढ्या निधीची आवश्यकता  आहे. सदर कार्यालयाच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ७.२६ कोटी एवढ्या दायित्वाची रक्कम सार्वजनिक बांधकाम विभाग खामगावला उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषदेचा निधी सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याचे वृत्त दिशाभूल करणारे आहे.
  त्याचप्रमाणे यामध्ये पालकमंत्री यांचा निधी वळती करण्याबाबत हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सदर निधी हा जुनी प्रगतीत असलेली कामे पूर्ण करण्याकरिता आवश्यक निधी आहे, असा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव यांनी केला आहे.
********
मतदार दिनानिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन
बुलडाणा, दि‍.18 -  राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी 2017 निमित्त  मतदार दिवस जागृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या स्पर्धकांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र 25 जानेवारी 2018 रोजी आयोजित राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात देण्यात येणार आहे.
  स्पर्धेचा विषय मतदारांची जागरूकता आणि लोकशाहीचे भवितव्य असून वय 15 ते 23 वर्ष आवश्यक आहे. स्पर्धेसाठी 20 जानेवारी 2018 रोजी सायं 5 वाजेपर्यंत नेहरू युवा केंद्र, बुलडाणा या पत्त्यावर निबंध पाठवायचे आहे. निबंधाची शब्दमर्यादा 1000 असून पानाच्या एकाच बाजूने निबंध लिहावा. निबंधावर नाव लिहू नये, विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज निबंधासोबत जोडावा, या स्पर्धेसंदर्भात परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेवून निबंध पाठवावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.

******

No comments:

Post a Comment