Monday 4 December 2017

news 4.12.2017 io buldana

        
परिस्थितीवर मात करीत ‘विशालची’ भरारी…!
·        सावळी येथील विशाल नरवाडे बनला आयपीएस
  बुलडाणा, दि. 4 : मध्यमवर्गीय कुटूंब.. वडील चांडोळ येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथे कार्यरत.. तसेच आई सुरूवातीला अंगणवाडी शिक्षीका आणी नंतर गृहीणी.. अशी बेताची परिस्थिती.. कुटूंब अजूनही धाड येथे भाड्याच्या घरात राहणारे.. मात्र नोकरी करीत गुंतवणूक तर करायची.. ही तेजराव नरवाडे यांची इच्छा.. आणि गुंतवणूक केली ती शिक्षणामध्ये.. मुलगी व मुलगा विशाल असे छोटे कुटूंब असणाऱ्या तेजराव यांनी मुलीला स्त्रीरोगतज्ज्ञ केले तर विशालला आयआयटी जबलपूर येथून अभियंता बनविले. मात्र प्रशासनात जावून समाजाची सेवा करावी..ही उर्मी विशालला स्वस्थ बसू देत नव्हती. विशालने आयआयटी झाल्यानंतर लाखो रूपयांच्या पगाराची खाजगी नोकरी न पत्करता दिल्ली गाठले. दिल्ली गाठताच आयपीएस होण्याचा अभ्यास सुरू केला. विशालचे मूळ गांव बुलडाणा तालुक्यातील सावळी.
    स्पर्धा परीक्षा..प्रशासकीय सेवेत जावून समाजाची सेवा करण्याचा मार्ग. या मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक इच्छूकाला खडतर प्रवास करावा लागतो. स्पर्धा परीक्षा दिली म्हणजे नोकरी पक्कीच असाही काहींचा समज असतो. मात्र केवळ नोकरी म्हणून या क्षेत्राकडे बघणाऱ्या तरूणांना यश न मिळाल्यास बेकारी पदरी पडते. ह्या परीक्षा देणे म्हणजे.. प्रचंड मेहनत व 14 ते 15 तास अभ्यास करावा लागतो.. या मेहनतीला विशाल सामोरे गेला. विशालचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. सावळी या छोट्याशा गावात शिक्षण पूर्ण केले व इयत्ता 5 वी मध्ये भडगांवला शरद पवार विद्यालयात प्रवेश घेतला. गुणवत्तेच्या भरवशावर विशालने शेगांवचे नवोदय विद्यालय येथे इयत्ता 6, 7 वीचे शिक्षण पुर्ण केले. विशालने 8, 9 व 10 वी चे शिक्षण भारत विद्यालय, बुलडाणा येथे पूर्ण केले. तर 11 वी आणि 12 वी चे शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे घेतले.
  मुलांच्या शिक्षणातच गुंतवणूक करायची हा ठाम निश्चय मनाशी बाळगलेल्या तेजराव नरवाडे यांनी मुलाला आयआयटी जबलपूर (मध्यप्रदेश) येथे स्नातकसाठी पाठविले. विशालही आयआयटी जबलपूर येथून इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन अभियांत्रिकीची पदवी घेवूनच बाहेर पडला. मात्र जेमतेम परिस्थिती असलेल्या तेजराव यांनी विशालचा खाजगी क्षेत्रात नसलेला रस कळला. त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे सन 2012 मध्ये आयपीएस होण्यासाठी दिल्लीला पाठविले. या दरम्यान विशालच्या आईला त्यांची अंगणवाडी शिक्षीकेची नोकरी सोडावी लागली. त्या विशालसोबत दिल्लीला गेल्या. तीथे सर्व नवीन वातावरणात विशालने अभ्यास सुरू केला. करोलबाग भागात  छोट्या-मोठ्या क्लासेसच्या माध्यमातून अभ्यास केला. प्रारंभी लायब्ररीमध्ये अभ्यास करीत युपीएससीची तयारी करू लागला.  दिल्लीला गेल्यानंतर सण, समारंभ, कौटुंबिक कार्यक्रम सर्व सोडून दिले. कुटूंबावर तुळशीपत्र ठेवून विशाल आपल्या ध्येयाकडे अग्रेसर राहीला. कुटूंबाकडे केवळ दोन एकर शेती असलेल्या तेजराव नरवाडे यांनीसुद्धा विशालला शिक्षणासाठी पैसा पुरविला. एवढेच नव्हे, तर त्यांनी मुलीलासुद्धा डॉक्टर केले. अशाप्रकारे कुटूंबाचे सहकार्य मिळाल्यानंतर विशालने मागे वळून पाहिले नाही. तो पहिल्याच प्रयत्नात 2013 मध्ये युपीएसीची चाळणी, मुख्य परीक्षा उत्तीर्ण होवून मुलाखतीला पात्र ठरला. या यशाच्यावेळी त्याने वयाची अवघी 22 वर्ष पूर्ण केली होती. मुलाखत पॅनल समोर जाणारा तो सर्वात कमी वयाचा उमेदवार होता. मात्र विशालला अपयश आले. त्याची अंतिम यादीत निवड होवू शकली नाही. त्याने हार न मानता सन 2014 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात पुन्हा मुलाखतीपर्यंत धडक मारली आणि सन 2015 ला तिसऱ्या प्रयत्नात विशालची आयपीएसमध्ये निवड झाली.
   मात्र मोठ्या स्वप्नांची माणसे आपल्या कार्यावर थांबत नाहीत. अशाप्रकारे विशालही थांबला नाही, त्याने आयएएससाठी तयारी सुरू केली आहे. आपल्या परिस्थितीवर मात करीत विशालने मिळविले हे यश प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे. आपल्या यशाचे श्रेय विशाल आपल्या आई-वडीलांना देतो. त्यांचा विरह, त्याग व सहकार्य यांच्यामुळेच हे यश मिळविले असल्याची प्रतिक्रिया त्याने दिली. विशाल नरवाडे यांचे 18 डिसेंबर 2017 पासून एक वर्षाचे अत्यंत कडक प्रशिक्षण हैदराबाद येथील राष्ट्रीय पोलीस अकॅडमी येथे सुरू होत आहे.
   लवकरच विशाल एखाद्या जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेची धुरा जिल्हा पोलीस अधिक्षक बनून सांभाळतांना दिसणार आहे. तेव्हा आपण गर्वाने ते एसपी साहेब आमच्या जिल्ह्याचे असल्याचे सांगणार आहे. यात मात्र शंकाच नाही.
                                                                                    *******
उडीद, मुंग व सोयाबीन शेतमाल खरेदीसाठी माल नाफेड केंद्रावर आणावा
·        जिल्हा मार्केटींग अधिकारी यांचे आवाहन
·        शेतकऱ्यांनी आधी मालाची नोंदणी खरेदी विक्री संघाकडे केलेली असावी
बुलडाणा, दि. 4 : जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाचे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत 13 खरेदी केंद्रांवर उडीद, मुंग व सोयाबीन शेतमालाची खरेदी करण्यात येत आहे. यासाठी खरेदी-विक्री संघाकडे उडीद, मुंग व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी उडीद, मुंग, सोयाबीन शेतमालाची नोंदणी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना 13 डिसेंबर 2017 पर्यंत एसएमएस किंवा मोबाईलद्वारे शेतमाल खरेदी केंद्रावर आणण्यासाठी कळविण्यातसुद्धा येत आहे. तरीही काही शेतकऱ्यांना असा एसएमएस किंवा सुचना मिळाली नसल्यास त्यांनी खरेदी – विक्री संघाकडे संपर्क साधावयाचा आहे. तरी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी त्वरित आपला माल नाफेड खरेदी केंद्रावर आणावा, असे आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनी केले आहे. तरी 13 डिसेंबर पर्यंत उडीद, मुंग व सोयाबीन शेतमाल नाफेड खरेदी केंद्रावर आणावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
*****
लोकशाही दिन कार्यवाहीत 5 तक्रारी निकाली
  
     बुलडाणा, दि.4 : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन कार्यवाहीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येते. त्यानुसार आज 4 डिसेंबर 2017 रोजी अप्पर जिल्हाधिकारी ओमप्रकाश दुबे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन कार्यवाही करण्यात आली.   याप्रसंगी अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप डोईफोडे, उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक आर.एस कदम, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे, भूमि अभिलेख अधिक्षक श्री. जधवर, तहसीलदार शैलेश काळे आदींसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या लोकशाही दिन कार्यवाहीमध्ये 5  तक्रारी  निकाली काढण्यात आल्या. त्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मेहकर नगर परिषद, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख यांच्याकडील दोन आणि उपवनसंरक्षक यांच्याकडील एक तक्रारींचा समावेश आहे.  तसेच 7 प्राप्त झाल्या असून त्यांना सामान्य तक्रार म्हणून स्वीकृत करण्यात आले आहे.  लोकशाही दिन कार्यवाहीला संबंधित यंत्रणांचे अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
                                                                        *******
जिल्हाधिकारी कार्यालयात ‘टेक सॅटरडे’ उपक्रमाचे आयोजन
  
     बुलडाणा, दि.4 : राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या सहकार्यातून जिल्हाधिकारी कार्यालयात ‘टेक सॅटरडे’ उपक्रमाचे 2 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते. कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी ओमप्रकाश दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा सुचना-विज्ञान अधिकारी उत्तम चव्हाण व अतिरिक्त जिल्हा सुचना-विज्ञान अधिकारी आमोदकुमार प्रदिप सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार यांनी संगणकातील नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख व जागरूकता याबाबत उपस्थितांना माहिती दिली. तसेच उत्तम चव्हाण, आमोदकुमार सुर्यवंशी यांनी कार्यालयीन वापरातील युनीकोडचा वापर, एनआयसी नेटवर्कची ओळख व सायबर सुरक्षेची माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
******
  जिल्हा कारागृहात बंदी जणांसाठी व्यसनमुक्ती कार्यक्रम
  
     बुलडाणा, दि.4 : जिल्हा कारागृहात बंदी जणांसाठी सत्संगाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती व विविध विषयांवर मन परिवर्तन कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रम मानव उत्थान सेवा समिती, खामगांव यांच्या माध्यमातून घेण्यात आला. कार्यक्रमात कैदी बांधव/भगीनी सहभागी झालेल्या होत्या. यावेळी श्रीमती अर्पणा व श्रीमती बागीशा यांनी संबोधीत केले. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये कारागृह अधिक्षक श्री. गुल्हाने, जगदेव वानखेडे, गणपत मुळे, विष्णू रिंढे, अमो घोगळे व श्रीमती वानखेडे यांनी सहकार्य केले.
                                                                                    ******


No comments:

Post a Comment