Monday 4 September 2017

NEWS 4.9.2017 DIO BULDANA


पालकमंत्री यांनी केली जिगांव पुनर्वसित गावठाण विकासा कामांची पाहणी
  • पुनर्वसित गावांतील कामे विहीत कालावधीत पूर्ण करा
बुलडाणा, दि. 4 - जिगांवचे पुनर्वसन नांदुरा शहराजवळ होत आहे. जिगांव प्रकल्पांमधील बुडीत गाव जिगांवच्या पुनर्वसित गावठाणातील विकास कामांची पाहणी नुकतीच पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केली. येथील विकास कामांची पाहणी करताना पालकमंत्री यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी आमदार आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कचरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, नांदुरा तहसीलदार श्रीमती वैशाली देवकर, रामकृष्ण पाटील आदी उपस्थित होते.
   याप्रसंगी पालकमंत्री म्हणाले, पुनर्वसित गावठाणामधील विकास कामे दर्जेदार पद्धतीने करण्यात यावी. विहीत कालावधीत गावठाणातील नागरी सुविधा देण्याचे काम पूर्ण करण्यात यावे. वेळेवर गावाचे पुनर्वसन करण्यासाठी सर्व संबंधीत यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. याप्रसंगी संबंधीत यंत्रणाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
**********
सामान्य  तक्रारींचा  तात्काळ निपटारा करावा
-         जिल्हाधिकारी
·        लोकशाही दिनाची कार्यवाहीत 20 तक्रारी प्राप्त
·        तीन तक्रारी निकाली

     बुलडाणा, दि.3 : लोकशाही दिनाची कार्यवाही दर महिन्याच्या पहिल्या सोमवारला होत असते. यासाठी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर  तक्रारी येत असतात. लोकशाही दिन कार्यवाहीच्या कक्षेत न येणाऱ्या तक्रारींना सामान्य तक्रारी म्हणून संबंधित विभागांकडे पाठविल्या जातात. संबंधित विभागाकडून अशा तक्रारींवर त्वरित निपटारा करण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज दिल्या.  
   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकशाही दिनाच्या कार्यवाहीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराज, अतिरिक्त पोलीस अधिक्षक संदीप डोईफोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे, भूमि अभिलेख अधिक्षक श्री. जधवर, तहसीलदार शैलेश काळे, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण आदींसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
     या लोकशाही दिनामध्ये एकूण 20 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी लोकशाही दिन कार्यवाहीसाठी 8 तक्रार स्वीकृत करण्यात आली. तसेच 12 तक्रारी सामान्य तक्रार म्हणून अन्य विभागांकडे पाठविण्यात आल्या. तसेच तीन तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तहसीलदार शेगांव, महावितरण व कार्यकारी अभियंता सार्व. बांधकाम विभाग खामगांव यांच्याकडील तक्रारींचा समावेश आहे.  लोकशाही दिन कार्यवाहीला जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
                                                                        *****
मदरसा आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन योजना जाहीर
·        18 सप्टेंबर 2017 पर्यंत प्रस्ताव सादर करावे
बुलडाणा,दि. 4  : राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन  योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील ज्या मदरसा धर्मदाय आयुक्त अथवा महाराष्ट्र राज्य वक्‌फ बोर्डाकडे नोंदणीकृत आहेत. अशा मदरशांना आधुनिकीकरणासाठी शासन स्तरावरून अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छूक मदरसांनी शासननिर्णयामध्ये नमूद कागदपत्रांची पुर्तता करून परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे 18 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर करावे.
   योजनेच्या लाभासाठी मदरसा चालविणारी संस्था अथवा मदरसा धर्मदाय आयुक्त किंवा वक्‌फ बोर्डाकडे नोंदणीकृत असावी. ज्या मदरसांना स्कीम फॉर प्रोव्हाईडींग क्वालीटी एज्युकेशन इन मदरसा या केंद्र पुरस्कृत योजनेतंर्गत लाभ मिळाला आहे, अशा मदरशांना ही योजना अनुज्ञेय राहणार नाही.  पायाभूत सुविधांसाठी 2 लक्ष रूपये अनुदान देय आहे. यापूर्वी ज्या प्रयोजनासाठी अनुदान देण्यात आले आहे, अशा मदरशांना ही योजना अनुज्ञेय राहणार नाही. शासन निर्णयातील तरतुदीनुसार जास्त 3 बी.एड/डी.एड शिक्षकांना मानधन देण्यात येईल, शिक्षणासाठी हिंदी, मराठी, इंग्रजी, ऊर्दू यापैकी एका माध्यमाची निवड करून त्यानुसार शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक राहणार आहे. सदर अनुदान शासन निर्णयात नमूद पायाभूत सुविधा वगळून इतर सुविधांसाठी अनुज्ञेय असणार नाही.  अर्जाचा नमुना व आवश्यक कामदपत्रांची यादी http://mddmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  तरी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.
                                                           *************
परिवहन विभागामार्फत हेल्पलाईन क्रमांक सुरू
·        022-62426666 या क्रमांकावर माहिती साठी संपर्क करावा

     बुलडाणा, दि.4 : वाहनधारक नागरिकांना परिवहन विभागाविषयी माहिती, चौकशी अथवा तक्रार करावयाची असल्यास परिवहन विभागाने हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनचा क्रमांक 022-62426666 उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच कार्यालयातील कामकाजाबाबत लागणारे अर्ज, शुल्क आदीबाबत माहिती हवी असल्यास परिवहन विभागाचे मोबाईल ॲप, विभागाची http//transportmaharashtra.gov.in  या संकेतस्थळावर संपर्क साधता येणार आहे. त्याचप्रमाणे स्थानिक स्तरावर काही अडचणी अथवा तक्रार करायची असल्यास, अर्जाविषयी माहिती हवी असल्यास कार्यालयाच्या 07262-242244 क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच कार्यालयाच्या dyrto.28-mh@gov.in या इमेल आयडीवर मेल करावा, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
**********
                                    गणपती विसर्जनाला जिल्ह्यात दारूबंदी जाहीर

     बुलडाणा, दि.4 : जिल्ह्यात 5 सप्टेंबर 2017 रोजी गणपती विसर्जन होणार आहे. तसेच गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता अबाधीत रहावी, यासाठी जिल्ह्यात गणपती विसर्जन दिनी 5 सप्टेंबर 2017 रोजी व जेथे ज्या दिवशी विसर्जन असेल तेथे त्या दिवशी दारूबंदी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई दारूबंदी कायदा 1949 चे कलम 142 अन्वये जिल्ह्यातील सर्व देशी/ विदेशी मद्य विक्री दुकाने, परवानाकक्ष व बिअरबार अनुज्ञप्ती, एफएल/बीआर-2, अनुज्ञप्ती आदी अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येत आहे.  तरी सर्व संबंधित अनुज्ञप्ती धारकांनी देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने, परवानाकक्ष व बिअरबार बंद ठेवावेत. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरूद्ध कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी यांनी केले आहे.
                                                            **********
शौचालय बांधकामासाठी 9 वर्षाच्या नुतनचा हट्ट…!
·        पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला होता गौरव
·        मंगळसूत्र विकून बांधले शौचालय
·        नुतन धोरणचा जिल्हा परिषदेमध्ये सत्कार
     बुलडाणा, दि.4 : मोताळा तालुक्यातील चिंचपुर छोटेशे गाव.. या गावांमध्ये अन्य गावांसारखे घरोघरी शौचालय बांधकामाचे वारे वाहत आहेत. मात्र चिंचपूर येथे शौचालय बांधकामासाठी वारे नाहीत, तर हट्ट धरण्यात येत आहे. हा हट्ट आहे 9 वर्षीय नुतन धोरणचा. कु नुतन विष्णु धोरण या छोट्या 9 वर्षाच्या मुलीने आई वडीलांकडे यांच्याकडे शौचालय बांधण्याचा हट्ट धरुन शौचालय बांधकाम करुन घेतले आहे. परिस्थिती हलाखीची असतानादेखील तिच्या आईने मुलीच्या हट्टासाठी सौभाग्याचे लेणे असलेले मंगळसूत्र विकून शौचालय बांधकामाकरीता निधी उभारला.
    ही सर्व वार्ता राज्याचे पाणीपुरवठा व  स्वच्छताठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत बुलडाणा जिल्ह्याच्या  दौऱ्यावर आले असता त्यांना कळाली. त्यांनी लागलीच नुतनला बोलावून तिचा सत्कार केला व संपूर्ण दौऱ्यात तिला सोबत फिरविले. त्याचप्रमाणे हट्ट पूर्ण करणाऱ्या नुतन धोरणच्या आई वडीलांचाही सत्कार केला. नुतनचा  आज 4 सप्टेंबर 2017 रोजी  जिल्हा परीषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.  
     नुतन विष्णु धोरण हिने चिंचपुर येथील शाळेत शौचालयाचे उपयोग व फायदे शिकविल्यामुळे प्रेरीत होवून आई -वडील यांच्याकडे शौचालय बांधण्याचा हट्ट धरला होता. अत्यंत गरीबीच्या परीस्थीतीमध्ये शौचालय बांधण्यासाठी पैसे नसल्याने मुलीच्या आईने मंगळसुत्र विकुन आपल्या घरी शौचालय उभारले होते. याची माहिती  राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना होताच असल्याने त्यांनी या कुटुंबाचा साडी चोळी व रुमाल टोपी देऊन सत्कार केला होता. तर नुतन धोरणला सोबत घेऊन चिखली तालुक्यातील हातणी या गावामध्ये शौचालय पाहणी केली होती. तसेच तिच्याहस्ते शौचालयाचे भुमीपुजन करण्यात येऊन श्रमदान करण्यात आले होते. यावेळी त्यांनी कु. नुतन धोरणचा आदर्श इतरांनी घेण्याचे आवाहन केले व तिला जिल्ह्याचे ब्रँन्ड अँम्बेसिडर म्हणून घोषीत केले.  
    कु. नुतन व तिचे वडील विष्णु धोरण यांचा सन्मान चिन्ह, आर्थीक मदत देवून सत्कार करण्यात आला आहे. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री लोखंडे, पाणीपुरवठा अधिकारी श्री यादव, जितु अडेलकर, संतोष राजपुत, विनायक सरनाईक, पंकज पळसकर, चिंचपुर गावचे ग्रामसेवक, सरपंच आदींची उपस्थीती होती.
                                                                                    *********
कर्जमाफीसाठी आतापर्यंत 2 लाख 35 हजार 250 शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज
  • 2 लाख 91 हजार 903 शेतकऱ्यांची नोंदणी
 बुलडाणा, दि. 4:  शासनाने शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतंर्गत जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. 24 जुलै 2017  पासून  सुरू झाली आहे.   जिल्ह्यात 4 सप्टेंबर 2017 पर्यंत 2  लाख  91  हजार 903  शेतकऱ्यांची  नोंदणी झाली असून, 2 लाख 35 हजार 250  शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज  प्राप्त झाले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे यांनी दिली आहे.

    छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना  2017 च्या कर्जमाफीसाठी जिल्ह्यामध्ये एकूण  1210 केद्रांवर अर्ज भरण्यात येत असून  त्यात आपले सरकार केंद्र, नागरिक सुविधा केंद्र, संग्राम केंद्र  यांचा समावेश आहे. या केंद्रावर बायोमॅट्रीक यंत्र जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन भरून होईपर्यत ही केंद्र सुरू राहणार आहेत. जिल्ह्यात 15 ऑगस्टनंतर 90 महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. ही शिबिरे अर्ज भरण्यात येईपर्यंत सुरूच राहणार  आहे. 

No comments:

Post a Comment