Thursday 21 September 2017

news 21.9.2017 dio buldana

सुलतानपूर गावसमूहाचा विकास करण्यासाठी समन्वयाने काम करा
-         जिल्हाधिकारी
·        रूरअर्बन मिशनची बैठक, गावसमूहात 13 गावांचा समावेश
बुलडाणा, दि. 21 :  शामा प्रसाद मुखर्जी रूरअर्बन मिशन अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यातील सुलतानपूर गावसमूहाची निवड करण्यात आली आहे. या मिशन अंतर्गत निवडलेल्या गावसमूहामध्ये पायाभूत सोयी सुविधा, विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर केल्या जाणार आहे. सुलतानूपर गावसमूहात 13 गावे असून या सर्व गावांचा सर्वांगिण विकास करण्यात येणार आहे. यामध्ये अंतर्भूत असेलल्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केल्या आहेत.
   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शामाप्रसाद मुखर्जी रूरअर्बन मिशनच्या नियामक समितीची बैठक आज 21  सप्टेंबर 2017 रोजी पार पडली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल साकोरे, नगर रचनाकार ए. के जोशी, कार्यकारी अभियंता श्री. शेगोकार, गटविकास अधिकारी श्रीमती पाटील आदींसह उपस्थित होते.
    सुलतानूपर गावसमूहातील गावांमध्ये रस्ते, पथदिवे, आरोग्याच्या सुविधा दर्जेदार करण्याचे सूचीत करीत जिल्हाधिकारी म्हणाले, या गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा, संपूर्ण हगणदारीमुक्ती व नियमिती शौचालयांचा वापर, शोषखड्यांची निर्मिती करण्यात यावी. या गावांना अंतर्गत रस्त्यांनी जोडण्यात यावे. या गावसमूहाचा आराखडा त्वरित बनवावा. त्यामध्ये गाव विकासाच्यादृष्टीने आवश्यक सर्व बाबींचा समावेश करावा.
   यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी, जिल्हा परीषदेचे संबंधीत अधिकारी, निवडलेल्या गावांचे ग्रामसेवक आदी उपस्थित होते.
*********
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले जिल्हा दौऱ्यावर
बुलडाणा, दि. 21 :  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले 22 सप्टेंबर 2017 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :  दि. 22 सप्टेंबर 2017 रोजी दुपारी 2.30 वाजता अमरावती येथून खामगांव, जि. बुलडाणाकडे प्रयाण, सायं 5 वाजता खामगांव येथे आगमन व शोकसभेत सहभाग, सायं 6 वाजता बुलडाणा येथे आगमन व हॉटेल राधिका समोर , जैस्वाल ले आऊट मैदानावर सार्वजनिक सभेस उपस्थिती, सोयीनुसार बुलडाणा विश्राम गृह येथे रात्री मुक्काम असेल. दि. 23 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 7.30 वाजता बुलडाणा येथून चिखलीकडे प्रयाण, सकाळी 8.30 वाजता चिखली येथे आगमन व स्थानिक भेटी, सकाळी 8.45 वाजता चिखली येथून शिंदेफळ, ता. सेनगांव, जि. हिंगोलीकडे प्रयाण करतील.
                                                *************
जिल्ह्यात संततधार...
·                    संग्रामपूर  तालुक्यात सर्वात जास्त 63 मि.मी पावसाची नोंद
·                    सरासरी 19.1 मि.मी पाऊस
बुलडाणा, दि. 21 -  जिल्ह्यात नैरुत्य मान्सून पाऊस सक्रीय झाला असून सर्वदूर पाऊस होत आहे. पावसाची संततधार जिल्ह्यात सुरू आहे. काल रात्रीपासूनच बहुतांश ठिकाणी जिल्ह्यामध्ये पाऊस होत आहे.  या पावसाचा लाभ जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये होणार आहे. सर्वत्र पाऊस होत असल्यामुळे भुजल पातळीत वाढ होत आहे.   जिल्ह्यात आज 21 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील आकडेवारीनुसार सर्वात जास्त 63  मि.मी  पावसाची नोंद संग्रामपूर तालुक्यात झाली आहे.
      जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार पावसाची झालेली नोंद खालीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आतापर्यंत पडलेल्या पावसाची सर्वात जास्त पाऊस संग्रामपूर :63 मि.ली (484 मि.ली), चिखली : निरंक (653), मेहकर: 3 (694), दे.राजा: 11 (697),  लोणार: 4 (592), खामगांव : 15 (580.3), शेगांव : 20 (458), मलकापूर : 22 (649), मोताळा : 19 (607), नांदुरा: 23 (624.5), जळगांव जामोद : 20 (702), सि.राजा: 24 (682.1), बुलडाणा : 24 (926) मि.मी पावसाची नोंद करण्यात आली.  अशाप्रकारे  जिल्ह्यात एकूण 248  मि.ली पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी 19.1  मि.ली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस  बुलडाणा तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस शेगांव तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात 1 जुन 2017 पासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची  सरासरी 642.2  मि.ली आहे.
जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठ्यात वाढ
बुलडाणा पाटबंधारे विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये गत 24 तासात झालेल्या पावसामुळे जलसाठ्यांमध्ये वाढ नोंदविण्यात आली आहे. प्रकल्पनिहाय जलसाठा द.ल.घ.मी नुसार  पुढीलप्रमाणे आहे :
नळगंगा प्रकल्पीय संकल्पीत साठा : 69.32 टक्के, आजचा पाणीसाठा : 34.55 टक्के, पेनटाकळी प्रकल्पीय संकल्पीत साठा : 59.97 टक्के, आजचा पाणीसाठा : 17.10 टक्के, खडकपूर्णा प्रकल्पीय संकल्पीत साठा : 93.47, आजचा पाणीसाठा : 5.05, पलढग प्रकल्पीय संकल्पीत साठा : 7.51 टक्के, आजचा पाणीसाठा: 89.61 टक्के, ज्ञानगंगा - प्रकल्पीय संकल्पीत साठा : 33.93 टक्के, आजचा पाणीसाठा: 38.25 टक्के, मस : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 15.04 टक्के, आजचा पाणीसाठा: 26.99, कोराडी : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 15.12  टक्के, आजचा पाणीसाठा: 33.13 टक्के, मन : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 36.83 टक्के, आजचा पाणीसाठा: 23.35 टक्के, तोरणा : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 7.89 टक्के, आजचा पाणीसाठा: 28.39 टक्के, उतावळी : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 19.79 टक्के, आजचा पाणीसाठा: 24.86 टक्के.
                                                                        ***********
कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस..
-    सर्व कर्जाची माहिती न दिल्यास अर्ज होणार अपात्र
-    नव्याने अर्ज न भरताच जुन्या अर्जात एडीट ऑप्शनमधून माहिती द्यावी
- जिल्हा बँकेच्या कर्जाची नोंद ऑनलाईन अर्जामध्ये करावी
बुलडाणा, दि 21 :  छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना 2017 अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येत आहे. या योजनेतंर्गत अर्ज भरण्याचा उद्या 22 सप्टेंबर 2017 शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांनी त्वरित आपले सरकार केंद्र, महा ई सेवा केंद्र व सीएससी केंद्रावर जावून अर्ज भरावेत. तसेच  कर्जमाफी अर्जामध्ये सर्व बँकाकडील शेती कर्जाची माहिती द्यावी. ज्या शेतकऱ्यांनी विविध बँकांचे शेती कर्ज काढलेले आहे, त्यांनी सर्व बँक कर्ज खात्यांची माहिती अर्जात भरणे अत्यावश्यक आहे. यामध्ये जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचाही समावेश आहे. शेतकऱ्यांनी ज्या बँकेचे कर्ज घेतले आहे, त्या बँकेकडे आधार कार्ड व इतर माहिती सादर करावी.
    शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेव्यतिरिक्त इतर बँकाकडून कर्ज घेतले असले तरी त्यांना एकूण 1.50 लक्ष रूपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा बँक व इतर बँकेकडे आधार कार्ड आणि के.वाय.सी कागदपत्रे द्यावीत.  
       अशी माहिती भरण्यासाठी शेतकऱ्यांना नव्याने अर्ज भरण्याची गरज नसून त्याच अर्जामध्ये एडीट ऑप्शनद्वारे ही माहिती भरावी. अर्ज सादर करताना सर्व थकीत खातेदारांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक व ग्रामीण बँक अशा सर्व प्रकारच्या वित्तिय संस्थांकडून घेतेलल्या सर्व प्रकारच्या कर्जाची माहिती सादर केलेली नसल्यास ती सादर करावी. घेतलेल्या सर्व कर्जाची माहिती सादर केलेली नाही, असे आढळल्यास अशा खातेदारांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. अर्ज सादर करताना सर्व बँकाकडून घेतलेल्या संपूर्ण कर्जाची माहिती सादर करणे अनिवार्य आहे. तरी शेतकऱ्यांनी सर्व कर्ज खात्यांची माहिती ऑनलाईन्‍ अर्जात नमूद करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात व जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
*********
ई पॉस मशीन नसणाऱ्या 147 दुकानदारांची अनामत रक्कम जप्त
  • जिल्हा पुरवठा अधिकारी यांची कारवाई
  • 1 लक्ष 47 हजार रूपयांची रक्कम शासन जमा करण्याचे आदेश
बुलडाणा, दि. 21 -  जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानदारांना ईपॉस मशीनचे वितरण करण्यात आले होते. सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणून गैरव्यवहारांना आळा घालणे यामागील उद्देश होता. तसेच रास्तभाव पात्र लाभार्थ्यांना धान्याचे सुरळीत वितरण व्हावे. मात्र जिल्ह्यातील 147 स्वस्त धान्य दुकानदारांनी ई पॉस मशीनद्वारे धान्य वितरण केले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु काळे यांनी रास्तभाव दुकानाच्या प्राधिकार पत्राची 100 टक्के अनामत रक्कम दंड म्हणून शासन जमा केली आहे. दंडाच्या रक्कमेपोटी 1 लक्ष 47 हजार रूपये शासनजमा करण्याचे आदेश तहसीलदार यांना देण्यात आले आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु काळे यांनी कळविले आहे.

                                                            ******* 

No comments:

Post a Comment