Thursday 27 April 2017

news 27.4.2017 DIO BULDANA


पंतप्रधान कृषि सिंचन योजनेतंर्गत सुक्ष्म सिंचन संचासाठी ‘ई ठिबक’प्रणाली
·         1 मे 2017 पासून ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू
·        www.mahaethibak.gov.in  या संकेतस्थळावर अर्ज करावे
·        विविध टप्प्यावरील कार्यवाहीची माहिती एसएमएसद्वारे मिळणार
बुलडाणा, दि‍.27 पंतप्रधान कृषि सिंचन योजनेतंर्गत सुक्ष्म सिंचन योजना 2017-18 या वर्षाकरीता सुक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे व शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकृती करणे याकरीता ई-ठिबक आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. ही आज्ञावली 1 मे 2017 पासून सुरू होत असून या आज्ञावलीवर शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यास व शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. ही आज्ञावली 1 मे 2017 ते 31 डिसेंबर 2017 पर्यंत सुरू राहणार आहे.
   शेतकऱ्यांकडून सुक्ष्म सिंचन संचासाठी अर्ज केवळ www.mahaethibak.gov.in  या संकेतस्थळावरच स्वीकारण्यात येणार आहे. ई-ठिबक आज्ञावलीवर शेतकरी नोंदणीसाठी लाभार्थ्याचा आधार क्रमांक हाच लाभार्थ्याचा लॉग ईन आयडी असणार आहे. शेतकरी अर्जामध्ये E-KYC  साठी अर्जदारांची संमती असल्याबाबत ‘सुक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार संबंधीत माझ्या वैयक्तिक माहितीचा उपयोग करण्यास माझी सहमती आहे’ या तरतुदीचा समावेश करण्यात आला आहे.
  ई-ठिबक आज्ञावली केंद्र शासनाच्या डीबीटी (डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर) पोर्टलशी जोडण्यात येत आहे. यास्तव अर्जदाराच्या जन्मदिनांकाचा समावेश शेतकरी नोंदणी अर्जामध्ये करण्यात आला आहे. लाभार्थी नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड यंत्रणेद्वारे आधार कार्डचा डाटा ई-ठिबक आज्ञावलीशी संलग्न करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. तोपर्यंत लाभार्थ्यांना आधार अपलोड करण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर स्वयंचलीत संगणकीय प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध अनुदानाच्या मर्यादेत ऑनलाईन पुर्वसंमती प्रदान करण्यात येईल. पुर्वसंमती दिल्यानंतर शेतकऱ्यांचे 30 दिवसांच्या कालावधीत सुक्ष्म सिंचन संच बसवून, देयकाची प्रत ई-ठिबक आज्ञावलीवर अपलोड करणे बंधनकारक आहे. विहीत कालावधीत शेतकऱ्यांनी देयकाची प्रत अपलोड न केल्यास लाभार्थ्याचा अर्ज ई-ठिबक आज्ञावलीतून आपोआप रद्द करण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. लाभार्थ्याचा अर्ज आपोआप रद्द झाल्यानंतर पूर्व संमती आपोआप रद्द होईल तथापी लाभार्थ्यांस योजनेचा लाभ घेण्यासाठी पुन्हा अर्ज करता येईल.
   शेतकरी नोंदणी अर्जामध्ये ‘मी पूर्वसंमतीशिवाय सुक्ष्म सिंचन संच बसविल्यास अनुदानास पात्र असणार नाही, याची मला जाणीव आहे’ अशा आशयाच्या स्वयं घोषणापत्राचा समावेश करण्यात आला आहे. स्वयं घोषणापत्र देणे लाभार्थ्यास बंधनकारक आहे. अर्जामध्ये संच उत्पादक व वितरक यांचा समावेश असणार नाही. संच उत्पादकांचे व वितरकाचे नाव बील इनव्हाईस एंट्री नंतर मोका तपासणीच्या वेळी घेण्याची सुविधा देण्यात आली आहे.पूर्वसंमती प्राप्त केल्यानंतर 30 दिवसांच्या कालावधीत सुक्ष्म सिंचन संच बसवून ई-ठिबक आज्ञावलीमध्ये बील इनव्हाईस अपलोड करणे व अनुदान मागणीचा प्रस्ताव विहीत कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह तालुका कृषि अधिकारी कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.
  अर्जदारास विविध टप्प्यावर झालेल्या कार्यवाहीची माहिती मोबाईलद्वारे एसएमएस अलर्ट पाठविण्याची सुविधा निर्माण करण्यात आली असल्यामुळे मोबाईल क्रमांक बिनचूकपणे नोंदविणे आवश्यक आहे. तसेच बँक खाते क्रमांकात बदल करण्याची सुविधा बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बिनचूकपणे खातेक्रमांक नोंदवावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळ www.mahaethibak.gov.in यावर अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा
                                                                                    ******
                   वस्तू व सेवा कर कायद्याविषयी जनजागृतीपर कार्यशाळेला प्रतिसाद
·        विक्री कर विभागाच्यावतीने आयोजन
बुलडाणा, दि‍.27 केंद्र सरकारने वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी या कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन आज 27 एप्रिल 2017 रोजी स्थानिक बुलडाणा जिमखाना क्लब येथे करण्यात आले. या कार्यशाळेत जीएसटी कायद्याच्या कलमनिहाय व होणाऱ्या लाभाचे विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विक्रीकर उपायुक्त टी. के पाचारणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत सहायक विक्रीकर आयुक्त पी. बी राठोड, के.पी ढोले, विक्रीकर अधिकारी ए.पी अवचार, पी.पी करवंदे आदी
   यावेळी प्रास्ताविक पी.बी राठोड यांनी केले. तसेच पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे जीएसटीचे सादरीकरण विक्रीकर निरीक्षक यु.एस देशमुख व जी.एस जैस्वाल यांनी केले. याप्रसंगी व्यापारी व कर सल्लागार यांनी जीएसटीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे निरसन उपस्थित अधिकारी वर्गाने केले. यावेळी व्यापारी व कर सल्लागार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन विक्रीकर निरीक्षक जी.एस धंदर यांनी केले.
****
निलक्रांती योजनेतंर्गत एकदिवसीय कार्यशाळा व चर्चासत्राचे आयोजन
बुलडाणा, दि. 27 :  केंद्र शासनाचे निलक्रांती योजनेतंर्गत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेच्या मच्छीमार सभासद, मत्स्यव्यवसायिकांसाठी आणि मत्स्योद्योजकाकरीता तसेच शेततळीधारक मत्स्यकास्तकारांसाठी एकदिवसीय कार्यशाळा व चर्चासत्राचे आयोजन 5 मे 2017 रोजी सकाळी 11 वाजता बसथानकासमोर, प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात करण्यात आले आहे.  या कार्यशाळेत मत्स्यव्यवसाय, मत्स्योत्पादन दुपटीने वाढविणे, निलक्रांती योजना याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेकरीता मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे मच्छीमार सभासद, मत्स्यव्यवसायिकांनी तसेच शेततळीधारक मत्स्यकास्तकारांनी, मत्स्यउद्योजकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय स.ई नायकवडी यांनी केले आहे.
*****
जिल्हाधिकारी कार्यालयात
2 मे रोजी लोकशाही दिन
  बुलडाणा, दि. 27 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मात्र या सोमवारला 1 मे महाराष्ट्र दिनाची शासकीय सुट्टी असल्यामुळे येणारा लोकशाही दिन मंगळवार, दि. 2 मे 2017 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे.  या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत. तसेच तालुका स्तरावर तहसील कार्यालयात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.
         जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे. अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनी संबंधीत नागरिकांनी उपस्थित राहून दोन प्रतींमध्ये आपली निवेदने जिल्हाधिकारी यांना सादर करावीत. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत. तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही.

   
   तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल,  असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
*****
जिल्ह्यात तीन गावांसाठी पाण्याचे टँकर मंजूर
·        मेरा बु, असोला बु व गोरेगाव गावाचा समावेश
बुलडाणा, दि‍.27 - पाणी टंचाई आराखड्यामध्ये समाविष्‍ट जिल्ह्यातील 3 गावांसाठी पिण्याचे पाण्याचे टँकर मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये चिखली तालुक्यातील मेरा बु, असोला बु व सिंदखेड राजा तालुक्यातील गोरेगांव गावाचा समावेश आहे. मेरा बु येथील लोकसंख्या 1100 असून गावाकरिता 24 मेट्रीक टन क्षमतेचे 1 टँकर दिवसातून 3 फेऱ्या मारणार आहे. असोला बु च्या 2400 लोकसंख्येसाठी 24 मेट्रीक टन क्षमतेचे 1 टँकर दिवसातून 3 फेरी मारणार आहे. तर गोरेगांव 1945 लोकसंख्येकरीता याच क्षमतेचे एक टँकर दिवसातून 3 फेऱ्या मारणार आहे.
   गटविकास अधिकारी यांनी संबंधित गावांना वेळोवेळी भेटी देवून टँकरच्या खेपांची नोंद तपासावी. ग्रामपंचायतीने नोंद व्यवस्थित घ्यावी. टँकरचे पाणी शुद्ध करूनच पुरविल्या जात असल्याबाबत दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाणी टंचाई निवारण कक्षाने कळविले आहे.
*****
राष्ट्रध्वजाचा राखा सन्मान.. वाढेल देशाचा अभिमान !...
·         हँण्ड स्पून राष्ट्रध्वज पायदळी तुडवू नका
 बुलडाणा,दि.27: दरवर्षी 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट व अन्य राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिक प्लास्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. सदर कार्यक्रम पार पाडल्यानंतर फाटलेले कागदी राष्ट्रध्वज तसेच प्लास्टीकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले दिसतात, असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो.                                   राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबतच्या तरतुदी आहेत. राष्ट्रध्वज हा हँण्ड स्पून आणि हस्तनिर्मित वूल, कॉटन, सिल्क आदीमध्ये असावा. राष्ट्रध्वजाचा आकार आयाताकृती, त्याची उंची व रुंदी 3:2 असावी. राष्ट्रध्वजाचा आकार 9 प्रकारात पुढीलप्रमाणे असायला पाहिजे. त्याचा आकार प्रकारानुसार लांबी व रुंदी दिली आहे. प्रकार 1 लांबी, रुंदी अनुक्रमे 6300 व 4200 मीटर, प्रकार 2 लांबी, रुंदी अनुक्रमे 3600 व 2400, प्रकार 3 लांबी, रुंदी अनुक्रमे 2700 व 1800, प्रकार 4 लांबी, रुंदी अनुक्रमे 1800 व 1200, प्रकार 5 मध्ये लांबी, रुंदी अनुक्रमे 1350 व 900, प्रकार 6 मध्ये लांबी, रुंदी अनुक्रमे 900 व 600, प्रकार 7 मध्ये लांबी, रुंदी अनुक्रमे 450 व 300, प्रकार 8 लांबी, रुंदी अनुक्रमे 225 व 150, प्रकार 9 लांबी, रुंदी अनुक्रमे 150 व 100 मीटर असावी. राष्ट्रध्वजाचा व्हीव्हीआयपी विमानासाठी आकार 450 बाय 100 मीटर, मोटार कारसाठी 225 बाय 150 मीटर आणि टेबलसाठी 150 बाय 100 मीटर असावा.

     भारतीय ध्वजसंहितेमध्ये दिलेल्या तरतूदीनुसार राष्ट्रध्वजाचा वापर करताना खराब झालेल्या, माती लागलेल्या ध्वजाची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. परंतु तसे होत नसल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरवर्षी 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट व अन्य राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिक प्लास्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. याठिकाणी पायदळी तुडविलेले राष्ट्रध्वज गोळा करून तालुका व जिल्हा स्तरावर निर्मित करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहे. त्यांनी असे राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करावे. खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कापडामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सुर्यास्तानंतर व सुर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्वच्छ जागेत सन्मानपूर्वक जाळून नष्ट करावे.हे करताना उपस्थितांनी उभे रहावे व जाळून पुर्णपणे नष्ट होईपर्यंत जागा सोडू नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.  

No comments:

Post a Comment