Saturday 3 February 2018

news 3.2.2018 dio buldana

अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ई विकास प्रणालीवर सादर करावे
·        https://etribal.maharashtra.gov.in संकेतस्थळ विकसित
बुलडाणा, दि.3 – प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला अंतर्गत जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय,  अनुदानित, कायम विनाअनुदानित, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ई विकास प्रणालीवर अर्ज सादर करावे. शासनाने यापूर्वी महाडीबीटी पोर्टल विकसित केले होते. मात्र या पोर्टलवर काही विद्यार्थ्यांनी अर्जाची नोंद करण्यास व महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांचे परिपूर्ण अर्ज  प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत.  
    सन 2017-18 या शैक्षणिक वर्षातील भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेचे अर्ज यापूर्वीच कार्यरत असलेल्या ई विकास प्रणाली अर्थातच https://etribal.mharashtra.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहे. तरी प्रस्ताव ऑनलाईन सादर करावे. महाविद्यालयांनी  विद्यार्थ्यांचे प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, अकोला या कार्यालयाकडे सादर करण्यास विलंब झाल्यास सदर कार्यालय जबाबदार राहणार नाही, असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प, अकोला यांनी कळविले आहे.
                                                                                    ***
  ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ऑनलाईन अर्जप्रक्रिया
बुलडाणा, दि.3 – राज्य निवडणूक आयोगाचे आदेशाप्रमाणे जिल्ह्यात होत असलेल्या सार्वत्रिक व ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात येणार आहे. पारंपारिक पद्धतीऐवजी संगणकीकृत पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नामनिर्देशनपत्रे भरण्यापासून उमेदवार निवडून आल्याबाबतचे प्रमाणपत्र जारी करण्याची कार्यवाही पार पडेपर्यंतचे सर्व टप्पे आयोगाच्या आज्ञावलीनुसार संगणकीकृत पद्धतीने राबविण्यात येणार आहे. जिल्हयातील तीन सार्वत्रिक व 102 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकांसाठी निवडणूकीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. याची नोंद सदर निवडणूकांमध्ये निवडणूक लढविणाऱ्या जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात  आले आहे.
                                                            ******
जिल्हाधिकारी कार्यालयात
 5 फेब्रुवारी  रोजी लोकशाही दिन
  बुलडाणा, दि.2 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या महिन्याचा सदर लोकशाही दिन सोमवार 5 फेब्रुवारी 2018 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे.  या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत. तसेच तालुका स्तरावर तहसील कार्यालयात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.
         जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे.
   अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनी संबंधीत नागरिकांनी उपस्थित राहून दोन प्रतींमध्ये आपली निवेदने जिल्हाधिकारी यांना सादर करावीत. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत. तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही.
   तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात,  प्राधिकाऱ्यां-कडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल,  असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                                        ******
महिला उद्योजकांना पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित
  • 5 फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव सादर करावे
  बुलडाणा, दि.2 : महिला उद्योजकांसाठी असलेल्या महिला धोरण – 2017 अंतर्गत सन 2017-18 करीता महिला उद्योजकांना पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यानुसार उद्योग व्यवसायातील सर्वोत्तमतेसाठी महिला उद्योजकांना वेगळ्या संवर्गामध्ये सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महिला उद्योजकांनी स्थापन केलेल्या सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांनी केलेल्या प्रशंसनीय कामासाठी व सुप्त महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पुरस्कार देण्यात येईल. त्याअनुषंगाने विहीत पात्रता व निकष पुर्ण करणाऱ्या महिला उद्योजकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे.  तरी महिला उद्योजकांनी विहीत नमुन्यातील सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव विभागीय उद्योग सहसंचालक कार्यालय, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे कार्यालयांकडे 5 फेब्रुवारी 2018 पर्यंत सादर करावे.                 
        त्यासाठी उद्योग घटक हा गेली तीन वर्ष सतत उत्पादन देणारा असावा, यापूर्वी उद्योग विभागामार्फत कुठलाही पुरस्कार मिळालेला नसावा, एकल मालकी घटक असल्यास महिला उद्योजकाचे 100 टक्के भाग भांडवल असावे, भागीदारी असेल तर भागीदारी घटकामध्ये 100 टक्के भाग भांडवल असावे, सहकारी क्षेत्रामध्ये सहकार कायद्यातंर्गत सहकारी संस्थेमध्ये 100 टक्के महिला उद्योजकांचा समावेश असावा, खाजगी किंवा सार्वजनिक मर्यादीत घटकात महिला उद्योजकांचे किमान 100 टक्के भाग भांडवल असलेली कंपनी असावी, स्वयं सहायता बचत गटामध्ये नोंदणीकृत गट असावा, आदी निकष पूर्ण करणाऱ्या महिला उद्योजकांनी प्रस्ताव सादर करावा. सन 2017-18 करीता फेब्रुवारी 2018 मध्ये मुंबई येथे आयोजित मॅग्नेटीक कर्न्व्हजन्स 2018 कार्यक्रमात पुरस्कार देण्यात येणार आहे, असे महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांनी कळविले आहे.
                                                            *****
शेगांव तालुक्यातील चिंचोली गावासाठी टँकर मंजूर
बुलडाणा दि3 – शेगांव तालुक्यातील चिंचोली येथील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावासाठी पाणीपुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. चिंचोली गावाची लोकसंख्या 2900 असून एक टँकर मंजूर करण्यात आले आहे.  टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
********
    अप्पर जिल्हाधिकारी यांना कुठलाही घेराव नाही
बुलडाणा दि 3 – अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये 2 फेब्रुवारी 2018 रोजी काही शेतकरी खडकपूर्णा प्रकल्प उपसा सिंचन प्रकल्पाकरीता अधिग्रहीत जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही, या दृष्टीकोनातून निवेदन सादर करण्यासाठी आले होते. या शेतकऱ्यांनी केवळ निवेदन सादर केले. कुठल्याही प्रकारचा घेराव घातला नाही. त्यामुळे घेराव घातला असल्याचे वृत्त वास्तविक परिस्थितीशी निगडीत नाही. केवळ निवेदन देण्यात आले, असा खुलासा अप्पर जिल्हाधिकारी श्री. दुबे यांनी केला आहे.
*****



गहू, तांदूळ व साखरेचे मासिक परिमाण व दर जाहीर
  • तूर डाळ प्रति कार्ड 1 किलो 55 रूपये किलो दराने मिळणार
बुलडाणा दि 3 – शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्याकरीता माहे फेब्रुवारी 2018 करीता गहू, तांदूळ व साखरेचे मासिक नियतन प्राप्त झाले आहे. शिधापत्रिका धारकांना वाटप करण्यात  येणाऱ्या अन्नधान्याचे व साखरेचे मासिक परिमाण व दर निश्चित करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने माहे फेब्रुवारी 2018 करीता गहू, तांदूळ व साखरेचे तीन योजनांचे दर व परिमाण खालीलप्रमाणे देण्यात येत आहे:
   राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत समाविष्ट न होणारे एपिएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थी : गहू 4 किलो प्रतिव्यक्ती दोन रूपये किलो, तांदूळ 1 किलो प्रतिव्यक्ती 3 रूपये किलो. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थी : दे.राजा, मेहकर, लोणार व सिंदखेड राजा करीता गहू 4 किलो प्रतिव्यक्ती रूपये दोन किलो,  तसेच मलकापूर, नांदुरा, खामगांव, जळगांव जामोद, शेगाव, संग्रामपूर, बुलडाणा, चिखली, मोताळा करीता मका 1 किलो प्रतिव्यक्ती 1 रूपये दराने, तर गहू प्रतिव्यकती 3 किलो 2 रूपये किलो दराने देण्यात येणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत अंत्योदय योजनेतील लाभार्थी : दे.राजा, मेहकर, लोणार व सिं.राजा करीता प्रतिकार्ड गहू 30 किलो दोन रूपये दराने, तसेच मलकापूर, नांदुरा, खामगांव, जळगांव जामोद, शेगाव, संग्रामपूर, बुलडाणा, चिखली, मोताळा करीता मका 12 किलो प्रतिकार्ड 1 रूपये दराने, तर गहू प्रतिकार्ड 18 किलो 2 रूपये किलो दराने देण्यात येणार आहे. तांदुळ 5 किलो प्रतिकार्ड 3 रूपये दराने आणि साखर प्रतिकार्ड 1 किलो 20 रूपये दराने मिळणार आहे. सर्व योजनांमधील लाभार्थ्यांसाठी तूर डाळ प्रति कार्ड 1 किलो 55 रूपये दराने देण्यात येणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                                    ****

No comments:

Post a Comment