Tuesday 29 November 2016

news 29.11.2016 dio buldana

वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध जमिनीची माहिती  द्यावी
-         जिल्हाधिकारी
·        वृक्ष लागवड मोहिम यशस्वी करावी
·        यावर्षी जिल्ह्याला 10.54 लक्ष वृक्षारोपणाचे उद्दिष्ट
बुलडाणा, दि. 29 : यावर्षी 1 जुलै रोजी सर्वांनी हिरीरीने सहभाग घेवून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड मोहिम यशस्वी केली होती. त्यानुसार पुढील वर्षामध्ये सुद्धा आपणाला समन्वयाने वृक्ष लागवड मोहिम यशस्वी करायची आहे. यावर्षी जिल्ह्याला 10.54 लक्ष वृक्षलागवडीचे उद्दिष्ट मिळाले असून राज्यभर 4 कोटी वृक्षारोपण करावयाचे आहे. त्याकरिता प्रत्येक विभागाने आपल्याकडे वृक्षारोपणासाठी उपलब्ध असलेल्या जमिनीची माहिती तात्काळ सादर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी केल्या आहेत.
      वृक्षलागवडी बाबत बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दिपा मुधोळ, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, उपवनसंरक्षक बी. टी भगत, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक श्री. मित्र आदींसह संबंधीत विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
         प्रत्येक विभागाने आपल्याला मिळालेल्या उद्दिष्टाप्रमाणे कार्यवही करण्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, जागा निश्चित झाल्यानंतर खड्डे खोदावी, अक्षांश व रेखांश देणे आदी करायची आहेत. मार्च 2017 पूर्वी सर्व जागांचे खड्डे खोदलेले असावे. मागील वर्षी केलेल्या वृक्षारोपणाचा जिवंतपणाची काळजी घ्यावी. जीवंत रोपांचे प्रमाण वाढवावे. त्याचप्रमाणे वन विभागाने रोपांची उपलब्धता ठेवावी.
  बैठकीत विभागनिहाय सूचना देण्यात आल्या. बैठकीत उपवनसंरक्षक बी.टी भगत यांनी माहिती दिली.  
                                                                                   ****
शिष्यवृत्तीचे 5 हजार 108 अर्ज महाविद्यांलयांकडे प्रलंबित
·        महाविद्यालयांनी तात्काळ अर्ज समाज कल्याण विभागाकडे सादर करावे
बुलडाणा दि‍. 29 - अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण, परीक्षा शुल्काचे सन 2014-15 चे 1 हजार 710 अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित आहेत. तसेच सन 2015-16 चे 3 हजार 398 अर्ज प्रलंबित असून एकूण 5 हजार 108 अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित आहेत.
     सदर अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित असल्याचे डॅश बोर्डवरून निदर्शनास येत आहे. याबाबत सर्व महाविद्यालयांना यापूर्वी कळविण्यात आले होते. मात्र महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी त्यांचे स्तरावर अर्ज प्रलंबित ठेवले आहेत. प्रलंबित असलेले, पडताळणी न केलेले अर्ज छाननी व पडताळणी  करून सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे तात्काळ सादर करण्यात यावे. शिष्यवृत्ती मिळण्यापासून विद्यार्थी वंचित राहील्यास व विद्यार्थ्यांची तक्रार आल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदार राहतील. वारंवार सूचना देवूनही प्रलंबित अर्जांची संख्या प्रचंड असल्याचे दिसून आले आहे.
        सदर अर्ज शिष्यवृत्तीसाठी पात्र असल्याची माहिती यामुळे कार्यालयाला मिळत नाही. पात्र असलेले अर्ज महाविद्यालयांनी तात्काळ विद्यार्थ्यांच्या पात्रतेची खात्री करून प्रपत्र ब तसेच प्रथम वर्षाचे आरक्षण प्रवर्गाच्या हार्ड प्रती, व्यावसायिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शासकीय कोट्यातील प्रवेश असल्याचे डी.टी.ई चे प्रमाणीत याद्यांसह सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास सादर करावे,  असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांनी केले आहे.
गावांच्या समृद्धीसाठी आता स्मार्ट ग्राम योजना..
·        तालुका स्मार्ट ग्रामला 10 लक्ष, तर जिल्हा स्मार्ट गावाला 40 लक्ष रूपये बक्षीस
·        ग्रामपंचायतींनी 8 ते 15 डिसेंबर 2016 पर्यंत प्रस्ताव सादर करावे
बुलडाणा दि‍. 29 गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्याकरिता पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करून समृद्ध, संपन्न गावांची निर्मितीसाठी शासनाने स्मार्ट ग्राम योजना आणली आहे. राज्यात सन 2010-11 पासून पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेतंर्गत  उद्दिष्टे साध्य ग्रामपंचायतींना निधीच्या स्वरूपात पुरस्कार दिला जातो. सदर योजना विकासाचे एक आदर्श स्वरूप असली तरी राज्यामध्ये एक समान स्वरूपाचे निकष दिले गेल्याने काही जिल्हे व विभागांना या योजनेचा व्यवस्थित रित्या लाभ घेता आला नाही.
   सर्व विभागातील आर्थिक व सामाजिक परिस्थिती विचारात घेवून पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेच्या निकष व स्वरूपात बदल करून राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीस योजनेत सहभागी होण्याची समान संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेकरीता निवडण्यात येणारी ग्रामपंचायत शासनाकडून देण्यात आलेल्या निकषांच्या आधारे गुणांकन पद्धतीने पारदर्शकता ठेवून निवडली जाणार आहे. त्याकरिता गावांची विभागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मोठ्या ग्रामपंचायती, शहरालगत असलेल्या ग्रामपंचायती, पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, आदिवासी किंवा पेसा ग्रामपंचायती व उर्वरित ग्रामपंचायती आदींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक दृष्टीकोनातून खूप मोठी तफावत दिसून येते. त्यामुळे सदरील ग्रामपंचायतीला त्यांच्या क्षमतेनुसार गुणांकन देण्यात आले आहे. स्वच्छता (sanitation), व्यवस्थापन (management), दायित्व (accountibility), अपारंपारिक उर्जा आणि पर्यावरण (renewable energy & environment), पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर (transparancy & technology) अशा्रपकारे संक्षिप्तमध्ये SMART या आधारावर ही गुणांकन पद्धत आहे. त्याकरिता 100 गुण ठेवण्यात आले आहे.
   योजनेकरीता गावांची निवड सहभागी ग्रामपंचायतीने स्व मुल्यांकन करून त्यांचे प्रस्ताव तपासणीकरीता संबंधीत पंचायत समिती कार्यालयास 8 ते 15 डिसेंबर 2016 पर्यंत सादर करावेत. सदर यादीपैकी सर्वाधिक गुण प्राप्त 25 टक्के ग्रामपंचायतीची यादी / प्रस्ताव तपासणीकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे पंचायत समितीद्वारे 8 ते 15 डिसेंबर 2016 पर्यंत सादर करण्यात येणार आहे. संबंधीत तालुक्यातील प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतीच्या एकूण स्व मुल्यांकन प्रस्तावांपैकी अधिक गुण प्राप्त 25 टक्के ग्रामपंचातीची तालुका तपासणी समिती तपासणी करणार आहे. त्यानंतर त्यांना गुणांकन देण्यात येतील. तपासणी करण्याकरिता प्रत्येक तालुका स्तरावर समितीचे गठण करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावरील तालुका तपासणी समिती अन्य तालुक्यातील तपासणी करणार आहे.
   तालुका स्तरावरील सर्वाधिक गुण प्राप्त झालेली ग्रामपंचायत तालुका स्मार्ट ग्राम असणार आहे. सदर ग्रामपंचायत जिल्हा स्तरावरील द्वितीय स्पर्धेकरीता पात्र असेल. जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुका स्मार्ट ग्राम यांचे सर्वसाधारणपणे तीन महिन्यानंतर पुर्नमुल्यांकन करण्यात येणार आहे. यामधून सर्वाधिक गुण मिळालेल्या ग्रामपंचायतीस जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून घोषीत करण्यात येणार आहे.
  तालुकास्तराव प्रथम निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतीस 10 लक्ष, जिल्हास्तरावर निवडण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतीस 40 लक्ष आणि जिल्हास्तरावर स्मार्ट ग्राम म्हणून निवडण्यात येणाऱ्या ग्रामपंचातीस 50 लक्ष रूपये पारितोषिक देण्यात येणार आहे. तरी या योजनेत सहभागी होवून दिलेल्या मुदतीमध्ये स्व मुल्यांकनाचा प्रस्ताव पंचायत समितीला सादर करण्याचे आवाहन जि.प अध्यक्षा श्रीमती अलकाताई खंडारे, उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ यांनी केले आहे.
                                                               ********







सन 2017-18 चे बाजारमुल्य  दरतक्ते तयार करणे सुरू
·        नागरिकांनी सुचना व अभिप्राय 7 डिसेंबर 2016 पर्यंत सादर करावे
बुलडाणा दि 29- नोंदणी व मुद्रांक विभागाकडुन  जिल्ह्यातील  सर्व नगर परीषदा, नगर पंचायती  तसेच प्रभाव क्षेत्र , ग्रामीण क्षेत्राचे सन 2017-2018  या आर्थीक वर्षाचे  मुद्रांक शुल्क  आकारणीसाठी उपयोगात  येणारे बाजारमुल्य 2017-2018 चे दर तक्ते तयार करण्याचे काम सुरु आहे. प्रस्तावित होणाऱ्या बाजार मुल्य दर तक्त्याबाबतीत  नागरीकांच्या सुचना / अभिप्राय असल्यास आपल्या तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालया किंवा सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय ,बुलडाणा यांचेकडे 7 डिसेंबर 2016 पर्यत सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                           **********
                महाविद्यालयाचे  प्राचार्य  व शिष्यवृत्ती संबंधीत लिपीक यांच्या कार्यशाळेचे आयोजन
             बुलडाणा दि 29- भारत सरकार  शिष्यवृत्ती  /शिक्षण फी  परीक्षा  फी प्रदानाबाबत व महाविद्यालय स्तरावर प्रलंबीत  असलेल्या अर्जाचा आढावा घेणेबाबत  महाविद्यालयाचे प्राचार्य व शिष्यवृत्ती संबंधीत कामकाज सांभाळणारे लि‍पीक यांची कार्यशाळेचे आयोजन  1 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 11.00 वाजता  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक भवन चिखली रोड, बुलडाणा येथे करण्यात आले आहे, तरी या कार्यशाळेला प्राचार्य व संबंधीत लिपिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.

                                                                                   *****

No comments:

Post a Comment