चला, दुर्ग बनवूया!’; अमृत दुर्गोत्सव २०२६ मध्ये सहभागी व्हा ५ ते २० नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन नोंदणी; पर्यावरणपूरक दुर्ग प्रतिकृती उभारण्याचे आवाहन
बुलढाणा, दि. २२ (जिमाका) : महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक
आणि दुर्गपरंपरेचे जतन व संवर्धन करण्यासह नव्या पिढीमध्ये गड-दुर्गांविषयी अभिमान
निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र
शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘आपला दुर्ग,
आपली मानवंदना — चला, दुर्ग बनवूया!’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात सहभागी होण्यासाठी
५ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.
छत्रपती
शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, दुर्गसंवर्धनाबाबत
जनजागृती करणे आणि ऐतिहासिक वारशाविषयी आदर व अभिमानाची भावना निर्माण करणे हा या उपक्रमाचा
मुख्य उद्देश आहे. दिवाळीच्या कालावधीत लहान मुले, युवक, कुटुंबे, शाळा, महाविद्यालये
आणि विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन दुर्गांच्या प्रतिकृती तयार करण्याच्या परंपरेला
प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
छत्रपती
शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी, नियोजन आणि कुशल नेतृत्वाच्या बळावर महाराष्ट्रातील गड-दुर्गांचा
उपयोग स्वराज्याच्या संरक्षणासाठी केला. हे दुर्ग म्हणजे शौर्य, स्वाभिमान, पराक्रम
आणि राष्ट्रनिष्ठेची प्रतीके आहेत. त्यामुळे दुर्गांच्या प्रतिकृती तयार करून त्यांना
मानवंदना देणे, ही केवळ सांस्कृतिक परंपरा नसून ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी लोकसहभाग
वाढविण्याची संधी असल्याचे अमृतच्या वतीने सांगण्यात आले.
सन
२०२५ मध्ये ‘Maratha Military Landscapes of India’ या नावाने मराठा लष्करी भूदृश्यांचा
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाला विशेष
महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील १२ दुर्गांना जागतिक वारशाचा दर्जा मिळाल्याचा
गौरव अधोरेखित करत दुर्गसंस्कृतीविषयी व्यापक जनजागृती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून
केला जाणार आहे. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांतील नागरिकांसह देश-विदेशातील व्यक्ती
आणि विविध गटांनाही या उपक्रमात सहभागी होता येणार आहे.
पाच
टप्प्यांत सहभाग : अमृत दुर्गोत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी प्रथम कुटुंबीय,
मित्रपरिवार किंवा समूहासोबत सुरक्षित जागेची निवड करावी. त्यानंतर माती, दगड, विटा,
कागद यांसारख्या पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून दुर्गाची प्रतिकृती तयार करावी.
तयार केलेल्या दुर्गासोबत स्वतःचे स्पष्ट छायाचित्र काढून अधिकृत ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेद्वारे
ते अपलोड करावे. नोंदणी क्रमांक प्राप्त झाल्यानंतर तपासणी पूर्ण झाल्यावर डिजिटल अभिनंदनपत्र
डाउनलोड करता येणार आहे. सहभागींसाठी २४ तासांत अभिनंदनपत्र मिळविण्याची सुविधाही उपक्रमात
नमूद करण्यात आली आहे.
पर्यावरणपूरक
साहित्य वापरण्याचे आवाहन : दुर्गांच्या प्रतिकृती उभारताना पर्यावरणपूरक साहित्याचा
वापर करावा, परिसर स्वच्छ ठेवावा आणि सार्वजनिक सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. रस्ते,
पादचारी मार्ग किंवा अग्निसुरक्षेला अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी दुर्ग उभारू नयेत,
असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक
माहितीसाठी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक जिग्नेश कमाणी यांच्याशी ९११२२२७६३७ या क्रमांकावर
संपर्क साधावा. अमृत जिल्हा कार्यालय, फ्लॅट क्रमांक ३०५, तिसरा मजला, बुलढाणा प्राइड
बिल्डिंग, तहसील कार्यालयासमोर, बुलढाणा – ४४३००१ येथेही संपर्क साधता येईल. ‘चला,
आपल्या संस्कृतीचा वारसा जपूया आणि अमृत दुर्गोत्सव २०२६ मध्ये सहभागी होऊया!’ असे
आवाहन महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने करण्यात
आले आहे.
00000
Comments
Post a Comment