विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत चांदूर बिस्वा येथे आरोग्य शिबिर विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, संतुलित आहार आणि आरोग्यदायी सवयींबाबत मार्गदर्शन
बुलढाणा,
दि. १6 (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचे आरोग्य संवर्धन, वैयक्तिक
स्वच्छतेबाबत जनजागृती आणि आरोग्यदायी सवयींचा प्रसार करण्याच्या उद्देशाने यशवंत हायस्कूल,
चांदूर बिस्वा येथे १५ ऑक्टोबर रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. आयुष्मान आरोग्य
मंदिर, चांदूर बिस्वा यांच्या माध्यमातून आयोजित या शिबिरात विद्यार्थ्यांची आरोग्य
तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रंजित मंडाले, तालुका आरोग्य अधिकारी
डॉ. रिंढे, गटविकास अधिकारी श्री. शेख आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. अकोदे यांच्या मार्गदर्शनाखाली
हा उपक्रम राबविण्यात आला.
शिबिरादरम्यान समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मीरा मरकड यांनी विद्यार्थ्यांची
आरोग्य तपासणी केली. यावेळी विद्यार्थ्यांना हात धुण्याची योग्य पद्धत, नखे स्वच्छ
व लहान ठेवण्याचे महत्त्व, जेवणापूर्वी तसेच शौचालयाचा वापर केल्यानंतर साबणाने हात
धुण्याची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच दातांची नियमित स्वच्छता, संतुलित
आहार आणि स्वच्छ पिण्याचे पाणी यांचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना
समजावून सांगण्यात आले.
आरोग्य शिबिराच्या यशस्वितेसाठी आरोग्य सेविकांनी बालकांच्या नियमित
लसीकरणासह विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी सक्रिय सहभाग नोंदविला. आरोग्य सेवकांनी पिण्याच्या
पाण्याच्या तपासणीसह विविध आरोग्यविषयक कामांमध्ये सहकार्य केले. आशा सेविकांनी विद्यार्थ्यांमध्ये
वैयक्तिक स्वच्छता, हात धुण्याची योग्य पद्धत आणि आरोग्यदायी सवयींबाबत जनजागृती केली.
यशवंत हायस्कूलच्या मुख्याध्यापकांसह शिक्षकवृंदाने शिबिराचे नियोजन,
विद्यार्थ्यांचे सहकार्य आणि उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान
दिले. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच स्वच्छता आणि आरोग्यविषयक चांगल्या सवयी रुजविणे,
आजारांपासून बचावाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि निरोगी समाजनिर्मितीला चालना देणे,
हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. आरोग्य विभाग आणि शैक्षणिक संस्थेच्या समन्वयातून
राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला संबंधित अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि
शिक्षकवृंदाचे सहकार्य लाभले.
0000



Comments
Post a Comment