थकीत कर्जावरील व्याजात ५० टक्के सवलत; ३१ मार्च २०२७ पर्यंत एकरकमी परतफेड योजनेचा लाभ घ्या इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचे थकबाकीदार लाभार्थ्यांना आवाहन
बुलढाणा, दि. १२ (जिमाका)
: महाराष्ट्र
राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत वितरित करण्यात आलेल्या कर्जाची
थकबाकी असलेल्या लाभार्थ्यांसाठी एकरकमी परतावा (ओटीएस) योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत थकीत व्याजाच्या रकमेत ५० टक्के सवलत देण्यात येणार असून, लाभार्थ्यांनी
३१ मार्च २०२७ पर्यंत या योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन करण्यात आले
आहे.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित,
मुंबई यांच्या जिल्हा कार्यालयामार्फत बुलढाणा जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना
स्वयंरोजगारासाठी विविध कर्ज योजनांच्या माध्यमातून अल्प व्याजदराने कर्ज वितरित करण्यात
आले आहे. या कर्जाची थकबाकी असलेल्या लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी महामंडळाने एकरकमी
परतावा योजना सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत थकीत कर्जाच्या व्याजाच्या रकमेत ५० टक्के सवलत देण्यात
येणार आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना थकीत मुद्दल व सवलतीनंतरचे व्याज एकरकमी
भरून कर्जाची परतफेड करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ही योजना ३१ मार्च २०२७ पर्यंत
लागू राहणार आहे.
जिल्ह्यातील सर्व संबंधित थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन
आपली थकबाकी भरावी व कर्जमुक्त व्हावे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय
वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली
रोड, जिल्हा कार्यालय, बुलढाणा येथे संपर्क साधावा किंवा ०७२६२-२४८२८५ या दूरध्वनी
क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment