बुलढाणा, दि. १६ (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या अंतर्गत
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने
मलकापूर येथे २३ ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन व सॉफ्ट
टेनिस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये राज्यातील आठ विभागांतील
१४ वर्षांखालील मुले व मुलींचे संघ सहभागी होणार आहेत.
बॅडमिंटन स्पर्धा जनता
कला व वाणिज्य महाविद्यालय, मलकापूर येथे, तर सॉफ्ट टेनिस स्पर्धा तालुका क्रीडा संकुल,
मलकापूर येथे होणार आहे. या स्पर्धांसाठी बॅडमिंटन व सॉफ्ट टेनिस संघटनांचे तांत्रिक
सहकार्य लाभणार आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी दोन्ही ठिकाणी आवश्यक क्रीडा सुविधा सज्ज
करण्यात आल्या आहेत. जनता कला व वाणिज्य महाविद्यालयात बॅडमिंटनचे चार अद्ययावत कोर्ट,
तर तालुका क्रीडा संकुलात सॉफ्ट टेनिसचे अद्ययावत कोर्ट तयार आहे.
स्पर्धेचा उद्घाटन समारंभ
शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता जनता कला व वाणिज्य महाविद्यालय, बुलढाणा
रोड, मलकापूर येथे होणार आहे. यावेळी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे अधिकारी, अमरावती
विभागाचे उपसंचालक, जिल्हा क्रीडा परिषदेचे पदाधिकारी, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त
खेळाडू, बॅडमिंटन व सॉफ्ट टेनिस संघटनांचे प्रतिनिधी, क्रीडा अधिकारी, कर्मचारी आणि
क्रीडाप्रेमी उपस्थित राहणार आहेत.
खेळाडूंच्या निवास व
भोजनाची व्यवस्था : स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली
आहे. मुलींची निवास व्यवस्था यशोधाम पब्लिक स्कूल, मलकापूर येथे, तर मुलांची निवास
व्यवस्था नूतन विद्यालय, मलकापूर येथे करण्यात आली आहे. निवासस्थानापासून स्पर्धास्थळापर्यंत
खेळाडूंच्या ने-आण करण्यासाठी स्कूल बसची व्यवस्था करण्यात आली असून, भोजनाची व्यवस्थाही
स्पर्धास्थळी करण्यात येणार आहे.
स्पर्धांचे नियोजन व
यशस्वी आयोजन करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या अध्यक्षतेखाली १४
ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा परिषदेची बैठक घेण्यात आली. या बैठकीत दोन्ही राज्यस्तरीय
स्पर्धांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी जनता कला व वाणिज्य महाविद्यालयाचे
शारीरिक शिक्षण संचालक डॉ. कैलास पवार, यशोधाम पब्लिक स्कूलच्या प्राचार्या तसेच बॅडमिंटन
व सॉफ्ट टेनिस संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
स्पर्धांच्या यशस्वी
आयोजनासाठी आयोजन, तक्रार निवारण, उद्घाटन, तांत्रिक, मैदान व्यवस्था, भोजन, निवास,
वैद्यकीय, प्रसिद्धी आणि स्वच्छता अशा विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. निमंत्रणपत्रिका,
प्रमाणपत्रे, भोजन पासेस व इतर आवश्यक दस्तऐवजांची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
तालुका क्रीडा संकुलातील
मैदान सरावासाठी बंद : राज्यस्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धा २३ ते २५ ऑक्टोबरदरम्यान
तालुका क्रीडा संकुल, मलकापूर येथे होणार असल्याने या कालावधीत सैन्यभरती व पोलीस भरतीच्या
सरावासाठी मैदान बंद ठेवण्यात येणार आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन
करण्यात आले आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांच्या मार्गदर्शनाखाली
स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी प्रयत्नशील आहेत. जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी, स्थानिक
शाळा आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे.
तसेच इच्छुक खेळाडूंना स्पर्धा पाहण्यासाठी मैदानावर पाठविण्याचे नियोजन करावे, असे
आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांनी केले आहे.
000
Comments
Post a Comment