दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात ; ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी नानासाहेब जामदार यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २१ हजार रुपयांचे योगदान
बुलढाणा, दि. १५ (जिमाका) : जिल्ह्यात
निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना
मदतीचा हात देण्यासाठी चिखली येथील ८६ वर्षीय ज्येष्ठ व प्रगतिशील शेतकरी नानासाहेब
जामदार यांनी सामाजिक बांधिलकीचे अनुकरणीय उदाहरण घालून दिले आहे. स्वतःचा वाढदिवस
साजरा करण्यासाठी होणारा खर्च टाळून त्यांनी २१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता
निधीसाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्याकडे आज, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी
सुपूर्द केला.
यंदाच्या
दुष्काळी परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि त्यांना दिलासा
देता यावा, या उदात्त हेतूने श्री. जामदार यांनी हा निर्णय घेतला. वाढदिवसाचा खर्च
वैयक्तिक आनंदासाठी न करता तो गरजू शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपयोगात यावा, या भावनेतून
त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक योगदान दिले.
विशेष
म्हणजे, यावर्षी दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस योगदान
देणारे नानासाहेब जामदार हे बुलढाणा जिल्ह्यातील पहिले नागरिक ठरले आहेत. वयाच्या ८६
व्या वर्षीही समाजाप्रती असलेली संवेदनशीलता आणि शेतकरी बांधवांविषयीची आपुलकी त्यांनी
या कृतीतून व्यक्त केली आहे.
संकटाच्या
काळात गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचा संदेश श्री. जामदार यांच्या या उपक्रमातून
मिळत असून, त्यांचे हे योगदान सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून देणारे ठरले आहे.
००००

Comments
Post a Comment