मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर राहण्याची गरज नाही आवश्यक कागदपत्रे BLO कडे जमा करा
बुलढाणा, दि. २ (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित सूचनांनुसार, जुळवणी न झालेल्या (No
Mapping) अथवा जुळवणीमध्ये तार्किक विसंगती (Logical Discrepancy) आढळलेल्या मतदारांना
प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर राहण्याची आवश्यकता नाही. संबंधित मतदारांनी आवश्यक कागदपत्रे
बीएलओकडे सादर करावीत, असे मुख्य निवडणूक कार्यालय
यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांच्या
घरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) भेट देऊन आवश्यक कागदपत्रे जमा करतील. तसेच,
मतदारांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही आवश्यक कागदपत्रे अथवा पुरावे संबंधित BLO कडे
पाठविता येणार आहेत.
तार्किक विसंगती आढळलेल्या मतदारांच्या
प्रकरणात संबंधित कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर अथवा BLO यांच्या पडताळणी अहवालाच्या
(पंचनामा) आधारे निर्णय घेण्यात येईल. विहित कागदपत्रे उपलब्ध नसल्यास केवळ अपवादात्मक
परिस्थितीतच मतदार नोंदणी अधिकारी अथवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी शक्यतो ऑनलाइन पद्धतीने
सुनावणी घेतील. अशा सुनावणीस संबंधित मतदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणतीही प्रौढ
व्यक्ती उपस्थित राहू शकते.
मतदार नोंदणीसाठी ३, ४, १० आणि ११ ऑक्टोबर
रोजी आयोजित विशेष शिबिरांमध्येही नोटीस प्राप्त मतदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करता
येणार आहेत.
बेघर, कामगार, गरीब, आदिवासी, विशेषतः
PVTG गटातील नागरिक तसेच अनाथ अशा असुरक्षित घटकांतील मतदारांसाठी विशेष शिबिरे व मदत
कक्ष आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणताही पात्र मतदार मतदारयादीतून
वंचित राहू नये, यासाठी सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही
देण्यात आल्या आहेत.
मतदारांशी संपर्क साधणे तसेच आवश्यक
कागदपत्रे जमा करण्यासाठी BLO यांनी राजकीय पक्षांच्या BLO सोबत समन्वय ठेवण्याचे निर्देश
देण्यात आले आहेत. पर्याप्त पुरावे उपलब्ध नसल्यास अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधित
मतदाराला आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची योग्य संधी देण्यात येणार आहे.
तरी, नोटीस प्राप्त सर्व संबंधित मतदारांनी
आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य
करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
0000
Comments
Post a Comment