बुलढाणा जिल्ह्यात पुढील पाच दिवस कोरड्या हवामानाची शक्यता**रब्बी पिकांचे नियोजन करताना सिंचनाच्या उपलब्धतेची खात्री करा; कृषी हवामान केंद्राचा शेतकऱ्यांना सल्ला*

*बुलढाणा जिल्ह्यात पुढील पाच दिवस कोरड्या हवामानाची शक्यता*

*रब्बी पिकांचे नियोजन करताना सिंचनाच्या उपलब्धतेची खात्री करा; कृषी हवामान केंद्राचा शेतकऱ्यांना सल्ला*

**बुलढाणा, दि. १९ (जिमाका) :** भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात पुढील पाच दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत आकाश मुख्यतः निरभ्र ते अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. एल निनो सदृश परिस्थिती आणि कमाल तापमानातील बदल लक्षात घेता, शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन उपलब्ध सिंचन स्रोतांची खात्री करूनच करावे, असा कृषी सल्ला जिल्हा कृषी हवामान केंद्राने दिला आहे.

एल निनो सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चालू महिन्यात मान्सूनोत्तर अथवा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पेरणीचे नियोजन करावे. रब्बी पिकांची पेरणी करताना लवकर परिपक्व होणाऱ्या तसेच पाण्याचा ताण सहन करू शकणाऱ्या वाणांची निवड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ओलीताखालील करडीची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत करता येऊ शकते. पेरणीपूर्वी करडीचे बियाणे रात्रभर पाण्यात भिजवून पेरणी केल्यास बियाण्याची उगवण लवकर व चांगली होण्यास मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य वेळी आणि उपलब्ध ओलाव्याचा विचार करून पेरणी करावी.

पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेता फळझाडांच्या सुकलेल्या, रोगट आणि अतिरिक्त फांद्या काढून टाकाव्यात. यामुळे फळझाडांची पाण्याची गरज कमी होण्यास मदत होऊन उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करता येईल, असा सल्ला देण्यात आला आहे.

केवळ वाळलेला चारा दिल्याने जनावरांच्या सर्व पोषणविषयक गरजा पूर्ण होत नाहीत. त्यामुळे जनावरांचे वय, वजन, दूध उत्पादन आणि शारीरिक अवस्था लक्षात घेऊन त्यांच्या आहाराचे नियोजन करावे. आवश्यकतेनुसार संतुलित पशुखाद्य, खनिज मिश्रण आणि मीठ यांचा आहारात समावेश करावा, असेही कृषी हवामान केंद्राने स्पष्ट केले आहे.

हा कृषी सल्ला ग्रामीण कृषी मौसम सेवा अंतर्गत जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) यांच्या वतीने देण्यात आला आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या