मतदानासाठी पथके मतदान साहित्यांसह रवाना; प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज
• जिल्ह्यात
18 मतदान केंद्र
• 9 हजार
124 मतदार बजावणार मतदानाचा हक्क
बुलढाणा, दि.
22 (जिमाका): महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघांच्या
द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८
ते सायंकाळी ४ या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
जिल्ह्यांत 18 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, 9 हजार 124 मतदार आपला
मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व निर्भय वातावरणात
पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील मतदान केंद्रासाठी
मतदानासाठी लागणारे आवश्यक साहित्य, साधनसामुग्रीचे वितरण मतदान चमूंना आज वितरीत करण्यात
आले असून मतदान पथके मतदानस्थळी रवाना झाली आहेत.
ओळखीसाठी 10 पुरावे ग्राह्य : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य
निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी २१ ऑक्टोबर २०२६ च्या पत्राव्दारे सर्व विभागीय
आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना या १० पर्यायी कागदपत्रांबाबत कळविले आहे. यानूसार शिक्षक
मतदारसंघातील विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणूकीकरीता मतदान करतांना मतदान केंद्रावर
मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची
ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त पुढील १० पर्यायी कागदपत्रे पुरावा
म्हणून ग्राह्य धरण्याबाबत आयोगाने आदेश दिले आहेत.
> यामध्ये (१) आधार कार्ड (२) ड्रायव्हींग लायसन्स,(३) पॅन कार्ड,(४)
भारतीय पासपोर्ट,(५) राज्य / केंद्र सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, स्थानिक
स्वराज्य संस्था किंवा इतर खाजगी औद्योगिक संस्थांद्वारे त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेले
सेवा ओळखपत्र,(६) खासदार / आमदार / विधान परिषद सदस्य यांना दिलेली अधिकृत ओळखपत्रे,
(७) संबंधित शिक्षक / पदवीधर मतदारसंघातील मतदार ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत
आहेत, त्या शैक्षणिक संस्थांनी जारी केलेले सेवा ओळखपत्र, (८) विद्यापीठाद्वारा वितरीत
मुळ पदवी / पदविका प्रमाणपत्र, (९) सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले शारीरिक दिव्यांगत्वाचे
मूळ प्रमाणपत्र, (१०) भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने जारी केलेले
युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र (UDID).
मतदानाच्या दिवशी सुट्टी : निवडणूकीसाठी मतदार असलेल्या शिक्षक मतदारांना
मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष नैमित्तिक रजा जाहीर करण्यात आली आहे. तसेच
निवडणुकीकरीता मतदार असलेल्या खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना ही विशेष
नैमित्तिक रजा लागू होत नाही. त्यामुळे अशा मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी
४ तासांची विशेष सवलत देण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत.
एका मतदान केंद्रावर ५ याप्रमाणे अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात
आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी आणि एक पोलीस
कर्मचारी याप्रमाणे अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया
सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. सर्व मतदान केंद्राच्या
प्रक्रियेचे ‘वेब कास्टींग’ करण्यात येत असून त्याद्वारे कामकाजावर नियंत्रण
ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार यांनी दिली.
0000


Comments
Post a Comment