वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज बुलढाणा जिल्हा ग्रंथोत्सवाचा उत्साहात शुभारंभ; ग्रंथदिंडी, परिसंवाद व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून वाचनाचा जागर

 









 - मान्यवरांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन

 - बोलीभाषा, साहित्य आणि ग्रंथालय चळवळीच्या संवर्धनावर भर

- ग्रंथप्रदर्शन, ग्रंथविक्री, कविसंमेलन व व्याख्यानांची मेजवानी

बुलढाणा, दि. १६ (जिमाका) : वाचन संस्कृतीचा विकास, ग्रंथालय चळवळीचे संवर्धन आणि समाजात पुस्तकांविषयी आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय बुलढाणा जिल्हा ग्रंथोत्सवाचा आज गर्दे वाचनालयाच्या सभागृहात उत्साहात शुभारंभ झाला. ग्रंथपूजन, ग्रंथदिंडी आणि मान्यवरांच्या मार्गदर्शनातून यावेळी वाचन संस्कृतीचा जागर करण्यात आला.

उद्घाटनप्रसंगी मुख्याधिकारी गणेश पांडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. अतुल वानखडे, सहायक माहिती अधिकारी सतिश बगमारे, गोविंद गायकी, संजय बनसोड, रमेश इंगळे यांच्यासह ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. अतुल वानखडे यांनी प्रास्ताविकातून वाचन संस्कृतीचे महत्त्व विशद करत ग्रंथालय चळवळीच्या संवर्धनाची आवश्यकता अधोरेखित केली. संजय बनसोड यांनी पुस्तक वाचनातून मिळणारा आनंद आणि वैचारिक समृद्धी यांचे महत्त्व सांगितले. श्री. घुगे यांनी ग्रंथोत्सवाचे रूपांतर लोकचळवळीत व्हावे आणि वाचनाचा संदेश समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. गोविंद गायकी यांनी बोलीभाषेच्या संवर्धनातून भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे जतन करण्याचे आवाहन केले.

रमेश इंगळे यांनी वाचनामुळे विवेक, संस्कार आणि संवेदनशीलता विकसित होत असल्याचे नमूद केले. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे पुस्तक वाचन, मनन आणि चिंतनासाठी मिळणारा वेळ कमी होत असल्याची खंत व्यक्त करत समाजाने पुन्हा पुस्तकांकडे वळण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. वाचन संस्कृतीचे संवर्धन ही शासनासोबतच समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

ग्रंथदिंडीतून वाचन संस्कृतीचा जागर

ग्रंथोत्सवाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले. त्यानंतर शहरातील हुतात्मा स्मारकापासून गर्दे वाचनालयापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. या दिंडीत महिला, शालेय विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. कीर्तन आणि पारंपरिक फुगडीच्या सादरीकरणामुळे ग्रंथदिंडीला सांस्कृतिक रंगत आली.

ग्रंथप्रदर्शन, कविसंमेलन आणि परिसंवादाची मेजवानी

दि. १६ व १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजित या ग्रंथोत्सवात वाचन संस्कृतीच्या प्रचार-प्रसारासाठी ग्रंथप्रदर्शन, ग्रंथविक्री, व्याख्याने, कविसंमेलन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता अकोट येथील हर्षदा इंदाने यांचा ‘मी जिजाऊ बोलतो’ हा एकपात्री प्रयोग सादर होणार आहे. सकाळी ११.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रा. कमलेश खिल्लारे यांच्या अध्यक्षतेखाली ‘मराठी, लोक व ज्ञानभाषा व्हावी’ या विषयावर परिसंवाद होईल. यामध्ये डॉ. प्रदीप बारळ, विनायक वरणगावकर, मधुकर वडोदे, किरण डोंगरदिवे आणि महेंद्र बोर्डे सहभागी होणार आहेत.

दुपारी ३ ते ४.३० या वेळेत रमेश आराख यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन व गझल कार्यक्रम होणार असून, त्यात गोविंद रहाटे, सुरेश इंगळे, वैशाली तायडे आणि विशाल खोंदले सहभागी होतील. त्यानंतर ग्रंथोत्सवाचा समारोप होणार आहे.

या ग्रंथोत्सवाचा नागरिकांनी, वाचनप्रेमींनी आणि साहित्यप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रंथोत्सव जिल्हा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या