‘सेवा संकल्प अभियान’; आज जिल्हास्तरीय संदर्भीय आरोग्य शिबिर

 


बुलढाणा, दि. ५ (जिमाका) : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील बालक व विद्यार्थ्यांसाठी आज, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हास्तरीय संदर्भीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात दंतरोग, कान-नाक-घसा, मानसिक आरोग्य तसेच विविध आजारांबाबत तपासणी, उपचार आणि आवश्यकतेनुसार संदर्भीय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत तपासणीदरम्यान उपचारासाठी संदर्भित करण्यात आलेल्या बालक व विद्यार्थ्यांना संबंधित आरोग्य यंत्रणेमार्फत जिल्हास्तरीय शिबिरासाठी पाठविण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले यांनी सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

बालकांना शिबिरासाठी आणताना योग्य नियोजन करावे. तसेच संबंधित बालक व विद्यार्थ्यांच्या उपचारात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उपचारासाठी पात्र बालकांना संबंधित विभागामार्फत जिल्हा रुग्णालयातील डी.ई.आय.सी. विभागाकडे पाठविण्याबाबतही सूचित करण्यात आले आहे. तपासणीपासून उपचारापर्यंत आरोग्य सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देत ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वी करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या