सेवासंकल्प अभियान व जल जीवन मिशन 2.0 अंतर्गत विद्यार्थ्यांची पाणी तपासणी प्रयोगशाळेला भेट
बुलढाणा,
दि. ८ (जिमाका) : सेवासंकल्प अभियान अंतर्गत जल जीवन मिशन
2.0 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र, राज्य आणि जिल्हास्तरावर सूक्ष्म नियोजन करण्यात
येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा, बुलढाणा येथील
विद्यार्थिनींना जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेला भेट देऊन पाणी गुणवत्ता व पाणी संवर्धनाबाबत
मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा परिषद बुलढाणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव
खरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक सतीश देशमुख आणि
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिनकर घुगे यांच्या नियंत्रणाखाली हा
उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे शरद ठाकूर
व किरण शेजुळे यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व, पाणी गुणवत्ता तपासणीची आवश्यकता
तसेच शुद्ध पाण्याचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाणी नमुने तपासणीची प्रक्रिया दाखविण्यात आली. प्रयोगशाळेत
पाण्याची गुणवत्ता कशा पद्धतीने तपासली जाते, याची माहिती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष
अनुभवातून घेतली.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी पाणी तपासणी प्रक्रियेविषयी
विविध प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. पाण्याचा योग्य वापर, पाणी बचत आणि पाणी
स्रोतांचे संरक्षण याबाबतही विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा
प्रयोगशाळेतील अधिकारी, कर्मचारी, रसायनतज्ज्ञ, अनुजैविक तज्ज्ञ तसेच शाळेचे वर्गशिक्षक
उपस्थित होते. सदर शैक्षणिक भेटीसाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे एम. पी.
सोनुने यांनी सहकार्य केले.
0000

Comments
Post a Comment