बुलढाणा जिल्ह्यात ६ लाख ५३ हजार बालकांना मिळणार जंतनाशक गोळ्या २७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम; पालकांनी सहभागी व्हावे - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले
बुलढाणा, दि. २३ (जिमाका) : बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांची शारीरिक
व बौद्धिक वाढ योग्य प्रकारे व्हावी आणि कृमी संसर्गाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी
बुलढाणा जिल्ह्यात २७ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम राबविण्यात येणार
आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील सुमारे ६ लाख ५३ हजार १२५
बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जंतांच्या
संसर्गामुळे बालकांमध्ये रक्तक्षय, अशक्तपणा, कुपोषण तसेच शारीरिक व बौद्धिक विकासावर
प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बालकांना जंतमुक्त ठेवण्यासाठी या मोहिमेचे महत्त्व
असून, पालकांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या पात्र पाल्यांना जंतनाशक औषधाचा लाभ मिळेल,
याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले व जिल्हा माता-बाल
संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव यांनी केले आहे.
या
मोहिमेंतर्गत शासकीय व अनुदानित शाळा, खासगी शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये तसेच ग्रामीण
व शहरी भागातील अंगणवाडी आणि मिनी अंगणवाडी केंद्रांमधून पात्र बालकांना जंतनाशक गोळ्यांचे
वितरण करण्यात येणार आहे. आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभाग यांच्या
समन्वयातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
जंतनाशक
औषधोपचारामुळे बालकांचे आरोग्य, पोषणस्थिती आणि सर्वांगीण विकास सुधारण्यास मदत होते.
निरोगी बालकांच्या माध्यमातून सुदृढ भविष्य घडविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या
या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व पात्र बालकांना औषधाचा लाभ मिळावा, यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत
आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.
पालकांनी
राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेबाबत जागरूक राहून शाळा व अंगणवाडी केंद्रांशी समन्वय
साधावा आणि आपल्या पात्र पाल्यांना निर्धारित दिवशी जंतनाशक गोळी मिळेल, याची खात्री
करावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment