मतदार यादीत नाव नोंदणी, दुरुस्तीसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत**नवमतदारांसाठी आज, ११ ऑक्टोबरला विशेष शिबिरे; पात्र नागरिकांनी संधीचा लाभ घेण्याचे आवाहन*
*मतदार यादीत नाव नोंदणी, दुरुस्तीसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत*
*नवमतदारांसाठी आज, ११ ऑक्टोबरला विशेष शिबिरे; पात्र नागरिकांनी संधीचा लाभ घेण्याचे आवाहन*
**बुलढाणा, दि. १० (जिमाका) :** मतदार यादीतील नावांची नोंदणी, वगळणी तसेच नोंदींमधील दुरुस्ती करण्यासाठी १२ ऑक्टोबर २०२६ ही अंतिम मुदत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची आणि आवश्यक दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
*नाव नोंदणीसाठी ७ लाखांहून अधिक अर्ज*
राज्यात ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ८ ऑक्टोबरपर्यंत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना-६ अंतर्गत ७ लाख १९ हजार ३८२ अर्ज प्राप्त झाले आहेत. मतदार यादीतील नोंदींमध्ये दुरुस्तीसाठी नमुना-८ अंतर्गत ३ लाख ९९ हजार ९२५ अर्ज, तर नाव वगळण्यासाठी नमुना-७ अंतर्गत १८ हजार ७४८ अर्ज प्राप्त झाले आहेत.
*नवमतदारांसाठी विशेष शिबिरांची सुविधा*
दि. १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकास किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे नवमतदार तसेच अन्य पात्र नागरिक मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी अर्ज करू शकतात. विशेषतः स्थलांतरामुळे किंवा अन्य कारणांमुळे प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा.
नाव नोंदणीसाठी नमुना-६ भरून आवश्यक घोषणापत्र व कागदपत्रांसह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे अर्ज सादर करता येईल. तसेच ११ ऑक्टोबर रोजी आयोजित विशेष शिबिरांमध्येही अर्ज स्वीकारले जातील. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या [https://voters.eci.gov.in/](https://voters.eci.gov.in/) या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल.
*‘No Mapping’ आणि तार्किक विसंगती असलेल्या मतदारांनाही संधी*
प्रारूप मतदार यादीतील ज्या मतदारांना मागील विशेष सखोल पुनरीक्षणातील नोंदींशी जुळवणी न झाल्यामुळे ‘No Mapping’ किंवा जुळवणीमध्ये तार्किक विसंगती (Logical Discrepancy) आढळल्यामुळे नोटीस प्राप्त झाली आहे, अशा मतदारांना संबंधित मतदान केंद्रांवर आवश्यक कागदपत्रे सादर करता येतील.
निवडणूक आयोगाने विहित केलेल्या १३ कागदपत्रांव्यतिरिक्त इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ‘Any other Documents’ ही सुविधाही BLO App वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
*अंतिम मतदार यादीत नाव सुनिश्चित करण्याचे आवाहन*
मतदार यादीतील नावांची नोंदणी, दुरुस्ती आणि आवश्यक बदलांसाठी १२ ऑक्टोबर २०२६ ही अंतिम मुदत लक्षात घेऊन पात्र नागरिकांनी वेळेत अर्ज सादर करावेत. नवमतदारांसह प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा आणि अंतिम मतदार यादीत आपले नाव समाविष्ट असल्याची खात्री करावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment