अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी पहिली प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न**मतदान प्रक्रियेतील अचूकता, पारदर्शकता आणि नियमपालनावर भर; अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन*
*अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी पहिली प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न*
*मतदान प्रक्रियेतील अचूकता, पारदर्शकता आणि नियमपालनावर भर; अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन*
*बुलढाणा, दि. ९ (जिमाका) :* विधानपरिषदेच्या द्विवार्षिक अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी पहिली प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत मतदान प्रक्रियेचे विविध टप्पे, पसंतीक्रम मतदान पद्धती, मतपत्रिका व मतपेट्यांचे व्यवस्थापन तसेच निवडणूक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षण कार्यशाळेला अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, राजेंद्र पोळ, डॉ. जयश्री ठाकरे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, तहसीलदार विठ्ठल कुमरे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि निवडणूक कामकाजाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करणे व तिचे पुनरीक्षण, पात्र मतदारांची नोंदणी, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार कार्यवाही करण्याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. निवडणुकीशी संबंधित सर्व कामे विहित वेळेत, अचूकतेने आणि जबाबदारीने पूर्ण करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी दिले. निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर नियमांचे काटेकोर पालन करून पारदर्शकता राखण्याचे आवाहनही त्यांनी केले.
*पसंतीक्रम मतदान पद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन*
उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या पसंतीक्रम मतदान पद्धतीची माहिती दिली. या पद्धतीत मतदाराने उमेदवारांच्या नावासमोर १, २, ३ अशा अंकांद्वारे पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक असते. मतदान करताना विहित पद्धतीचा अवलंब करणे, मतपत्रिकेवर चुकीच्या खुणा होणार नाहीत याची दक्षता घेणे आणि मतदारांना योग्य मार्गदर्शन करणे, या बाबींचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. तसेच निवडणूक संदर्भातील कायदे, अधिनियमाची सविस्तर माहीती देऊन निवडणूक कामकाज पार पाडावे, असे सांगितले.
*मतपेट्या व मतपत्रिकांच्या व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक*
ही निवडणूक मतपत्रिका व मतपेट्यांद्वारे होत असल्याने मतपेट्यांचे सीलिंग, मतपत्रिकांची सुरक्षित हाताळणी, मतदान केंद्रावरील आवश्यक नोंदवही आणि इतर अभिलेखांचे अचूक व्यवस्थापन याबाबत तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. मतदान प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रत्येक बाबीची काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.
*आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना*
प्रशिक्षणादरम्यान निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मतदान केंद्रावर कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, असे निर्देश देण्यात आले.
निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वय राखून काम करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले.
0000
Comments
Post a Comment