आगामी खरीप हंगामासाठी घरगुती सोयाबीन बियाणे जतन करा: जिल्हा कृषी विभागाचे आवाहन
बुलढाणा, दि. 16 (जिमाका) : चालू वर्षी एल निनोच्या (El Niño) प्रभावामुळे
पर्जन्यमानात घट झाली असून, त्याचा मोठा फटका खरीप हंगामातील प्रमुख पिकांच्या उत्पादनाला
बसला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख खरीप पीक असलेल्या सोयाबीनच्या उत्पादनात घट
झाल्याने आगामी वर्षात सोयाबीन बियाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर,
शेतकऱ्यांनी पुढील खरीप हंगामासाठी (२०२६-२७) आतापासूनच दर्जेदार घरगुती बियाणे वापरण्याचे
नियोजन करावे, असे आवाहन बुलढाणा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले
आहे.
कृषी विभागाने
"घरगुती सोयाबीन बियाणे जतन व साठवणूक मोहीम" सुरू केली असून, याबाबत शेतकऱ्यांमध्ये
व्यापक प्रबोधन केले जात आहे. कृषी अधिकारी
संतोष डाबरे व कृषी उपसंचालक अनुराधा गावडे यांनी शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने
बियाणे जतन करण्यासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शन केले आहे:
>
• बियाण्याची उगवण क्षमता टिकून राहण्यासाठी
मळणी यंत्राचा आरपीएम (RPM) ३५० ते ४०० पेक्षा कमी ठेवावा.
>
• वेगवेगळ्या वाणांचे बियाणे मळणी करताना
एकमेकांत मिसळणार नाही याची दक्षता घ्यावी. मळणी यंत्रातील आधीच्या पिकांचे अवशेष पूर्णपणे
स्वच्छ करूनच मळणी करावी.
>
• सोयाबीन बियाणे उगवणीसाठी अत्यंत संवेदनशील
असते. त्यामुळे वाहतूक व हाताळणी करताना आदळापट होणार नाही याची काळजी घ्यावी.
>
• बियाणे साठवताना पोत्यांची खूप मोठी
थप्पी लावू नये.
ज्या शेतकऱ्यांकडे
सुरक्षित ओलितातील आणि चांगल्या दर्जाचे सोयाबीन उत्पादन झाले आहे, त्यांनी स्वतःसाठी
आवश्यक तेवढे बियाणे राखून ठेवावे. तसेच उर्वरित बियाणे परिसरातील इतर शेतकरी बांधवांना
रास्त व वाजवी दरात उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून गावातच चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध
होईल आणि शेतकरी बियाण्याबाबत स्वयंपूर्ण होतील.
00000

Comments
Post a Comment