आयोडीनयुक्त मिठाचा वापर करा; गलगंडासह आयोडीन न्यूनतेचे विकार टाळा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले यांचे नागरिकांना आवाहन
बुलढाणा, दि. २२
(जिमाका) : आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे गलगंड, थायरॉईडचे विकार तसेच बालकांच्या
शारीरिक व मानसिक विकासावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी दैनंदिन आहारात
नियमितपणे आयोडीनयुक्त मिठाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित
मंडाले यांनी केले आहे.
जागतिक आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिनानिमित्त आयोडीनचे महत्त्व
आणि त्याच्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांबाबत जनजागृती करण्यात येत
आहे. आयोडीन हे शरीराची योग्य वाढ होण्यासाठी तसेच थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुरळीत राहण्यासाठी
आवश्यक असलेले सूक्ष्म पोषक तत्त्व आहे. शरीरात आयोडीनची कमतरता निर्माण झाल्यास गलगंडासह
थायरॉईडचे विविध विकार उद्भवू शकतात. विशेषतः गर्भवती माता, स्तनदा माता आणि लहान मुलांसाठी
आयोडीनचे योग्य प्रमाण अत्यंत महत्त्वाचे आहे. आयोडीनच्या कमतरतेमुळे बालकांच्या शारीरिक
आणि मानसिक विकासावरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.
आयोडीन न्यूनता विकार टाळण्यासाठी नागरिकांनी आयोडीनयुक्त मिठाचा
वापर करावा. मीठ खरेदी करताना त्यावरील लेबल तपासून ते आयोडीनयुक्त असल्याची खात्री
करावी. मिठाची साठवण हवाबंद डब्यात आणि कोरड्या ठिकाणी करावी. त्याचबरोबर मिठाचे सेवन
मर्यादित ठेवून संतुलित व सकस आहाराचा अवलंब करावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले
आहे.
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे आणि
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आयोडीनच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
नागरिकांनी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनानुसार योग्य आहारविषयक सवयी अंगीकारून आयोडीन
न्यूनता विकारांचे प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य
विभागाकडून करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment