इच्छुक दाम्पत्यांनी बालकांच्या संगोपनासाठी दत्तक प्रक्रियेत सहभागी व्हावे दत्तक प्रक्रियेबाबत जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे आवाहन; मिशन वात्सल्य पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा

 


 

बुलढाणा, दि. १२ (जिमाका) : अनाथ, निराधार आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना प्रेमळ कौटुंबिक वातावरण, सुरक्षितता आणि उज्ज्वल भविष्य मिळवून देण्यासाठी दत्तक विधान प्रक्रिया राबविण्यात येते. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५, सुधारित अधिनियम २०२१ आणि दत्तक नियमावली २०२२ नुसार ही प्रक्रिया पार पाडली जाते. इच्छुक पात्र दाम्पत्यांनी दत्तक प्रक्रियेत सहभागी होऊन बालकांना कुटुंबाचा आधार द्यावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, बुलढाणा यांनी केले आहे.

 

दत्तक घेण्यासाठी पात्रता व वयोमर्यादा : दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या भावी माता-पित्यांची शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिक क्षमता सक्षम असणे आवश्यक आहे. दत्तक प्रक्रियेसाठी पती-पत्नी दोघांची संमती आवश्यक असून, एकल महिला मुलगा किंवा मुलगी दत्तक घेऊ शकते, तर एकल पुरुष केवळ मुलगा दत्तक घेऊ शकतो.

 

बालकाच्या वयानुसार दत्तक घेणाऱ्या भावी माता-पित्यांच्या कमाल संयुक्त वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे :

•          दोन वर्षांपेक्षा कमी वयाचे बालक : संयुक्त वयोमर्यादा ८५ वर्षे; एकल पालकाची कमाल वयोमर्यादा ४० वर्षे.

•          दोन ते चार वर्षांपर्यंतचे बालक : संयुक्त वयोमर्यादा ९० वर्षे; एकल पालकाची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे.

•          चार ते आठ वर्षांपर्यंतचे बालक : संयुक्त वयोमर्यादा १०० वर्षे; एकल पालकाची कमाल वयोमर्यादा ५० वर्षे.

•          आठ ते अठरा वर्षांपर्यंतचे बालक : संयुक्त वयोमर्यादा ११० वर्षे; एकल पालकाची कमाल वयोमर्यादा ५५ वर्षे.

 

ऑनलाइन अर्जाची सुविधा : दत्तक विधान प्रक्रियेद्वारे बालक दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या भावी माता-पित्यांनी मिशन वात्सल्यच्या https://missionvatsalya.wcd.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. दत्तक प्रक्रियेबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सुवर्णनगर, मुंडे ले-आऊट, बसस्थानकामागे, डॉ. जोशी हॉस्पिटलशेजारी, बुलढाणा येथे संपर्क साधता येईल. तसेच खामगाव रोडवरील सुंदरखेड येथील यशोधाम, दि लव्ह ट्रस्ट या विशेष दत्तक संस्थेकडूनही माहिती घेता येईल.

 

दत्तक प्रक्रियेतील पुढील टप्पे : ऑनलाइन अर्ज केल्यानंतर अर्जदारांनी जवळची मान्यताप्राप्त विशेष दत्तक संस्था निवडावी. संबंधित संस्थेमार्फत अर्जदारांच्या घरी भेट देऊन गृहअभ्यास अहवाल तयार केला जातो. अर्ज केल्यानंतर ६० दिवसांच्या आत हा अहवाल तयार करणे बंधनकारक असून, तो तीन वर्षांसाठी वैध राहतो.

 

गृहअभ्यास अहवाल संबंधित पोर्टलवर अपलोड झाल्यानंतर नियमानुसार प्रतीक्षा व संदर्भ प्रक्रियेद्वारे बालक दाखविण्याची प्रक्रिया सुरू होते. बालकाचे छायाचित्र, वैद्यकीय अहवाल आणि बालक अभ्यास अहवाल यांची माहिती उपलब्ध करून दिली जाते. बालक पसंत पडल्यास नियमानुसार ४८ तासांच्या आत आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

 

यानंतर दत्तक विधान समितीमार्फत भावी माता-पित्यांची मुलाखत व मूल्यमापन केले जाते. बालकाच्या हिताच्या दृष्टीने भावी माता-पिता योग्य असल्याचे आढळल्यास बालक तात्पुरत्या स्वरूपात प्री-अॅरडॉप्टिव्ह फॉस्टर केअर अंतर्गत त्यांच्या ताब्यात दिले जाते. पुढे संस्थेमार्फत बालक व पालकांची कागदपत्रे तयार करून जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून पडताळणी केली जाते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हा दंडाधिकारी, बुलढाणा यांच्यामार्फत दत्तक आदेश दिला जातो.

 

दत्तक प्रक्रिया ही बालकाच्या सर्वोत्तम हिताला प्राधान्य देणारी कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळे इच्छुकांनी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून जिल्हा बाल संरक्षण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या