कोराडी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्याचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा सिंचनासाठी पाणी उपलब्धतेची चाचपणी; पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाबाबत लवकरच निर्णय

 


बुलढाणा, दि. 10 (जिमाका) : यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेतीसाठी सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्यासह पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी मेहकर तालुक्यातील कोराडी मध्यम प्रकल्पाला भेट देऊन पाणीसाठा व पाणीवापराच्या नियोजनाचा आढावा घेतला. उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देता येईल का, तसेच पिण्याच्या पाण्याचे आरक्षण कसे निश्चित करता येईल, याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

 

कोराडी मध्यम प्रकल्प परिसराची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासह सिंचनासाठी पाणी उपलब्धतेची व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश दिले. या संदर्भात लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 

पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधून पाणीटंचाईच्या परिस्थितीची माहिती घेतली. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतीला पाण्याची आवश्यकता असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी केली. उपलब्ध पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याची गरज आणि शेतीसाठीची पाण्याची मागणी यांचा समतोल राखून नियोजन करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

 

या पाहणीवेळी मेहकर नगरपालिकेचे नगराध्यक्ष किशोर गारोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी रामराजे कापरे, उपाध्यक्ष अलीम ताहेर, पाटबंधारे उपविभाग, मेहकरचे उपविभागीय अभियंता दुष्यंत देवरे, सहायक अभियंता सु. चे. गावित, कनिष्ठ अभियंता अपेक्षा खैरकर, कालवा निरीक्षक सतीश वाटसर व कर्मचारी राहुल बळी उपस्थित होते.

 

कृषी व महसूल विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी किशोर काळे, सहायक कृषी अधिकारी प्रफुल्ल जाधव, नायब तहसीलदार नालट व बोरकर, मंडळ अधिकारी राजू आव्हाळे आणि ग्राम महसूल अधिकारी व्ही. टी. कुलाल उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत प्रशासक किशोर गाभणे व ग्रामसेवक कैलास वानखेडे यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या