बुलढाणा जिल्ह्यात खत वितरणासाठी पथदर्शी प्रकल्प सुरू; मोबाईल ॲपद्वारे खत नोंदणी व खरेदीची सुविधा उपलब्ध!
बुलढाणा, दि. 15 (जिमाका) : शेतकऱ्यांना
सुलभ, पारदर्शक आणि वेळेची बचत करणारी यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदच्या
कृषी विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. खत विक्री आराखड्यानुसार आता मोबाईल
ॲपद्वारे खत नोंदणी व खरेदी करण्याची अभिनव सुविधा जिल्ह्यात सुरू करण्यात येत आहे.
'फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल' (FFS) या महत्त्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी
बुलढाणा जिल्ह्याची निवड करण्यात आली असून, प्रशासनाकडून या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीचे
निर्देश जिल्हाधिकारी प्रविणकुमार देवरे यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त
शेतकऱ्यांपर्यंत या प्रणालीची माहिती पोहोचावी आणि शेतीसाठी लागणाऱ्या खतांचे समन्यायी
व पारदर्शक वाटप व्हावे, यासाठी गावपातळीपर्यंत व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन प्रशासनाकडून
करण्यात आले आहे.
'फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर
सेल' (FFS) प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये: या प्रणालीमध्ये शेतकऱ्यांचा 'फार्मर आयडी'
(Farmer ID) आणि खत वितरणाच्या 'iFMS' प्रणालीचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. गुगल प्ले
स्टोअरवर उपलब्ध असलेल्या 'Framework For Fertilizer Sale' या ॲपद्वारे शेतकरी आपल्या
पसंतीच्या खताचे घरबसल्या बुकिंग करू शकतात. यामुळे दुकानात खत उपलब्ध आहे की नाही
हे समजेल आणि रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचेल.
ॲपद्वारे
खत बुक केल्यानंतर एक क्यु-आर कोड (QR Code) निर्माण होतो. हा साठा संबंधित कृषी सेवा
केंद्रावर तीन दिवस शेतकऱ्यांच्या नावे राखीव राहतो. शेतकरी आपल्या सवडीनुसार जाऊन
हा कोड स्कॅन करून खताची उचल करू शकतात. खरेदी केलेल्या प्रत्येक अनुदानित खताच्या
गोणीची नोंद या प्रणालीत राहणार असल्याने खतांचे समन्यायी वाटप होईल व गैरवापरास आळा
बसेल.
मोबाईल ॲपद्वारे खत खरेदी
कशी करावी? (कार्यपद्धती): ॲप उघडून राज्य निवडा आणि 'फार्मर आयडी' (Farmer ID) किंवा
आधार क्रमांक प्रविष्ट करून ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करा. स्वतःची, भाडेकरू किंवा
संयुक्त मालकीची जमीन निवडून जिल्हा, तालुका, गाव व गट क्रमांक भरा आणि 'Fetch
Land' वर क्लिक करून माहिती मिळवा.
हंगाम व पिकाची निवड केल्यावर
शासनाच्या शिफारसीनुसार आवश्यक खतांची यादी व प्रमाण दिसेल. त्यानंतर लागणाऱ्या बॅगांची
संख्या निश्चित करा. जवळील उपलब्ध साठा व अंतर पाहून योग्य विक्रेता निवडा. खत स्वतः
किंवा प्रतिनिधीमार्फत (माहिती भरून) घेण्याचा पर्याय निवडा. अर्ज यशस्वी झाल्यानंतर
QR कोड व टोकन नंबर तयार होईल. हा कोड संबंधित विक्रेत्याकडे दाखवून पावती व खत प्राप्त
करा.
ॲपमध्ये आधार क्रमांकाने
लॉगिन करता येत असले तरी, भविष्यात तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला 'फार्मर
आयडी' (Farmer ID) लवकरात लवकर तयार करून घ्यावा. तसेच जमिनीची माहिती अद्ययावत ठेवावी.
खत खरेदी किंवा ॲपने संदर्भात कोणतीही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी तालुकास्तरावर तालुका
कृषी अधिकारी, गुणनियंत्रण कृषी अधिकारी, तसेच गावपातळीवर सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी
मित्र किंवा कृषी सखी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
000000
Comments
Post a Comment