दिवाळीनिमित्त मलकापूर रेल्वे डाक सेवेतर्फे पार्सल बुकिंगची विशेष सुविधा रात्री १० वाजेपर्यंत काउंटर सुरू; स्पीड पोस्ट, पार्सल व आंतरराष्ट्रीय बुकिंगची सुविधा

 


बुलढाणा, दि. १६ (जिमाका): दिवाळी सणानिमित्त नागरिकांना भेटवस्तू, फराळ आणि इतर पार्सल वेळेत पाठविता यावेत, यासाठी रेल्वे डाक सेवा, नागपूर विभागांतर्गत मलकापूर सॉर्टिंग काउंटरवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे मलकापूर व परिसरातील नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पार्सल पाठविणे अधिक सोयीचे होणार आहे.

दिवाळीच्या काळात आपल्या प्रियजनांना भेटवस्तू, मिठाई, फराळ आणि इतर वस्तू पाठविण्याचे प्रमाण वाढते. विशेषतः परदेशात राहणाऱ्या कुटुंबीयांना व मित्रपरिवाराला दिवाळीच्या शुभेच्छांसह भेटवस्तू पाठविण्यासाठी टपाल विभागाची सेवा उपयुक्त ठरणार आहे. ही बाब लक्षात घेऊन मलकापूर सॉर्टिंग काउंटरवर बुकिंगची सुविधा रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे.

या काउंटरवर स्पीड पोस्ट बुकिंग, पार्सल बुकिंग तसेच आंतरराष्ट्रीय टपाल बुकिंगअंतर्गत पत्रे, पार्सल आणि ईएमएस (एक्स्प्रेस मेल सेवा) या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार विविध टपाल सेवा एकाच ठिकाणी मिळू शकतील.

रेल्वे डाक सेवा, नागपूरचे अधीक्षक गणेश बा. आंबोरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, दिवाळीच्या भेटवस्तू आणि फराळ पाठविण्यापूर्वी वस्तू व्यवस्थित पॅक करून सुरक्षितरीत्या बंद कराव्यात. तसेच संबंधित देशातील आयात नियम, सीमाशुल्कविषयक अटी आणि टपाल विभागाच्या नियमांची माहिती घेऊनच पार्सल बुक करावे. विविध देशांमध्ये वस्तू पाठविण्याबाबतचे नियम वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे बुकिंगपूर्वी काउंटरवर आवश्यक माहिती घेणे गरजेचे आहे.

दिवाळी हा आनंद, जवळीक आणि एकमेकांशी प्रेमाचे बंध दृढ करण्याचा सण आहे. या सणानिमित्त देश-विदेशात राहणाऱ्या नातेवाइकांपर्यंत भेटवस्तू आणि पारंपरिक फराळ पोहोचविण्यासाठी टपाल विभागाची सेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नागरिकांनी या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे डाक सेवा, मलकापूर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या