सेवा संकल्प अभियानांतर्गत देऊळगाव मही येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व लसीकरण वैयक्तिक स्वच्छता, संतुलित आहार आणि आरोग्यदायी सवयींबाबत जनजागृती
बुलढाणा,
दि. 10 (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर, देऊळगाव मही
यांच्या वतीने सहकार विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी व लसीकरण
शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रंजित मंडाले, तालुका आरोग्य
अधिकारी डॉ. महेंद्रकुमार साळवे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवानंद शिंगाडे यांच्या
मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
शिबिरात पाच ते पंधरा वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना नियोजित
लसीकरण कार्यक्रमानुसार डीपीटी (DPT) व टीडी (Td) लसी देण्यात आल्या. तसेच आरोग्य सेविकांमार्फत
लहान बालकांचे नियमित लसीकरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांना आरोग्य व स्वच्छतेचे मार्गदर्शन
समुदाय आरोग्य अधिकारी शिल्पा बंगाळे यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य
तपासणी केली. यामध्ये विद्यार्थ्यांचे वजन, उंची आणि दातांच्या आरोग्याची तपासणी करण्यात
आली. यासोबतच विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
जेवणापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर साबणाने हात धुणे, नखे
स्वच्छ व लहान ठेवणे, दातांची नियमित स्वच्छता करणे, संतुलित आहार घेणे आणि स्वच्छ
पिण्याचे पाणी वापरणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. दैनंदिन जीवनात
आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
आरोग्य पथकाचा सक्रिय सहभाग
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य सेविका, आरोग्य सेवक आणि आशा
सेविकांनी सक्रिय सहभाग घेतला. आरोग्य सेविकांनी बालकांचे नियमित लसीकरण केले, तर आरोग्य
सेवकांनी पिण्याच्या पाण्याची तपासणी व इतर आरोग्यविषयक कामांमध्ये सहकार्य केले. आशा
सेविकांनी विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयींबाबत जनजागृती
केली.
सहकार विद्या मंदिरचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी कार्यक्रमाच्या
नियोजनासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी सहकार्य केले. विद्यार्थ्यांचे आरोग्य
संवर्धन, बालकांचे नियमित लसीकरण आणि स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने
आयोजित हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

Comments
Post a Comment