ओबीसी, ईबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावेत

 


बुलढाणा, दि. 23 (जिमाका) : सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी इतर मागासवर्गीय (ओबीसी), आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी) तसेच विशेष मागास प्रवर्गातील (एसबीसी) विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांचा लाभ पात्र विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर (NSP) विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.

प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत इयत्ता नववी व दहावीतील ओबीसी, ईबीसी व डीएनटी प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाची योजना राबविण्यात येत आहे. तसेच उत्पन्न मर्यादेनुसार पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येणार आहे. याशिवाय इयत्ता पाचवी ते आठवीतील मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, जिल्हा परिषद माध्यमिक शाळांमधील व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती, मुंबईतील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष गुणवत्ता शिष्यवृत्ती, तसेच व्हीजेएनटी, एसबीसी व बीपीएल विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीच्या योजनांचा समावेश आहे.

पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत इयत्ता दहावीनंतर शिक्षण घेणाऱ्या ओबीसी, एसबीसी आणि व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीच्या विविध योजनांचा लाभ मिळू शकतो.

या योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया केवळ राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवरून ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना योजनांची माहिती द्यावी, तसेच अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन करावे. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाविद्यालयांनी नोटीस बोर्डवर माहिती प्रसिद्ध करावी आणि समाजमाध्यमांचा वापर करून जनजागृती करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर (NSP) दि. ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावा. त्रुटी असलेल्या अर्जांच्या पडताळणीची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०२६ तर संस्था स्तरावरील पडताळणीची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०२६ आहे. तसेच जिल्हा/राज्यस्तरीय पडताळणीची अंतिम तारीख : ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलचा संकेतस्थळाचा  https://scholarships.gov.in वापर करावा.

जिल्ह्यातील संबंधित शाळा व महाविद्यालयांतील पात्र विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्ज करताना कोणतीही त्रुटी राहू नये, याची दक्षता घ्यावी. विहित मुदतीनंतर अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध होईलच असे नाही, त्यामुळे सर्व पात्र विद्यार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, बुलढाणा यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या