‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत पिंपळगाव सराई येथे आरोग्य तपासणी व जनजागृती; ‘तिशीचा पल्ला-तपासणी व सल्ला’ उपक्रमातून ३० वर्षांवरील नागरिकांची NCD तपासणी

 



बुलढाणा, दि. ५ (जिमाका) : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध आरोग्यविषयक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्याअंतर्गत ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर, पिंपळगाव सराई येथे दि. 3 ऑक्टोंबर रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासोबतच विविध आरोग्यविषयक बाबींवर मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले.

‘तिशीचा पल्ला – तपासणी व सल्ला’ या उपक्रमांतर्गत ३० वर्षांवरील नागरिकांची असंसर्गजन्य आजारांची (NCD) तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब, रक्तशर्करा तसेच कर्करोगासंदर्भातील प्राथमिक तपासणी करण्यात आली. नियमित आरोग्य तपासणी, योग्य आहार, व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगण्यात आले.

सेवा संकल्प अभियानांतर्गत महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. महिला आरोग्य, मासिक पाळीतील स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता तसेच आवश्यक आरोग्यविषयक बाबींवर महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्याच्या समस्या लपवून न ठेवता योग्य वेळी वैद्यकीय सल्ला व उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले.

शिबिरादरम्यान संतुलित व पोषक आहाराचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. लोहयुक्त आहाराचा नियमित आहारात समावेश करणे, ॲनिमिया टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे तसेच निरोगी जीवनशैलीसाठी योग्य आहार घेण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

हृदयविकार प्रतिबंधासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि वजन नियंत्रणाचे महत्त्वही पटवून देण्यात आले. तंबाखू व धूम्रपानापासून दूर राहण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. रक्तदाब व रक्तशर्करा नियंत्रणात ठेवणे हे गंभीर आजारांपासून बचावासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी ‘माझं गाव – आरोग्य संपन्न गाव’ या उपक्रमांतर्गत स्वच्छ, निरोगी व आरोग्यदायी गाव निर्मितीसाठी जनजागृती करण्यात आली. वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, घरगुती कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन तसेच डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. गावातील प्रत्येक कुटुंबाने स्वच्छता व आरोग्याच्या बाबतीत जबाबदारी स्वीकारून सामूहिक सहभागातून निरोगी गाव निर्मितीस हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले.

यासोबतच सुरू असलेल्या कुष्ठरोग शोध मोहिमेअंतर्गत लाभार्थींची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. कल्याणी गायकवाड यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी व उपचार घेणे आवश्यक असल्याबाबतही जनजागृती करण्यात आली. आरोग्य तपासणी, योग्य आहार, स्वच्छता आणि आजारांचे वेळीच निदान यामुळे अनेक गंभीर आजारांना प्रतिबंध करता येतो. त्यामुळे नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून उपलब्ध शासकीय आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या