बुलढाणा मुख्य डाकघरात तीन दिवसीय टपाल तिकीट प्रदर्शन ; शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रदर्शन भेटीसाठी विशेष आवाहन

 


बुलढाणा, दि. 12 (जिमाका) : भारतीय डाक विभागातर्फे सेवासंकल्प अभियान व राष्ट्रीय टपाल सप्ताह २०२६ निमित्त बुलढाणा मुख्य डाकघर येथे दि. १२ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत तीन दिवसीय टपाल तिकीट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनीच्या माध्यमातून नागरिकांना टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारताचा समृद्ध इतिहास, संस्कृती आणि वारसा जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.

या प्रदर्शनात विविध प्रकारची टपाल तिकिटे, पाकिटे, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा दर्शविणारी छायाचित्रे तसेच टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारताचा समृद्ध इतिहास उलगडणारी माहिती पाहता येणार आहे. टपाल तिकीट संग्रह (फिलॅटेली) हे केवळ छंदाचे साधन नसून ज्ञान, इतिहास आणि संस्कृतीची ओळख करून देणारे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकीट संग्रहाची आवड निर्माण करणे, भारतीय टपाल विभागाच्या गौरवशाली परंपरेची माहिती देणे आणि नवीन पिढीमध्ये इतिहासाविषयी कुतूहल वाढविणे हा या प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश आहे.

शाळांनी विद्यार्थ्यांसह प्रदर्शनाला भेट द्यावी : बुलढाणा शहर व परिसरातील सर्व शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आणावे, असे विशेष आवाहन डाक विभागाने केले आहे. शाळांनी विद्यार्थ्यांच्या समूहभेटीचे नियोजन करण्यासाठी बुलढाणा मुख्य डाकघराचे प्रधान डाकपाल आशिष इंगळे यांच्याशी संपर्क साधावा. यामुळे विद्यार्थ्यांच्या भेटीचे योग्य नियोजन करणे शक्य होणार आहे.

नागरिक, विद्यार्थी, शिक्षक आणि टपाल तिकीट संग्राहकांनी या तीन दिवसीय प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन टपाल तिकिटांच्या माध्यमातून देशाचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा जाणून घ्यावा, असे आवाहन बुलढाणा विभागाचे अधीक्षक डाकघर गजेंद्र ना. जाधव यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या