पिक कापणी प्रयोगात अचूकता, पारदर्शकतेला प्राधान्य**विमा कंपनीला पूर्वसूचना देऊन संयुक्तपणे प्रयोग घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे निर्देश
*पिक कापणी प्रयोगात अचूकता, पारदर्शकतेला प्राधान्य*
*विमा कंपनीला पूर्वसूचना देऊन संयुक्तपणे प्रयोग घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे निर्देश*
*बुलढाणा, दि. ३ (जिमाका) :* शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष उत्पादकता अचूकपणे निश्चित करण्यासाठी घेण्यात येणारे पिक कापणी प्रयोग पारदर्शक, शास्त्रीय व नियमबद्ध पद्धतीने घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी दिल्या आहेत. पिक कापणी प्रयोगाच्या क्षेत्र निवडीपासून प्रत्यक्ष कापणी, वजन, छायाचित्रण आणि डिजिटल नोंदणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पिक कापणी प्रयोगाचे क्षेत्र निवडण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांच्या नियमित संपर्कात राहून आवश्यक पूर्वतयारी करावी. तसेच प्रयोगावर देखरेख करणाऱ्या पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून नियोजित पद्धतीने प्रयोग पूर्ण करावा.
*विमा कंपनीला सात दिवस आधी पूर्वसूचना*
पिक कापणी प्रयोगाची संभाव्य तारीख किमान सात दिवस आधी संबंधित विमा कंपनीला कळविणे आवश्यक आहे. अंतिम तारीख निश्चित होण्यापूर्वी किमान एक ते दोन दिवस आधी ई-मेलद्वारे पूर्वसूचना देण्याच्या सूचना आहेत. तालुका स्तरावर नियोजित प्रयोगांची माहिती दररोज एक दिवस अगोदर जिल्हास्तरावर पाठवावी. पूर्वकल्पना न देता कोणत्याही क्षेत्रात पिक कापणी प्रयोग घेऊ नये, अन्यथा प्रयोगाबाबत आक्षेप निर्माण होण्याची शक्यता आहे.
*ग्रामस्तरीय समिती, विमा प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रयोग*
ग्रामस्तरीय समिती आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींना पूर्वकल्पना देऊन पिक कापणी प्रयोग संयुक्तपणे घेण्यात यावा. प्रयोग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नियोजित तारीख निश्चित करावी. पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रयोगाचे पर्यवेक्षण करावे आणि वजनासह सर्व नोंदींची खातरजमा करावी.
पिक कापणी प्रयोगासाठी गठित ग्रामस्तरीय समितीत सहायक कृषी अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी किंवा ग्रामपंचायत अधिकारी यापैकी अधिकारी अध्यक्ष म्हणून राहतील. ग्रामपंचायतीने नामनिर्देशित केलेला एक सदस्य, पोलीस पाटील आणि दोन प्रगतिशील शेतकरी हे समितीचे सदस्य असतील. समितीतील सर्व सदस्यांना प्रयोगाची लेखी सूचना देऊन पोहोच घेणे तसेच प्रयोगाची नोंदवही अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.
*CCE Agri ॲपवर १०० टक्के डिजिटल नोंदणी*
पिक कापणी प्रयोगांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता सुनिश्चित करण्यासाठी CCE Agri मोबाईल ॲपवर १०० टक्के प्रयोगांची नोंदणी करणे बंधनकारक आहे. प्रयोगाच्या वेळी निवडलेल्या शेतातील कापणी क्षेत्र, ग्रामस्तरीय समितीची उपस्थिती, पारदर्शक पिशवीतील धान्याचे वजन तसेच तक्ता क्रमांक दोनमधील नोंदविलेल्या पिकाच्या वजनाचे स्पष्ट छायाचित्र ॲपवर अपलोड करावे.
विमा कंपनीच्या सहनिरीक्षक अथवा प्रतिनिधीची उपस्थिती असल्यास तक्ता क्रमांक दोन दाखवून त्याचेही छायाचित्र ॲपवर अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
*कापूस पिकाच्या वेचण्यांची अचूक नोंद आवश्यक*
कापूस पिकाच्या उत्पादनाची नोंद करताना CCE Agri ॲप तसेच तक्ता क्रमांक एकमध्ये वेचण्यांची संख्या अचूकपणे नमूद करावी. जिरायत क्षेत्रासाठी किमान तीन, तर बागायती क्षेत्रासाठी किमान चार वेचण्या तसेच त्यापुढील सर्व वेचण्यांची नोंद करणे आवश्यक आहे.
प्रतिकूल परिस्थितीमुळे अपेक्षित वेचण्या झाल्या नसतील किंवा पिक वाळून पुढील वेचणीची शक्यता नसेल, तर ही बाब विद्यमान पिक कापणी प्रयोगाच्या वेळीच मोबाईल ॲपवर नोंदवावी. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष उत्पादनाच्या गणनेसाठी गुणाकार पद्धतीचा वापर करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
*आवश्यक साहित्याची उपलब्धता अनिवार्य*
पिक कापणी प्रयोगासाठी शासकीय वजनकाटा, मीटर टेप, पारदर्शक पिशवी, प्लॉट सीमांकनासाठी दोरी व खुंट्या, सूप आणि चाळणी आदी आवश्यक साहित्य सोबत ठेवावे.
विमा कंपनीला पूर्वसूचना न देणे, कापणी झालेल्या क्षेत्रात प्रयोग घेणे, अर्धवट मळणी करणे, धान्याचा काही भाग बाजूला काढणे, दबावामुळे कमी वजन नोंदविणे अथवा मोबाईल ॲपवर वजनाची चुकीची नोंद करणे, अशा त्रुटींमुळे प्रयोगाबाबत आक्षेप निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक पिक कापणी प्रयोग निर्धारित नियमांनुसार, प्रत्यक्ष उपस्थितीत, अचूक वजनासह आणि आवश्यक छायाचित्रांसह नोंदविण्याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पिक कापणी प्रयोगातून प्राप्त होणाऱ्या उत्पादनाच्या नोंदी अचूक व विश्वासार्ह राहण्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्तरीय समितीचे सदस्य, शेतकरी आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी. पारदर्शक प्रक्रिया, अचूक नोंदणी आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे पिक कापणी प्रयोग अधिक विश्वासार्ह करण्यासाठी सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000
Comments
Post a Comment