बुलढाणा जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेचा आढावा; क्षेत्रीय कामकाजाची तपासणी कुष्ठरुग्णांना वेळेत उपचार, औषधोपचार व पुनर्वसन सुविधा देण्यावर भर
बुलढाणा, दि. १२ (जिमाका)
: जिल्ह्यात
कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत
सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठ व क्षयरोग) डॉ.
सचिन एडके यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे
तसेच कुष्ठरोग नियंत्रणाशी संबंधित क्षेत्रीय कामकाजाची पाहणी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना
आवश्यक सूचना दिल्या.
डॉ. एडके यांनी संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा, जामोद तसेच संबंधित
आरोग्य संस्थांमध्ये सुरू असलेल्या कुष्ठरोग शोधमोहिमेची व क्षेत्रीय तपासणीची पाहणी
केली. यावेळी कुष्ठरुग्णांची प्रत्यक्ष भेट घेऊन उपचारांची स्थिती जाणून घेतली. तसेच
कुष्ठरोग सर्वेक्षण, रुग्णांची नोंदणी, बहुऔषधोपचार (MDT) वितरण, दिव्यांगत्व प्रतिबंध
व वैद्यकीय पुनर्वसन (DPMR) नोंदवही आणि इतर अभिलेखांची तपासणी केली.
कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत दैनंदिन कामकाजाचा आढावा घेताना
त्यांनी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना रुग्णांचा नियमित पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या.
कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास त्वरित निदान व उपचार सुरू करणे, रुग्णांना आवश्यक औषधोपचार
उपलब्ध करून देणे आणि समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे
त्यांनी सांगितले.
नवीन कुष्ठरुग्णांचा शोध घेतल्यानंतर त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना
प्रतिबंधात्मक औषधोपचार (PEP) देण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
कामकाजादरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण
करण्यासाठीही मार्गदर्शन करण्यात आले.
या पाहणीदरम्यान संबंधित आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
जिल्ह्यातील कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने
समन्वयाने काम करावे, असे आवाहन डॉ. सचिन एडके यांनी केले.
0000
Comments
Post a Comment