सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज २०२६’; ५० विजेत्यांना प्रत्येकी १० लाख • समाजोपयोगी कल्पनांना मिळणार प्रत्यक्ष अंमलबजावणीची संधी
बुलढाणा, दि. १४ (जिमाका) : शेती,
आरोग्य, शिक्षण, पाणी, स्वच्छता, पर्यावरण आणि वाहतूक यांसह विविध क्षेत्रांतील स्थानिक
व सामाजिक समस्यांवर नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाधारित उपाय शोधण्यासाठी महाराष्ट्र
शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन
चॅलेंज २०२६’ या स्पर्धेचे
आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून निवड झालेल्या ५० विजेत्यांना प्रत्येकी
१० लाख रुपयांची वर्क ऑर्डर देण्यात येणार असून, एकूण ५ कोटी रुपयांचे पाठबळ उपलब्ध
होणार आहे.
समाजोपयोगी
कल्पनांना प्रत्यक्ष कृतीत उतरविणे आणि स्थानिक समस्यांवर व्यावहारिक उपाय विकसित करणे,
हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. विविध क्षेत्रांतील आव्हानांवर परिणामकारक उपाय
सुचविणाऱ्या नवोन्मेषकांना यामुळे आपली संकल्पना प्रत्यक्षात राबविण्याची संधी मिळणार
आहे. केवळ कल्पना मांडण्याऐवजी तिची उपयुक्तता, व्यवहार्यता आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी
यावर स्पर्धेत भर दिला जाणार आहे.
विविध
क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण संकल्पनांना संधी : स्पर्धेसाठी एकूण १० प्रमुख क्षेत्रे
निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक क्षेत्रातून पाच विजेत्यांची निवड केली जाणार आहे.
निवड झालेल्या प्रत्येक विजेत्याला १० लाख रुपयांची वर्क ऑर्डर देण्यात येईल. यामुळे
नाविन्यपूर्ण संकल्पनांना आर्थिक पाठबळ मिळून त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास
मदत होणार आहे. या स्पर्धेत विद्यार्थी, विद्यार्थी
गट, नवोन्मेषक, संशोधक, प्राध्यापक, शैक्षणिक व संशोधन संस्था, स्टार्टअप्स, सूक्ष्म,
लघू व मध्यम उद्योग (एमएसएमई), कंपन्या तसेच स्वयंसेवी सामाजिक संस्थांना सहभागी होता
येणार आहे.
ग्रामीण
युवा आणि महिलांसाठीही व्यासपीठ : ग्रामीण भागातील विद्यार्थी व युवकांनी आपल्या परिसरातील
समस्या ओळखून त्यावर स्थानिक परिस्थितीला अनुरूप, तंत्रज्ञानाधारित आणि व्यवहार्य उपाय
सुचवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. महिला आणि युवा नवोन्मेषकांनाही आपल्या कल्पना
मांडून त्यांना प्रत्यक्ष स्वरूप देण्याची संधी या स्पर्धेमुळे उपलब्ध होणार आहे.
१७ ऑक्टोबरपर्यंत
नोंदणीची संधी : स्पर्धेसाठी अर्ज प्रक्रिया २१ सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाली असून,
अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ ऑक्टोबर २०२६ आहे. इच्छुकांनी
sevainnovationchallenge.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्पर्धेची माहिती घेऊन नोंदणी
करावी.
जिल्ह्यातील
विद्यार्थी, नवोन्मेषक, संशोधक, उद्योजक आणि सामाजिक संस्थांनी या संधीचा लाभ घेऊन
आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी
व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक
आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment