दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा-पाण्याचे योग्य नियोजन करा**केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश; लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामांवर भर*
*दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा-पाण्याचे योग्य नियोजन करा*
*केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश; लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामांवर भर*
**बुलढाणा, दि. १९ (जिमाका) :** जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात पशुधनासाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी योग्य नियोजन करावे. तसेच लोकसहभागातून धरणांतील गाळ काढून तो शेतकऱ्यांना शेतीसाठी उपलब्ध करून देण्यासह नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाई, उपलब्ध जलसाठा, शेतीसाठी पाण्याची गरज आणि पशुधनासाठी चारा नियोजनाचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चव्हाण, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, महावितरणचे अधिकारी तसेच विविध जलप्रकल्पांचे अधिकारी उपस्थित होते.
**पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करून शेतीसाठीही नियोजन करा**
जिल्ह्यातील धरणे व जलप्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा आणि मृतसाठा विचारात घेऊन पिण्याच्या पाण्याचे योग्य आरक्षण करावे. उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून नागरिकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळेल, याची दक्षता घ्यावी. पिण्याच्या पाण्याचे नियोजन केल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या पाण्यातून खरिपातील तूर पिकाला संरक्षित सिंचन देता येईल का, याची शक्यता तपासावी. यामुळे तूर पिकाच्या उत्पादनातील संभाव्य घट टाळण्यास मदत होईल, असे निर्देश श्री. जाधव यांनी दिले.
*गावपातळीवर पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजना करा*
प्रत्येक गावातील नागरिकांना पाणी उपलब्ध होईल, या दृष्टीने गावपातळीवर पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. सार्वजनिक विहिरींची स्वच्छता करून त्यांची उपयुक्तता वाढवावी. तसेच गावातील उंच ठिकाणी पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून सार्वजनिक वापरासाठी पाणी साठविण्याच्या उपाययोजना कराव्यात. जलजीवन मिशनअंतर्गत खोदण्यात आलेल्या विहिरींना तातडीने विद्युत जोडणी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.
**लोकसहभागातून धरणांतील गाळ काढून शेतकऱ्यांना द्या**
जलसाठ्यांची क्षमता वाढविणे आणि जलसंधारणाला चालना देण्यासाठी लोकसहभागातून धरणांतील गाळ काढण्याचे नियोजन करावे. जेसीबीच्या साहाय्याने हा गाळ काढून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. यामुळे जलसाठ्यांच्या संवर्धनासोबतच गाळाचा शेतीसाठी उपयोग करण्यास मदत होईल, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले.
जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांतील अनेक नद्या सातपुडा पर्वतरांगांतून वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहासोबत दगड वाहून येतात. त्यामुळे नदीपात्रात दगड साचून प्रवाहाची रुंदी कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून नदीपात्रातील अडथळे दूर करून नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
**पशुधनासाठी चारा उपलब्धतेचे नियोजन आवश्यक**
दुष्काळाची तीव्रता वाढल्यास पशुधनासाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळातील गरज लक्षात घेऊन चारा उपलब्धता, पाणीपुरवठा आणि आवश्यक उपाययोजनांचे नियोजन प्रशासनाने आतापासूनच करावे. दुष्काळी परिस्थितीत नागरिक, शेतकरी आणि पशुधनाला कमीत कमी अडचणींचा सामना करावा लागेल, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश श्री. जाधव यांनी दिले.
बैठकीत जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यात आली. उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, शेतीसाठी शक्य तेवढे संरक्षित सिंचन आणि लोकसहभागातून जलसंधारणाची कामे यावर यावेळी भर देण्यात आला.
0000
Comments
Post a Comment