सेवा संकल्प अभियानांतर्गत उमाळी व जानोरी येथे आरोग्य उपक्रम ; कुष्ठरोग सर्वेक्षणासह ३० वर्षांवरील नागरिकांची आरोग्य तपासणी

 




 

बुलढाणा, दि. 9 (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यातील उमाळी व जानोरी येथे आरोग्य विभागाच्या वतीने विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये उमाळी येथे कुष्ठरोग सर्वेक्षण, तर जानोरी येथे ३० वर्षांवरील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 

प्राथमिक आरोग्य केंद्र, उमाळी येथे ७ ऑक्टोबर रोजी FLC (Focused Leprosy Campaign) व संपर्क सर्वेक्षणांतर्गत कुष्ठरोग सर्वेक्षण करण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी भेट देऊन संशयित रुग्णांची तपासणी तसेच रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण केले. कुष्ठरोगाचे लवकर निदान होऊन वेळेत उपचार मिळावेत, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

 

दरम्यान, ८ ऑक्टोबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, आडसूळ अंतर्गत उपकेंद्र जानोरी, ता. शेगाव येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरात ३० वर्षांवरील नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार आरोग्यविषयक मार्गदर्शन व सल्ला देण्यात आला. हा उपक्रम ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान तसेच ‘तिशीचा पल्ला—तपासणी व सल्ला’ या उपक्रमांच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे.

 

कुष्ठरोगाचे वेळीच निदान, नियमित आरोग्य तपासणी आणि योग्य उपचारांद्वारे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य विभागामार्फत जनजागृती व आरोग्य सेवा उपक्रम राबविण्यात येत आहेत.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या