केंद्रीय पथकाकडून अमरावती विभागातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा वाशिम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
वाशिम,
दि. ९ : केंद्र सरकारच्या आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकाने आज अमरावती विभागातील
पाचही जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीचा बैठकीद्वारे आढावा घेतला. त्यानंतर पथकाने वाशिम
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली.
केंद्रीय पथकात वरिष्ठ अधिकारी अर्जेश कुमार मधोक, महेश कुमार,
सीमा रानी, संजय मीना आणि अभय भारत यांचा सहभाग आहे. पथकातील सदस्यांच्या उपस्थितीत
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. वाशिमचे
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना, अमरावतीचे जिल्हाधिकारी
आशिष येरेकर, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे, अकोल्याच्या जिल्हाधिकारी
वर्षा मीना, वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान आणि कृषी सहसंचालक गणेश
घोरपडे आदी उपस्थित होते.
केंद्र शासनातर्फे राज्यातील दुष्काळ पाहणीसाठी ११ सदस्यांचे पथक
नियुक्त करण्यात आले असून, त्यात कृषी, जलसंपदा, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, अन्न व
सार्वजनिक वितरण, पशुसंवर्धन, अर्थ विभाग, नीती आयोग यांसह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचा
समावेश आहे.
जिल्हाधिका-यांकडून सादरीकरण
बैठकीत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिका-यांकडून
जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीबाबत सादरीकरण करण्यात आले. पावसाच्या कमतरतेमुळे निर्माण
झालेली स्थिती, पीक नुकसान, पाणी उपलब्धता व टँकर्सची संभाव्य गरज, शेतीवर अवलंबून
असलेले शेतमजूर व जमीनधारकांचे प्रश्न, मजुरांची स्थलांतराची शक्यता या बाबींकडे जिल्हाधिका-यांनी
केंद्रीय पथकाचे लक्ष वेधले. विभागातील पाचही जिल्ह्यातील पावसाची स्थिती, शेतीपिकांचे
नुकसान, जनावरांच्या चाऱ्याची सद्यस्थिती तसेच आगामी सात महिन्यांसाठीच्या संभाव्य
परिस्थितीची माहिती यावेळी पथकाने घेतली.
विभागात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवर
परिणाम झाला आहे. उपलब्ध जलस्त्रोत, तळी, गावांमधील पाण्याचे स्रोत आणि त्यांची सद्य:स्थिती
याबाबतही केंद्रीय पथकाला माहिती देण्यात आली. कृषी सहसंचालक श्री. घोरपडे यांनी प्रास्ताविक
केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा यांनी सूत्रसंचालन केले.
विविध गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी
बैठकीनंतर केंद्रीय पथकाने जिल्ह्यात विविध गावांना भेटी देऊन दुष्काळी
परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि पाणीटंचाईची प्रत्यक्ष पाहणी केली.
पथकाकडून दुष्काळग्रस्त भागातील पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि
प्रत्यक्ष परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन होणार आहे. त्यानुसार दुष्काळाची वस्तुस्थिती,
शेतीपिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि आवश्यक उपाययोजनांची माहिती केंद्र सरकारसमोर मांडली
जाणार आहे.
केंद्रीय पथकाने वाशिम जिल्हा दौऱ्यात विविध गावांना भेटी देऊन
नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली व शेतक-यांशी संवाद साधून त्यांची व्यथा जाणून घेतली.
वाशीम तालुक्यातील सुपखेला येथे दयाराम विठ्ठल राऊत यांच्या शेतीला भेट देऊन नुकसान
पाहणी करण्यात आली. त्यानंतर मंगरूळपीर तालुक्यातील स्वासिन येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाची
पाहणी करून परिसरातील पाणीटंचाईचा आढावा पथकाने घेतला, त्याचप्रमाणे कोठारी येथे दिलीप
दुबळगुंड यांच्या शेताची पाहणी करण्यात आली.
दौऱ्याच्या पुढील टप्प्यात पथकाने मानोरा तालुक्यातील कुपटा येथे
मोहम्मद सादिक मोहम्मद शफी यांच्या, तसेच कारंजा तालुक्यातील काळीकारंजा येथे त्र्यंबक
फकिरा गुल्हाने व पानविहीर येथे रमेश भाऊराव थेर
यांच्या शेताला भेट देऊन पीक नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली व शेतक-यांशी संवाद
साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर
केंद्रीय पथक यवतमाळ जिल्ह्याकडे रवाना झाले.
०००



Comments
Post a Comment