डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
बुलढाणा, दि. 01 (जिमाका) : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी
सुरू असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी अर्ज
करण्याची मुदत १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
जिल्ह्यातील
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील, शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असतानाही प्रवेश
न मिळालेल्या तसेच इयत्ता ११ वी, १२ वी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक
अभ्यासक्रमासाठी महाविद्यालये अथवा शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना
या योजनेचा लाभ दिला जातो. योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य,
निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सोयी-सुविधांसाठी आर्थिक मदत दिली जाते.
शैक्षणिक
वर्ष २०२६-२७ साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी
https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळाचा वापर करावा. मागील शैक्षणिक वर्षात स्वाधार
योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनीही योजनेच्या निकषांनुसार नूतनीकरणासाठी अर्ज
करणे आवश्यक आहे.
अर्ज
करण्याची मुदत १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली असून, आवश्यक कागदपत्रांची यादी
समाज कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अर्जासोबत
सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत. परिपूर्ण भरलेले अर्ज समाज कल्याण कार्यालयात जमा करावेत.
ऑनलाइन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी आल्यास सहायक आयुक्त, समाज कल्याण, बुलढाणा कार्यालयाशी
संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.
Comments
Post a Comment